For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विकास कामाला कात्री लावू; पण योजना बंद करणार नाही- हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री

12:39 PM Jan 11, 2025 IST | Pooja Marathe
विकास कामाला कात्री लावू  पण योजना बंद करणार नाही  हसन मुश्रीफ  वैद्यकीय शिक्षणमंत्री
Advertisement

ते २१०० चा हफ्ता कधी द्यायचा तेव्हा द्या फक्त कमी करू नका एवढं करा- आमदार सतेज पाटील
गोकुळ चा कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी
कोल्हापूर

Advertisement

आमदार सतेज पाटील यांनी चिमटा काढल्यामुळे आता आधी मी त्या विषयावर बोलणार आहे. अनेक निवडणूकांमध्ये पक्ष जाहीरनामे करत असतात, त्याचप्रमाणे आमचे नेतेमंडळी म्हणजेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रितपणे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' आणली. दसरा ते दिवाळी दरम्यान या लेकींना ७५०० रुपये मिळाल्याबरोबर नवऱ्याकडे पैसे मागायचे बंद झाले. डिसेंबरचा १५०० रुपयांचा हफ्ता सर्व बहिणांना आलेला आहे. विकास कामांना कात्री लावू, काहीही करू पण ही योजना आम्ही बंद पडू देणार नाही. यापुढे तुम्हाला २१०० रुपये दरमहा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, त्यामुळे पुढच्या वेळीही तुम्ही सत्ता महायुतीला दिल्याशिवाय राहणार नाही. लाडकी बहीण सोबतच मुलींचे मोफत उच्च शिक्षण, महिलांना एसटी तिकीटात ५० टक्के सूट. लाडक्या भाऊंना वीज बिल माफी यांसारख्या कोणत्याही योजना आम्ही बंद पडू देणार नाही. आणि पुढच्या विधानसभेच्या आधी आपल्याला कर्जमाफी करायची आहे. पाच वर्षात करायची आहे ना? पाच वर्षाचा जाहीरनामा आहे. या अटीतून काही भगिनींचे अर्ज छाननी मध्ये अपात्र ठरले, तर त्यांच्याकडे पैसे परत मागणार नाही. माझ्या बहिणींना माफ करू. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्यानंतर सगळीकडे हश्या पसरली.

Advertisement

गोकूळ दूधसंघातर्फे नवनिर्वाचित वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राजकिय टोलेबाजी रंगली.
पुढे मंत्री मुश्रीफ म्हणाले, गोकुळचे सर्व संचालक अभ्यासदौऱ्यासाठी परदेशात जात आहेत. तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. अमूलची स्पर्धा करण्यासाठी जे तंत्रज्ञान परदेशातून आणाव लागेल, त्याचे शिक्षण घ्या. ते तंत्रज्ञान गोकूळ मध्ये आणावे, अशा शुभेच्छा मी देत आहेत, असे मंत्री मुश्रीफ म्हणाले,

याप्रंसगी आमदार सतेज पाटील म्हणाले, मुश्रीफ साहेब मंत्री झाल्यापासून कागल मतदार संघात आयुर्वेदीक, योगा अशी महाविद्यालये झाली. आता कागलचा बॅकलॉक संपला असे जाहीर करा. यापुढे जे दंतमहाविद्यालय सुरु करायचं आहे, ते कोल्हापूरात करा. शेंडापार्कमध्ये त्यासाठी जागा उपलब्ध आहे. सत्ता कोणाची आहे, यापेक्षा लोकशाहीमध्ये आम्ही सत्तेचा उपयोग लोकांसाठी कसा करतो हे महत्त्वाचे आहे. पूर्वी रुग्ण उपचाराला मिरजेला जायचे पण आता तो सगळा टापू कोल्हापूर आलेला असल्याने रुग्णांच्या सोयीचे झालेले आहे. कोल्हापूरात आरोग्यासेवा चांगल्या झालेल्या आहेत. मुश्रीफ साहेब लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा हफ्ता कधी द्यायचा तेव्हा द्या, पण कमी करू नका, एवढं करा..

पुढे आमदार पाटील म्हणाले, माझी मंत्री मुश्रीफ साहेब यांना विनंती आहे, एखादा प्रकल्प कोल्हापूरला मेडिकल टुरिझम वाढवण्यासाठी राबविण्यात येईल का ? विदेशातून परदेशातून अनेक लोक वैद्यकिय उपचार घेण्यासाठी पुणे, मुंबईला येतात, ते कोल्हापूरमध्ये आणता येतील का? अशी बैठक एखादी घेता येईल का? आमच्या दोघा मंत्र्यांकडून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची अपेक्षा आहे. खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याकडूनही केंद्रातून कोल्हापूर जिल्ह्यासाठी अधिकाधिक निधी आणण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. आता जिल्ह्यात आम्ही तीनच कॉंग्रेसचे नेते राहिलो आहोत. आमची विनंती आहे, की आमचं एखादं पत्र आलं तर आपण दोन्ही मंत्र्यांनी त्याचा विचार करावा. आता निवडणूका झालेल्या आहेत, आता आपण सर्व नेते मंडळींनी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकाससाठी काय करता येईल याचा विचार करुया. या जिल्ह्याला विकासात्मक दृष्टीकोन देणं ही जबाबदारी आमची असणार आहेत. चुयेकर साहेबांचं स्वप्न होत की, गोकूळ हा महाराष्ट्राचा ब्रॅण्ड व्हावा यासाठी आम्ही कटीबद्ध राहू, असे मी आश्वासन चुयेकर साहेबांच्या पुण्यतिथी दिनी देतो.

Advertisement
Tags :

.