For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संशोधनाच्या व्यापक कक्षा

06:30 AM Feb 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
संशोधनाच्या व्यापक कक्षा
Advertisement

शिक्षण आणि संशोधन या पारंपरिक स्वरुपात परस्परपूरक आणि परस्पर परिणामकारक अशा बाबी राहिल्या आहेत. बऱ्याचदा तर संबंधित विषयाचा शैक्षणिक आयाम कुठे संपतो आणि संशोधनाचा परिघ कुठे सुरू होतो तेच कळेनासे होते. सुदैवाने गेली काही वर्षे शासन-प्रशासनच नव्हे तर विद्यापीठ-संशोधन संस्थांसह विविध शैक्षणिक संस्था इ. संशोधनाला जे प्राधान्य आणि प्रोत्साहन देत आहेत त्यातून शिक्षण व संशोधन या उभय क्षेत्रात नव्या स्वरुपात विविध संधी उपलब्ध होत असून त्या महत्त्वाच्या ठरल्या आहेत.

Advertisement

शिक्षण व संशोधन या क्षेत्राला आता राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय परिघ प्राप्त झाला आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या 2022-23 या वर्षीच्या ‘जी-20’ च्या आयोजनात शैक्षणिक संदर्भात जागतिक स्तरावर जे विचार मंथन झाले ते दूरगामी स्वरुपात परिणामकारक ठरते. या विचार विमर्षातून आंतरराष्ट्रीय स्तरावर परस्पर सहकार्याच्या माध्यमातून व नव्या आणि नाविन्यपूर्ण स्वरुपात शैक्षणिक विकासावर चर्चा तर झालीच, मुख्य म्हणजे या चर्चेचा भर संशोधनावर होता.

या शैक्षणिक प्रयत्नांच्या पहिल्या टप्प्यात स्थायी ऊर्जा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्यात सुधारणा, वातावरणातील बदल व सुधारणा, विविध क्षेत्रातील जोखीम व त्याचे नियोजन, विज्ञान, तंत्रज्ञान विषयक विविध आयाम, संस्कृती, परंपरा व या साऱ्यासाठी संशोधनावर आधारित संशोधन पद्धती विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळेच भारत आणि भारतीय यांच्या या उपक्रमाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटणे सहज शक्य आहे. यातूनच भारतीयांच्या बौद्धिक व संशोधन कौशल्याला जागतिक मान्यता मिळू घातली आहे.

Advertisement

संशोधनाला मिळणारा वाढता प्रतिसाद व विषयांना मिळणारा वाढता प्रतिसाद आणि त्याची परिणामकारकता लक्षात घेता केंद्र सरकारने विशेष धोरणात्मक निर्णयांतर्गत अनुसंधान-नॅशनल रिसर्च फाऊंडेशनची स्थापना केली. या शीर्षस्थ संस्थेद्वारा 2009 मध्ये स्थापन झालेल्या सायन्स अँड रिसर्च बोर्ड या संशोधन उपक्रमाला अधिक व्यापक स्वरुप व बळकटी प्राप्त झाली हे या संदर्भात उल्लेखनीय आहे.

सद्यस्थितीत केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने ‘अनुसंधान’ उपक्रम निवडक व महत्त्वपूर्ण क्षेत्रात राबविला जात आहे. त्यानुसार शिक्षणाच्या जोडीला विविध क्षेत्रांशी संबंधित व निगडित असणाऱ्या विषयांच्या  संशोधनाला प्राधान्य दिले जात आहे. यामध्ये देशांतर्गत प्रस्थापित महाविद्यालये, तंत्रज्ञान संस्था व संशोधन संस्थांना प्रोत्साहन दिले जात असून त्यांना आवर्जून समाविष्ट करण्यात येते. या प्रयत्नातून शिक्षण संशोधन क्षेत्रात मार्गदर्शन  करतानाच समन्वयाचे काम साधले जात आहे. यामध्ये सरकारी विभाग आणि संस्थांचे सहकार्य उपलब्ध करण्यात येते.

‘अनुसंधान’ या संशोधन उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रीयच नव्हे तर विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व व्यापक जिव्हाळ्याच्या विषयांना प्राधान्य दिले जात आहे. यामध्ये स्वच्छ पेयजल उपलब्ध करून देणे, सार्वजनिक स्वच्छता, नैसर्गिक स्त्रोतांवर आधारित ऊर्जा, सामाजिक आरोग्य या आणि यासारख्या विषयांचा प्राधान्य सूचित समावेश करण्यात आला आहे. या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक सामायिक व सहकार्याच्या आधारावर व्यापक व्यासपीठ आता ‘जी-20’ च्या माध्यमातून उपलब्ध झाले असून त्यातील भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

संशोधन प्रकल्प व प्रयत्नांना सम्यक स्वरुप मिळावे यासाठी ‘अनुसंधान’ द्वारा संशोधन क्षेत्रातील प्रगत संस्था या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व नव्याने सहभागी होणाऱ्या विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमध्ये सल्ला व मार्गदर्शनाच्या जोडीलाच विशेष प्रकल्पांसाठी विशेष सहकार्य उपलब्ध केले जाईल. यातून शिक्षण, संशोधन क्षेत्रातील समविचारी संस्था व त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या माहिती, तंत्रज्ञान, अद्ययावत संदर्भ, वाचनालये व सामुग्री याशिवाय विभिन्न विषय, विषयतज्ञ आणि त्यांचे अनुभव यांचे मोठे फायदेशीर आदान-प्रदान होणार आहे.

