निकराचा सामना
जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची अर्थात आपल्या भारत देशाची केंद्रातील सरकार निवडण्यासाठीची लोकसभेची निवडणूक चौथा टप्पा पार करून अंतिम चरणाकडे हळुहळु पुढे सरकते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी महाराष्ट्राचा दौरा करत रोड शो आणि सभांचा सपाटा लावला. महाराष्ट्रात पाचवा आणि अंतिम टप्पा येत्या 20 मे रोजी ठाणे, मुंबई अशा महानगरांचा आहे. या टप्प्यानंतर महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया मशिनबंद होईल व केवळ चार जून रोजी लागणाऱ्या निकालाची आणि दोन जूनपासून सुरू होणाऱ्या एक्झिट पोलची प्रतीक्षा होईल. देशात अन्यत्र मतदानाचा सहावा व सातवा टप्पा अद्याप बाकी आहे. सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्हीकडचे सैन्य त्यासाठी पळापळ करेल. साम, दाम, दंड भेद सारी आयुधं त्यासाठी वापरली जातील. जोडीला निवडून आलेले काही पक्ष, अपक्ष आपलेसे करायचाही प्रयत्न नाकारता येत नाही. सुरूवातीला भाजपा व राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांना सोपी वाटणारी आणि अबकी बार चारसौ पारचा नारा देणारी ही निवडणूक अंतिम चरणाकडे जाताना काटे की टक्कर बनल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सर्वच नेत्यांची बोली आणि देहबोली बदलली आहे. अमित शहा वगैरे काही भाजपा नेते आत्तापर्यंत झालेल्या चार टप्प्यांच्या मतदानात भाजपा व एनडीए आघाडीला बहुमत निश्चित झाले असून उर्वरीत तीन टप्प्यात चारसौ पारचा आकडा गाठणार असे म्हणत असले तरी त्या म्हणण्यात पूर्वीचा जोर आणि विश्वास दिसत नाही. याउलट इंडिया आघाडीतील राहूल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे यांचे चेहरे फुलले आहेत. भाजपा महायुती पायउतार होणार असे ते उच्चारवात सांगत आहेत. शेवटी मतदारांच्या मनात काय हे चार जूनलाच स्पष्ट होणार आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वीच्या एका सभेत बोलताना यंदाची लोकसभेची निवडणूक कोणत्याही विषयावर केंद्रीत नाही असे वारंवार म्हटले आहे. पण, प्रचार सभा, भाषणे पाहता ही निवडणूक मोदी पुन्हा सत्तेत हवेत की नको या मुद्यावर होताना दिसते आहे. यामुळे मोदी की जादू, मोदी की गॅरंटी चालते की जनता पुन्हा काँग्रेस व मित्रपक्षांच्या इंडिया आघाडीला डोक्यावर घेतात हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. येणाऱ्या लोकसभेत सर्वात मोठा पक्ष भाजपा असेल याबाबत कोणासही शंका नाही, ओघाने राष्ट्रपती सरकार बनवण्यासाठी भाजपला मोदींना प्रथम बोलावतील, भाजपा व रालोआकडे आवश्यक 273 हा जादुई आकडा असला तर मग कोणताच पेच उरणार नाही. पण, या आकड्यासाठी पंचवीस तीस जागा कमी पडल्या तर दिल्लीत घोडेबाजार आणि सत्तेचा खेळ होणार हे सांगायला ज्योतिषी नको. अशा खेळात आणखी काही फुटतील, अपक्ष इकडे तिकडे धावतील. कॉमन मिनीमम प्रोग्रॅम सारखे कागद नाचवले जातील आणि दिल्लीत बाजार भरेल. आत्तापर्यंत जे चार टप्प्यांचे मतदान झाले आहे त्याचे एक्झिट पोल निवडणूक आयोगाच्या कामकाज पद्धतीनुसार शेवटचा टप्पा पार पडेपर्यंत जाहीर करता येत नाही पण, हा नियम झाला. बडे नेते खासगीत ही माहिती मिळवू शकतात व त्या