मंत्री, आमदारांचा गट काँग्रेसश्रेष्ठींची भेट घेणार?
मंत्री के. एन. राजण्णा यांच्याकडून तक्रार देण्यास विलंब
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील हनिट्रॅप प्रकरण आता देशभरात चर्चेचा विषय बनले असून राज्य काँग्रेसमधील प्रभावी नेत्याच्या भूमिकेविषयी मंत्री आणि आमदारांच्या गटाने हायकमांडची भेट घेण्याचा विचार चालविला आहे. त्यामुळे योग्य वेळ येताच गृहमंत्र्यांकडे तक्रार देणार असल्याचे सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी राजण्णा यांनी तक्रार दिल्याशिवाय आणि एफआयआर नोंदविल्याशिवाय तपास शक्य नाही, असे स्पष्ट केले आहे. परंतु, तक्रार देण्यास विलंब होत असल्याने अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांना राजकीयदृष्ट्या संपविण्यासाठी हनिट्रॅपमध्ये अडकविण्याचे कारस्थान एका प्रभावी नेत्याने रचल्याचा आरोप केला जात आहे. मागील आठवड्यात गुरुवारी मंत्री के. एन. राजण्णा यांनी 48 जणांना हनिट्रॅप करण्यात आले असून हे जाळे देशभरात विस्तारले आहे. यात न्यायाधीशही अडकले आहेत. प्रतिस्पर्धी आम्हाला हनिट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गौप्यस्फोट केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना गृहमंत्र्यांनी राजण्णा यांनी तक्रार दिल्यानंतर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात येतील, असे सांगितले होते. मात्र, राजण्णा यांनी अद्याप तक्रार दिलेली नाही.
भाजपचे आमदार व माजी मंत्री मुनिरत्न यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमारांवर हनिट्रॅपचा आरोप केला होता. मात्र, शिवकुमार यांनी हा आरोप फेटाळून लावला. राजण्णा यांना तक्रार देण्यासा सांगितले आहे, असेही शिवकुमार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची काँग्रेस हायकमांडने गांभीर्याने दखल घेतली असून सध्यातरी तक्रार देण्यास स्थगिती दिली असून पुढील आदेशापर्यंत प्रतीक्षा करण्याची सूचना दिल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी हे हनिट्रॅप प्रकरणाविषयी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना माहिती देण्यासाठी लवकरच नवी दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते. काही मंत्री, आमदारांचा गटही दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.