दरम्यान  आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त अशा जागतिक नाविन्यता स्तर (ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स) नुसार 2015 मध्ये भारताचे असणारे 81 वे स्थान 2022 मध्ये 40 व्या क्रमांकावर आले आहे. भारताच्या या संशोधनपर व बौद्धिक प्रगतीला आर्थिक विकासाची साथ मिळाल्याने यातील शाश्वत प्रगती लक्षात येते. दरम्यान भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी)च्या 0.65 टक्के रक्कम संशोधन क्षेत्र आणि प्रकल्पांवर खर्च होत आहे.

महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर संशोधनाला मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे भारतीय संशोधनक्षेत्रात गेल्या 5 वर्षात सुमारे 54 टक्केची घसघशीत वाढ झाली असून ही बाब अनेक कार्यांनी उत्साहवर्धक ठरली आहे. आता आवश्यकता होती या संशोधन साहित्य-प्रकाशनाची जागतिक स्तरावर अधिक आणि परिणामकारक  दखल घेण्याची. टक्केवारीच्या संदर्भात भारतीय संशोधनाची जागतिक पातळीवर दखल सुमारे 15 टक्केपर्यंत सध्या घेतली जाते. याला आता अधिक गती मिळणे अपेक्षित आहे.

‘अनुसंधान’ व त्याअंतर्गत संशोधन प्रकल्पांद्वारे भारतीय उद्योगांच्या नजिकच्या पुढील भविष्यातील गरजांची सांगड प्रामुख्याने घालण्यावर भर देण्यात येणार आहे. यामुळे उद्योग-व्यवसायाची प्रदीर्घ काळापासून असणारी माहिती व अद्ययावत तंत्रज्ञानाची गरज पूर्ण होण्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रबद्ध स्वरुपात व मुळातून प्रयत्न आणि संशोधन केल्यास त्याचा लाभ दूरगामी स्वरुपात उद्योग व्यवसाय व समाज आणि देश या सर्वांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संदर्भात होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर आता ‘जी-20’ नंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनाला गती मिळणार आहे. यासाठी विशेष रक्कम उपलब्ध केली जाणार आहे. यातून नजिकच्या काळात संशोधन केंद्र विकसित होणे अपेक्षित आहे. यातून अनेक आव्हानांना तोंड देणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आता शक्य होणार आहे. यातून संशोधनातून उद्योग-तंत्रज्ञानाचा विकास होऊन त्याचे फायदे सर्वदूर  होणार आहेत.

याचाच पुढचा टप्पा म्हणून आता महाविद्यालय विद्यापीठ व समूह संस्था आपापल्या स्तरावर व सामूहिक स्वरुपात प्रयत्न करून संशोधक-अभ्यासक, संशोधन संस्था व विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यासाठी नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरमची स्थापना केली गेली. या फोरमची मुख्य जबाबदारी शिक्षणाला तंत्रज्ञानासह संशोधन अशी निश्चित करण्यात आली. या प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरुप देण्यासाठी व त्यामध्ये विविध विषय आणि विविध कक्षा व्यापक करण्यासाठी ‘मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च इंप्रुव्हमेंट इन टेक्निकल एज्युकेशन’ (एमईआरआयटीई)ची निर्मिती झाली व या प्रयत्नांना गती मिळत गेली.

त्यानंतर देशांतर्गत विविध विद्यापीठ आणि संशोधन संस्था व त्यांचे समूह यांच्याशी व विविध उद्योग आणि संशोधन संस्था विद्यमान आणि प्रस्तावित गरजा लक्षात घेऊन त्यानुसार संशोधनाचे क्षेत्र, विषय यांचा तपशील आणि त्याची प्राथमिकता निश्चित करण्यात येते. यामुळे या साऱ्याच संशोधनपर प्रयत्नांना सुसूत्रता प्राप्त झाली. त्यानुसार आता विशिष्ट उद्देश आणि उद्देशांसह व कालबद्ध स्वरुपात संशोधन आता अधिक साध्य झाले आहे.

दरम्यानच्या काळात केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत शिक्षण, तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनावर विशेष भर दिला आहे. त्यादृष्टीने अशा नव्या व विशेष संशोधनाला आता प्राधान्य देण्यात येईल. याला आता संगणकीय दृष्ट्या सहकार्य दिले जाईल व त्यामुळे या संशोधन उपक्रमाला अधिक वेग मिळेल. यासाठी संगणकीय पद्धतींची मदत आणि मार्गदर्शन देण्यासाठी नियोजन झाले आहे. ‘जी-20’ च्या निमित्ताने भारत आणि भारतीयांच्या शिक्षण संशोधन क्षेत्रात नव्या संधी लाभल्या आहेत. या संधींचा सफल व यशस्वीपणे उपयोग करण्याचे आव्हानपर काम करणे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.

- दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :

.