नोकरी घोटाळ्याची नव्याने चौकशी करणार : मुख्यमंत्री
पणजी : राज्यात गाजणाऱ्या नोकरीसाठी पैसे प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी पूजा नाईक हिची नव्याने सखोल चौकशी करण्यात येणार आहे. पूजाने नव्याने केलेल्या आरोपांची गुन्हे शाखेने चौकशी प्रारंभ केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. कोट्यावधींच्या नोकरी घोटाळ्याप्रकरणी गेल्यावर्षी अटक करण्यात आलेल्या पूजा नाईककडून हल्लीच व्हिडिओ जारी करण्यात आला होता. त्यात नोकरीसाठी पैसे रॅकेटमध्ये एक मंत्री, एक आयएएस अधिकारी आणि एक अभियंता यांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसारच आपण नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांकडून पैसे स्वीकारले होते, ही रक्कम सुमारे 17 कोटी ऊपये असल्याचा दावा तिने केला आहे.
आता त्या पैशांसाठी त्या उमेदवारांनी आपल्याकडे तगादा लावला असून संबंधित मंत्र्याने ते आपणास परत द्यावे, म्हणजे आपण ज्यांचे त्यांना परत करू शकणार आहे, असेही पूजाने म्हटले आहे. त्यावर बोलताना डॉ. सावंत यांनी, सरकार कायदेशीर प्रक्रियेनुसार तपास पुढे नेईल आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतरच त्यावर भाष्य करेल, असे सांगितले. म्हणूनच याप्रकरणी सध्या नव्याने एफआयआर नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही, असे पेयजल पुरवठा खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई आणि मच्छिमार खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.