For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म्यानमार सीमेवर तारांचे कुंपण उभारणार

07:00 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
म्यानमार सीमेवर तारांचे कुंपण उभारणार
Advertisement

विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी दिली माहिती

Advertisement

वृत्तसंस्था /आयजोल

विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी आयजोलमध्ये भाजपचे राज्यासाठीचे घोषणापत्र जारी केले. भाजप सरकार देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता देतेय. केंद्र सरकारने म्यानमारला लागून असलेल्या सीमेवर कुंपण उभारणे आणि मुक्त संचार व्यवस्था समाप्त करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जयशंकर यांनी यावेळी सांगितले आहे. आमच्या देशाची सुरक्षा, मिझोरमसमवेत आमच्या राज्यांच्या सुरक्षेसाठी आम्हाला खबरदारी घ्यावी लागणार आहे. परंतु सध्या जी पावले उचलली आहेत, ती एका स्थितीच्या प्रत्युत्तरादाखल आहेत. आमचा शेजारी देश सध्या एका गंभीर संकटाला सामोरा जात असल्याचे जयशंकर म्हणाले. म्यानमारमध्ये फेब्रुवारी 2021 मध्ये सैन्याची राजवट आली होती. तेव्हापासून म्यानमार गंभीर संकटाला सामोरा जात आहे. सत्तापालट झाल्यापासून म्यानमारच्या हजारो लोकांनी ईशान्य भारतातील राज्यांमध्ये विशेषकरून मिझोरममध्ये आश्रय घेतला आहे.

Advertisement

खबरदारी घेण्याची गरज

केंद्र सरकार लोकांचे हित, परंपरा, प्रथा आणि सीमापार नात्यांबद्दल अत्यंत संवेदनशील आहे. भारत-म्यानमार सीमेवर कुंपण उभारणे आणि मुक्त संचार व्यवस्था संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे निर्णय म्हणजे सद्यस्थितीवर व्यक्त केलेली प्रतिक्रिया असल्याचे लोकांनी समजून घ्यावे असे जयशंकर म्हणाले. मुक्त संचार व्यवस्थेच्या अंतर्गत भारत-म्यानमार सीमेनजीक राहणाऱ्या लोकांनी व्हिसाशिवाय परस्परांच्या क्षेत्रात 16 किलोमीटरपर्यंत जाण्याची अनुमती मिळते. भारताची म्यानमारला लागून 1643 किलोमीटर लांब सीमा आहे. विशेषकरून मिझोरममध्ये म्यानमारला लागून 510 किलोमीटर लांब सीमा आहे.

Advertisement
Tags :

.