आधारे आपला प्रचार बदलूही शकतात. निवडणुकीत ग्रामीण भारत आणि शहरी भारत असे भेद दिसलेच. शहरी भागात महागाई, बेरोजगारी, आरक्षण हे मुद्दे तीव्र दिसले. महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा अतिशय संवेदनशील विषय आहे. आणि मराठा विरूद्ध ओबीसी असा संघर्षही दिसतो आहे. महाराष्ट्रात आणि देशात झालेल्या मतदानाचा टक्का घसरला आहे. त्यांचा लाभ कोणाला झाला हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. पण, जाती जातीतील संघर्ष, पक्षामधील उभी फुट, खालच्या भाषेतील प्रचार, ंटीका टिप्पणी याचा फटका मतदानाला बसला असे दिसते. महाराष्ट्रातील मराठे दिलेल्या स्वतंत्र दहा टक्के आरक्षणावर खूश नाहीत. त्यांचा सरकारवर रोष दिसतो आहे. जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाची तारीख जाहीर केली आहे. आणि संबंधिताना असे पाडा की चार पिढ्या उठता कामा नयेत असे मार्गदर्शन केले आहे. जरांगे प्रभाव मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह इतरत्रही जाणवेल व जातदांडगे, धनदांडगे याचबरोबर मतदांडगे नेते लोकशाही आपणास हवी तशी वळवू शकतात. हे अधोरेखित होईल. महाराष्ट्रात आम्ही पंचेचाळीस जागा जिंकू, असे भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आम्ही 35 जागा जिंकू असे शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण सांगत आहेत. गेल्या निवडणुकीत ओबीसी व बऱ्याच प्रमाणात मराठा समाज भाजपाबरोबर दिसला. यंदाच्या निवडणुकीत मराठा, ओबीसी, मुस्लीम व मागास अशा जाती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भूमिकेत आहेत आणि ग्रेट मराठा नेते असे ज्यांना म्हटले जाते ते शरद पवार व ज्यांनी महायुती तोडून काँग्रेसला मिठी मारली व स्वत:चे चाळीस आमदार, पक्षचिन्ह गमावले व ते उद्धव ठाकरे यांना सहानुभूती निर्माण झाली आहे असे मानले जाते. शेवटी मतदारांच्या मनात काय हे सांगता येत नाही पण, निवडणुकीनंतर एका पक्षाचे भक्कम सरकार येणार की नाही या भीतीने देशातील शेअर बाजार कोसळताना दिसतो आहे. देशाची अर्थव्यवस्था भक्कम व स्थिर हवी तर केंद्रात मजबूत सरकार हवे असते. लोकांनी कोणत्याही पक्षाला बहुमत दिले नाही तर काय होते हे वेगळे सांगायला नको. महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना महायुतीला स्पष्ट कौल दिला होता. पण, नवी संधी दिसताच उद्धव ठाकरे यांनी महायुती तोडून आघाडीचा शरद पवारांचा हात धरला आणि महाराष्ट्रात राजकारणाचा फोडाफोडीचा, पेट्यांचा खेळ झाला. केंद्रातही जनता पक्षाच्या काळात वेगळे काही झाले नाही. ओघानेच उर्वरित दोन तीन टप्प्यांचे मतदान कसे होते, कोणाला होते यावर अनेकांचे आणि देशाचे भवितव्य ठरणार आहे. लोकसभेच्या निवडणुकी पाठोपाठ महाराष्ट्रात विधानसभा व मुंबई महापालिका निवडणूक आहे. ओघानेच देशातील मतदारांचा कौल महाराष्ट्रात परिणाम घडवू शकतो. लोकांचा अंदाज कोणालाच लागत नाही. लोक हुशार असतात, ते राजकीय पक्षांना, नेत्यांना जागेवर ठेवतात पण, राजकारणात जोरात वादळ उठले आहे ते कोणाची टोपी उडवते ते बघायचे. या साऱ्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी एनडीए व विरोधी इंडिया आघाडी यांच्यात निकराचा सामना सुरू आहे.