कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुंजी परिसरात दिवसाढवळ्या वन्यप्राण्यांचा वावर

10:49 AM Jul 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शिवारात गव्यांच्या कळपाचा मुक्त संचार : शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण : शिवारामध्ये वन्यप्राणी दृष्टीस पडण्याच्या वारंवार घटनांमुळे शेतकरी चिंतेत

Advertisement

वार्ताहर/गुंजी

Advertisement

गुंजीसह परिसरातील  जंगलात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली असून सदर वन्यप्राणी दिवसाढवळ्dयाही शेती शिवारात मुक्त संचार करीत असल्याने येथील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याआधी जंगलातून वाटेने जाताना दिवसा या प्राण्यांचे दर्शन घडत होते. मात्र अलीकडे सदर प्राणी भरदिवसा बिनधास्तपणे शिवारामध्ये दृष्टीस पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. गेल्या दोन-तीन दशकापासूनच या परिसरातील शेतकऱ्यांना नेहमी वन्यप्राण्यांशी संघर्ष करावा लागत असून हा संघर्ष संपणार कधी? अशी विचारणा येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

आता चक्क दिवसाही जंगली प्राणी शिवारात फिरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. कारण गेली वीस-पंचवीस वर्षे या भागात वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.या भागातील शेकडो एकर जमीन ओस पडत असून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची अनेकवेळा मागणी करूनही शेतकऱ्यांच्या या गंभीर मागणीकडे कोणीही लक्ष घालत नसल्याने आणि अनेक ठिकाणी या प्राण्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागल्याची मालिका सुरूच आहे. त्यामुळे येथील शेतकरी उदासीन होत असून शेती व्यवसायाकडे हळूहळू पाठ फिरवल्यामुळे शेकडो एकर जमीन पडीक पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

बंदोबस्तासाठी क्लुप्त्या ठरल्या फोल

या भागात पेरणीपासूनच वन्यप्राण्यांचा उपद्रव सुरू होतो. सुरुवातीच्या काळात मोर, लांडोर हे पेरणी केलेले भात खाऊन टाकतात. त्यानंतर त्यातून बचावलेले भात उगवण सुरू होताच ससे, चितळे, हरणे त्या पिकाचा फडशा पाडतात. तर पिकलेल्या धान्यामध्ये जंगली डुकरे, माकडे, हत्ती हातातोंडाशी आलेले पीक खाऊन फस्त करतात. त्यामुळे या भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कंदील लावणे, बॅटरीचा प्रकाशझोत, लाईट, फटाक्यांची वात, बुजगावणे, भोंगे, सभोवताली तारेचे कुंपण अशा वेगवेगळ्dया क्लुप्त्या या प्राण्यांच्या अटकावासाठी करूनही हे प्राणी याला न जुमानता बिनधास्त पिकामध्ये शिरून पीक खाऊन तुडवून प्रचंड नुकसान करीत आहेत.

शेतकऱ्यांसमोर चारा समस्या

या भागातील शेतकऱ्यांना गव्यांच्या उपद्रवामुळे चारा समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दुभत्या जनावरांवर त्याचा मोठा परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे. कारण चाऱ्यासाठी राखून ठेवलेल्या गवतामध्येही गवे शिरून गवताचा फडशा पाडत आहेत. तर दुभत्या जनावरांसाठी पेरलेले मक्का, कडवळ, ज्वारी, बाजरी आदी चारापिकेही खाऊन फस्त करत असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना चारा कसा घालावा? ही समस्या भेडसावत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी येथील नागरिकांसह शेतकऱ्यांना नैसर्गिक दुधाऐवजी पाकीट बंद दूध विकत घेण्याची वेळ येत आहे.

वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताची गरज

या भागातील वाढती प्राणीसंख्या आणि शेतकऱ्यांचे नुकसान पाहता वनखात्याने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त होत आहे. त्याकरिता वनखात्याने जंगलाच्या बाजूने खोल चर मारून तारेचे कुंपण करून वन्यप्राणी जंगलातून बाहेर जाणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी या शेतकऱ्यांच्या गंभीर समस्येकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. वन्यखात्याला वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यास भाग पाडावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळवून द्यावी, अशी आग्रही मागणी होत आहे.

शेतकऱ्यांना वाली कोण?

गेली वीस-पंचवीस वर्षे या भागातील शेतकरी वन्यप्राण्यांशी संघर्ष करीत असून वन्यप्राण्यांच्या या उपद्रवामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांनी शेती व्यवसायाला रामराम ठोकला आहे. सध्यातर वन्यप्राणी दिवसाढवळ्याही शिवारात येत असल्याने शेतात कामधंदा करणेही धोक्याचे ठरत असल्याने काही शेतकरी शेती व्यवसायापासून दूर होण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी सध्या शेती असूनही दुसरीकडे कामधंदा शोधण्यासाठी स्थलांतरित होताना दिसत आहेत. इतकी गंभीर बाब असूनही या शेतकऱ्यांच्या समस्येकडे सहानुभूतीने पाहण्यासाठी कोणी वालीच नाही का, असा प्रश्न पडत आहे.

गव्यांची संख्या मोठी

या भागात दिवसेंदिवस गव्यांची संख्या वाढत असून सध्या या भागामध्ये दहा-बारा गवे असलेले चार-पाच कळप सतत वेगवेगळ्या भागात फिरत आहेत. सायंकाळ होताच हे गवे पिकात शिरून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. शिवाय शेतीचे बांध त्यांच्या वजनदार पायामुळे फुटून जातात. त्यामुळे शेतातील पाणीसाठा कमी होऊन शेतकऱ्याला पाणी समस्येलाही सामोरे जाण्याची नामुष्की येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article