धुळेश्वर यात्रेच्या पूर्वसंध्येला धुळोबा डोंगराला वणवा
कोयना वसाहत :
घारेवाडी येथील धुळेश्वर यात्रेच्या पूर्वसंध्येला धुळोबा डोंगराला अज्ञाताने वणवा लावला. यामध्ये खासगी तसेच वनविभागाच्या वनसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे. शिवम प्रतिष्ठानच्या साधकांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आली नव्हती.
धुळोबा डोंगर परिसरात गुरुवारी दुपारी चारच्या दरम्यान वणवा लागला. 'शिवम'च्या साधकांनी त्वरित वनविभाग व ग्रामस्थांना माहिती दिली. तसेच स्वतः आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. साधक सुहास पाटील, पांडुरंग पाटील 'शिवम चे व्यवस्थापक आनंदा खबाले, धनंजय पवार, अरविंद इंगवले, यासह वनपाल बाबुराव कदम, वनपाल शंकर राठोड, वनरक्षक अभिनंदन सावंत, वनसेवक वैभव गरूड, अरुण शिबे यांनी आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले. आगीमध्ये दुर्मिळ झाडे होरपळी, तर काही जळून नामशेष झाली. अनेक पक्ष्यांची घरटी व अंडी जळाली. पशु-पक्ष्यांची पिल्ले होरपळली. वनस्पतींसह वन्यजीवांचे अतोनात नुकसान झाले. सायंकाळी उशिरा काही प्रमाणात आग आटोक्यात आणण्यात यश आले.
दरम्यान, होळी पौर्णिमेला धुळोबा देवाची यात्रा भरते. मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात. धुळोबा मंदिर परिसरात आग पसरल्याने ती मंहपाकडे सरकते की काय अशी भीती होती. तत्पूर्वीच मंदिर देखभाल समिती सदस्य व शिवम साधकांनी टाकीतील पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सायंकाळी उशिरा धुळोबाच्या बाजूची आग विझवण्यात यश आले. तोवर आगीचे तांडव डोंगराच्या दक्षिण बाजूला फैलावले. ऑडोशी बाजूने महादेव मंदिर परिसर आगीने कवेत घेतला. रात्री उशिरापर्यंत डोंगरात आगीचे तांडव सुरू होते. वनक्षेत्रासह खासगी जागेतील साधारण चार ते पाच हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले. वणवा लावणाऱ्या अज्ञाताचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.