निवडणूक आयोगाच्या विरोधात सह्यांची मोहीम राबवणार
माजी आमदार अंजली निंबाळकर यांचे प्रतिपादन
खानापूर : राष्ट्रीय निवडणूक आयोग ही देशाची स्वायक्त संस्था आहे. या निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे काम करणे गरजेचे आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून निवडणूक आयोग संविधानाच्या मार्गसूचीप्रमाणे काम करत नसल्याने देशात वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रीय विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी व्होट चोरीचा मुद्दा पुराव्यानिशी सादर करून निवडणूक आयोगाची पोलखोल केली आहे. देशात काँग्रेसच्यावतीने सह्यांची मोहीम अभियान राबवून आयोगाला जबाबदारीची जाणीव करून देण्यात येणार आहे. या सह्यांच्या अभियानात खानापूर तालुक्यातूनही मोठ्या प्रमाणात सह्यांची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी 15 ऑक्टोबरपर्यंत तालुक्यात सह्यांची मोहीम राबविण्यात यावी, असे आवाहन एआयसीसीच्या सचिव आणि माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी शिवस्मारक येथे आयोजित केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी होते.
सुरुवातीला अर्बन ब्लॉकचे अध्यक्ष महांतेश राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत करून सह्यांच्या मोहिमेबाबत माहिती दिली. यावेळी अंजली निंबाळकर पुढे म्हणाल्या, संविधानाने दिलेल्या मतदानाचा हक्क सुरक्षित राहिला तरच देश सुरक्षित राहणार आहे. यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी या मोहिमेत गांभीर्याने लक्ष घालून तालुक्याच्या शेवटच्या माणसापर्यंत ही मोहीम पोहचवावी. यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विनय नवलगट्टी बोलताना म्हणाले, सह्यांची मोहीम कोणत्या प्रकारे राबवावी, याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी ईश्वर घाडी म्हणाले, लोकप्रतिनिधींच्या निष्क्रीयतेमुळे तालुक्याचा विकास खुंटला आहे. याचा परिणाम तालुक्याच्या सर्वांगीण विकास तसेच शासकीय कार्यालयातील अनागोंदी वाढलेली आहे. यावेळी दीपा पाटील, साईश सुतार, विनायक मुतगेकर, सूर्यकांत कुलकर्णी, रियाज पटेल, गुड्डू टेकडी यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्याबाहेरील नेत्यांचा हस्तक्षेप वाढला
तालुक्यात तालुक्याबाहेरील नेत्यांचा काँग्रेस संघटनेमध्ये हस्तक्षेप वाढला आहे. मी गेल्या 15 वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी तळागाळात काम केलेले आहे. तालुक्यात काँग्रेस पक्षाची संघटना तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी आणि पक्षाच्या वाढीसाठी सक्षम आहे. तरी तालुका संघटनेला न जुमानता काहीजण तालुक्यात काँग्रेसचे परस्पर कार्यक्रम राबवत आहेत. याबाबत राज्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, जिल्हा पालकमंत्री यांची भेट घेऊन तालुक्यातील हस्तक्षेप थांबवण्यासाठी माहिती देणार आहे. गरज पडल्यास राष्ट्रीय स्तरावरही याबाबत तक्रार करण्यास मागेपुढे पाहणार नाही, यासाठी बाहेरील नेत्यानी खानापूर तालुक्यातील हस्तक्षेपाबाबत गांभीर्याने विचार करावा, असा इशाराही त्यांनी दिला.