बाळेकुंद्री महालक्ष्मी मंदिरात चोरी
75 हजारांचा ऐवज लंपास : गावात खळबळ, ग्रामस्थांमध्ये भीती
वार्ताहर/बाळेकुंद्री
बेळगाव व परिसरात गेल्या कांही दिवसांपासून चोरट्यांनी उच्छाद मांडला असून मंगळवारी मध्यरात्रीच्या दरम्यान बाळेकुंद्री खुर्द येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरातील 75 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास मंदिराशेजारी सुतार बंधूंच्या महिला झाडलोट करताना मंदिराला लावलेला कुलूप तोडलेल्या अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आल्याने हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. मंदिरला लागूनच पुजाऱ्यांची घरे असताना या चोरीमुळे गावात खळबळ उडाली आहे.मंगळवारी रात्री मंदिराच्या पाठीमागील पत्रा लोखंडी सळीने काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना तो उघडता न आल्याने मंदिरासमोरील बंद असलेल्या पुढील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र, चांदीचा हार तसेच तीस तोळ्यांच्या पैंजनासह 75 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची तक्रार मंदिराच्या पुजाऱ्यांनी मारिहाळ पोलीस स्थानकात दिली आहे. चोरीच्या घटनेनंतर जमलेल्या नागरिकांनी मंदिरात जाऊन पाहणी केली असता देवीला घातलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह इतर साहित्य चोरीला गेल्याचे समजताच ग्रामस्थांनी तात्काळ मारिहाळ पोलीस स्थानकात माहिती दिली. पीएसआय चंद्रशेखर व हवालदार बळगन्नावर यांच्यासह पोलीस तातडीने येऊन पाहणी करून पंचनामा केला. गावात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेण्यात आली असून लवकरच चोरट्यांना गजाआड करणार असल्याचे पीएसआय चंद्रशेखर यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.
दानपेटीतील रक्कम चोरांच्या हाती लागली नाही
मंदिराच्या दानपेटीतील रक्कम गेल्या दोन वर्षांपासून काढण्यात आली नव्हती. मात्र, योगायोगाने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सदर दानपेटी उघडण्यात आली. भविकांच्या उपस्थितीत मोजणी केली असता एकूण 23 हजार रुपये देवीला भाविकांनी अर्पण केले होते. जर मंगळवारी दानपेटीतील रक्कम काढली नसती तर सदर दानपेटीवरही चोरट्यांनी डल्ला मारला असता.