दीपावली साजरी करणार, केवळ बदलले स्थान
कॅनडाच्या विरोधी पक्षनेत्याचे स्पष्टीकरण
वृत्तसंस्था/ओटावा
कॅनडाच्या कॉन्झरर्व्हेटिव्ह पक्षाने दीपावली साजरी करण्यासंबंधातील पेरी पोईलीव्हेर यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. हिंदूंचा हा महत्वाचा सण आम्ही साजरा करणारच आहोत. केवळ स्थान वेगळे निवडण्यात आले आहे, असे प्रतिपादन या पक्षाचे नेते आणि खासदार डोहेर्टी यांनी बुधवारी रात्री उशीरा केले. हा सण प्रत्येक वर्षी कॅनडातील कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाकडून साजरा केला जातो. यावेळी भारत आणि कॅनडा यांच्यातील राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर या सणापासून आम्ही स्वत:ला अलग करीत आहोत, असे विधान पोईलीव्हेर यांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे कॅनडातील भारतीय वंशाच्या नागरीकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. तथापि, आता कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षानेच यासंबंधी स्पष्टीकरण दिल्याने वाद मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वृत्त पूर्णत: निराधार
पोईलीव्हेर यांनी या सणापासून अलिप्त राहण्याची घोषणा केली आहे, हे वृत्त पूर्णत: निराधार आहे, असे त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. कॅनडात सध्या विरोधी पक्ष असलेल्या कॉन्झरर्व्हेटिव्ह पक्षाकडून हा सण प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. यावर्षीही तो नेहमीप्रमाणे साजरा केला जाईलच. केवळ सण साजरा करण्याचा समय आणि स्थान यांच्यात परिवर्तन करण्यात आले आहे. दीपावली आणि बंदी छोड हे सण ओटावा येथे साजरे केले जात असून कॉन्झरर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते तसेच कॅनडातील भारतीय वंशाचे नागरीक या सणांमध्ये सहभागी होत आहेत. यावेळी या पक्षाचे खासदार डोहेर्टी हे या सणाचे आयोजक आहेत. हा सण कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या विरोधी पक्ष नेत्यांकडून किंवा त्यांच्या कार्यालयाकडून कधीही साजरा केला गेलेला नाही. तर तो या पक्षाचे इतर महत्वाचे नेते आणि लोकप्रतिनिधी कॅनडातील भारतीय वंशाच्या नागरीकांसह साजरा करतात, असे स्पष्टीकरण डोहेर्टी यांनी बुधवारीच रात्री उशीरा दिले होते.