मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्न करणार : प्रियांका जारकीहोळी
चिकोडी-सदलगा परिसरातील जनतेच्या तक्रारी स्वीकारून केले निवारण
बेळगाव : चिकोडी-सदलगा मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडविण्याचे काम प्रामाणिकपणे करण्यात येत आहे. कोणत्याही विभागाबाबत समस्या असल्यास जनतेने आपल्या निदर्शनास आणून द्याव्यात. तात्काळ याचे निवारण करण्यात येईल. शासनाकडून भरीव निधी आणून मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्न करत राहणार आहे, असे खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी सांगितले. चिकोडी येथील आपल्या कार्यालयात मतदारसंघातील जनतेच्या तक्रारी स्वीकारून त्यांचे निवारण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. मतदारसंघातील प्रत्येक गावाला अधिकाऱ्यांसह भेटी देण्यात येत आहेत. यावेळी अनेक समस्यांचे जागेवरच निरसन करत आहोत. जेणेकरून पुन्हा त्याच समस्येसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत, याची काळजी घेत आहोत. मतदारसंघासाठी भविष्यात करता येणाऱ्या विकासकामांबाबत संबंधित अधिकारी व जनतेबरोबर समोरासमोर चर्चा करत आहोत. यामुळे आम्हाला अनेक वर्षे टिकणारे काम करता येणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रभाकर कोरे, शाम रेवडे, शंकरगौडा पाटील, राजकुमार कोटगी, गणेश मोहिते, संजू कांबळे, शिवाप्पा पोगत्यानट्टी आदी उपस्थित होते.