आरामध्ये भाजप परंपरा मोडणार ?
बिहारमधील आरा लोकसभा मतदारसंघाची अशी परंपरा आहे, की येथे कोणत्याही एक उमेदवार केवळ सलग दोनदाच निवडून आला आहे. सलग तीनवेळा निवडून येणे अशक्य मानले जाते. यावेळी येथे भारतीय जनता पक्ष आणि भाकप (माले) यांच्यात चुरस आहे. भारतीय जनता पक्षाने गेल्या सलग दोन निवडणुका निवडून आलेले आर. के. सिंग यांना पुन्हा उमेदावारी दिली आहे. तर विरोधी पक्षाकडून सुदामा प्रसाद यांना मैदानात उतरविण्यात आले आहे.
2021 मध्ये आर. के. सिंग यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि मोठा जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात. ते पूर्वी सनदी अधिकारी होते. या भागात त्यांनी 10 वर्षे काम केलेले आहे. त्यामुळे त्यांना या भागाचा कोपरा अन् कोपरा माहिती आहे, असे म्हटले जाते. त्याच प्रमाणे त्यांनी गोरगरीबांमध्येही मोठी कामे सेवाकाळात केली आहेत, अशी चर्चा आहे. परिणामी त्यांना स्पर्धा सोपी असल्याचे तज्ञांचे मत आहे.
गरीब समाजातील उमेदवाराकडून आव्हान
भाकप (माले) या पक्षाचे उमेदवार सुदामा प्रसाद गरीब समाजातील आहेत. मात्र, त्यांच्या पाठीशी पक्षाची संघटना उभी आहे. हा पक्ष विरोधी पक्षांच्या आघाडीत समाविष्ट असल्याने राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचेही त्यांना सहकार्य आहे. यावेळीही हा मतदारसंघ परंपरेला जागेल आणि आर. के. सिंग यांना सलग तीनदा निवडणून देणार नाही. आम्हाला यावेळी संधी आहे, असे प्रसाद यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आपण गरीब समाजाशी जोडले गेलो असल्याने आपल्याला निवडून येण्याची संधी अधिक असल्याचे त्यांना वाटते.
सामाजिक समीकरण कसे आहे...
आर. के. सिंग हे रजपूत समाजातील आहेत. या मतदारसंघात रजपुतांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासह सवर्णांची संख्या 60 टक्के असल्याचे स्पष्ट होत आहे. तर अन्य मागासवर्गीय, दलित आणि मुस्लीमांची संख्या 35 टक्के आहे. त्यामुळे सामाजिक, धार्मिक आणि जातीय समीकरणही सिंग यांच्याकडे झुकणारे आहे. याच जोरावर त्यांनी येथे दोनदा विजय मिळविला असून यंदा हॅटट्रिकची अपेक्षा आहे.
10 वर्षांमध्ये विकास
10 वर्षांपूर्वी या मतदारसंघात कोणताही विकास झाला नव्हता. जवळचे मोठे शहर असणाऱ्या छाप्रा येथे जाण्यासाठीही अनेक तास लागत असत. पण गेल्या 10 वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने विकासाची अनेक कामे हाती घेण्यात आली. त्यामुळे बिहारची राजधानी पाटणा येथे केवळ एक तासात वाहनाने जाण्याची सोय झाली. तसेच आरा शहरात स्वच्छतेचे अनेक उपक्रम हाती घेण्यात आल्याने शहराचाही विकास झाला आहे, असे येथील मतदारांचे म्हणणे आहे. या मतदारसंघात 23 लाखांच्या आसपास मतदार असल्याची माहिती देण्यात आली.