महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पशुबळीविरोधात प्राणपणाने लढा देत राहणार

10:46 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘विश्व प्राणी कल्याण मंडळा’चे अध्यक्ष दयानंद स्वामी : पशुबळी देणे ही केवळ अंधश्रद्धा असल्याचे मत 

Advertisement

मनीषा सुभेदार /बेळगाव

Advertisement

पशुबळी देऊन, प्राणीहत्या करून देवालयांचे वधालय करू नका, देवालये ही ‘ध्यानालये’, ‘भक्तिलये’, ‘ज्ञानालये’, ‘भजनालये’ झाली पाहिजेत. सद्भक्ती, सज्ञान व सदाचार यांचा त्रिवेणी संगम ज्या देवालयांमध्ये आढळतो, त्या देवालयांतील देवदेवता सर्वांचे कल्याणच करतील. पशुबळी देणे ही केवळ अंधश्रद्धा असून आता कायद्यानेच त्याला बंदी आणली आहे. या कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्राणपणाने लढा देत असून मागे हटणार नाही, अशा शब्दात ‘विश्व प्राणी कल्याण मंडळा’चे अध्यक्ष दयानंद स्वामी यांनी आपल्या लढ्याचा प्रवास कथन केला. उचगाव येथील मळेकरणी देवीच्या मंदिराला भेट देऊन ‘तरुण भारत’ला दिलेल्या खास मुलाखतीत आपल्या लढ्याची भूमिका कथन केली. जेथे पशुबळी प्रथा आढळून येईल, तेथे जाऊन जिवाची बाजी लावून ही प्रथा बंद होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे स्पष्ट केले.

या लढ्याची सुरुवात कशी झाली? या प्रश्नावर मी इंजिनिअर आहे. परंतु बालपणापासूनच मला अध्यात्माची विशेष आवड आहे. त्यामुळे माझे गुरु लिंगानंद महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मी अध्यात्माचा अभ्यास केला. हिमालयासह अन्य धार्मिकस्थळी जाऊन तपस्या केली. बेंगळूर येथे ‘अहिंसा’ या विषयावर प्रवचन देत असताना एका महिलेने जे अहिंसक आहेत त्यांच्यासमोरच तुम्ही प्रवचन देत आहात, परंतु जे हिंसा करतात त्यांचे समुपदेशन कसे करणार? असा प्रश्न विचारला. त्यावेळी मी त्या महिलेला जुजबी उत्तर दिले व समारोपाला पाहू, असे सांगितले. समारोपप्रसंगी ती महिला अन्य महिलांना घेऊन आल्यावर फक्त बेंगळूरमध्ये दररोज 14,000 हून अधिक गोवंशाची हत्या होत असल्याचे तिने सांगताच तेथे उपस्थित मंत्री, आमदारांसमोर तिलाच बोलण्यास सांगितले. मात्र, त्या रात्री सतत मला गोवंश हत्येच्या विचाराने झोप लागली नाही. पहाटे 4 च्या दरम्यान ‘प्राणीमात्रांसाठी तुझे जीवन समर्पित कर’ असा आवाज माझ्या अंतर्मनातून आला. तेव्हापासून माझ्या गुरुंची परवानगी घेऊन प्राणी व पशु यांना वाचविण्याचे कार्य हाती घेतले, असे स्वामी म्हणाले.

हा लढा व्यापक कसा झाला? या प्रश्नावर जर बेंगळूरमध्ये 14 हजार गोवंश हत्या होत असतील तर संपूर्ण राज्य, जिल्ह्यांमधील पशुबळी, प्राणीहत्येची आकडेवारी संकलित करता 2 लाखांहून अधिक असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. त्यानंतर बेंगळूरच्या म्हैसूर सर्कलमध्ये रास्ता रोकोची हाक दिली. मी तेथे पोहचू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने सर्व यंत्रणा कामाला लावली. परंतु कांबळे पांघरून रिक्षातून मी शिताफीने तेथे पोहोचलो आणि घोषणा देण्यास सुरुवात केली. यांत्रिक कत्तलखाने बंद करण्यासाठीचे माझे आंदोलन यशस्वी झाले, असे स्वामींनी सांगितले. मंदिरांच्या नावाने पशुबळी देणे ही केवळ अंधश्रद्धा आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. कक्केरी येथील बिष्टादेवीच्या जत्रेत पशुबळी बंदचे श्रेय स्वामींना जाते. ते म्हणाले, देवालयांचा कसाईखाना करू नका, अशी हाक देत मी बिष्टादेवी यात्रेच्या ठिकाणी पोहोचलो. तेथे लोक होते, परंतु एकही प्राणी दिसत नव्हता. मात्र पहाटे तीन वाजता रस्तोरस्ती प्राणीहत्या सुरू झाली. मी माझे आंदोलन सुरूच ठेवले, मंदिराच्या लोकांनी हल्ला केला, परंतु मी डगमगलो नाही. पोलीस आणि माध्यमांचे सहकार्य मला लाभल्याने या लढ्याचे श्रेय त्यांनाही जाते, असे ते म्हणाले.

या आंदोलनामुळे सरकार जागे झाले का? या प्रश्नावर राज्यामध्ये 1959 मध्ये प्राणीबळी निषेध कायदा अस्तित्वात आला. कोणत्याही देवस्थानामध्ये बळी दिला जाऊ नये, असा आदेश न्यायालयाने दिला. त्यामुळे तीन ते चार कोटी पशु आणि प्राण्यांचे जीव वाचले. परंतु या कायद्यामध्ये फक्त ‘हिंदू मंदिरांचा उल्लेख होता.’ त्यावर आक्षेप घेऊन पुन्हा लढा सुरू केल्यानंतर 1975 मध्ये कोणत्याही धार्मिकस्थळी पशुबळी किंवा प्राणीहत्या करण्यास प्रतिबंध करणारा कायदा अस्तित्वात आल्याचे स्वामींनी सांगितले. याचीच परिणती म्हणून कर्नाटक राज्य गोवंश हत्यामुक्त झाली आहे. ते पशुबळीमुक्त राज्य व्हावे यासाठी प्रयत्न करत आहोत, याकडे लक्ष वेधले. प्राणीहत्येवर निर्बंध असले तरी भटक्या कुत्र्यांना मारावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे, ती कितपत रास्त आहे? या प्रश्नावर सर्वच भटकी कुत्री त्रास देत नाहीत. शिवाय कुत्र्यांना लस द्यावी, त्यांचे निर्बिजीकरण करावे, परंतु त्यांना मारू नये, या मतावर ठाम आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. बळी देण्यासाठी नेल्या जाणाऱ्या प्राणी, पशुंच्या सांभाळासाठी बेंगळूर येथे मोठी गो-शाळा उभारली आहे. ठिकठिकाणी पांजरपोळ उभे व्हावेत, तसेच गो-शाळांच्या स्वावलंबनासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

लढ्यात संत-महंत सहभागाची अपेक्षा

कर्नाटक सरकारच्या कार्यकक्षेखाली 36 हजार मंदिरे आहेत. खासगी मंदिरांची संख्या जवळजवळ अडीच लाख आहे. सरकारी मंदिरांमध्येसुद्धा पशुबळींची प्रथा आढळली आहे. त्या विरोधातही माझा लढा सुरू आहे. माझ्याबरोबर राज्यातील आणखी काही संत-महंत सहभागी झाले तर कर्नाटक हे पशुबळीमुक्त राज्य होण्यास वेळ लागणार नाही, असे ते म्हणाले. आजपर्यंत सरकारने या लढ्यासाठी कोणताही निधी दिला नसून तो लोकाश्रयावर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article