विकेटकिपर वृद्धिमान साहाची निवृत्तीची घोषणा
रणजी हंगामानंतर क्रिकेटला करणार अलविदा
वृत्तसंस्था/ कोलकाता
टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो बराच काळ भारताच्या कसोटी संघाचा सदस्य होता. परंतु नंतर खराब फॉर्ममुळे त्याला वगळण्यात आले. यानंतरही तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय होता पण आता त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. सध्या रणजी ट्रॉफी ही त्याची व्यावसायिक क्रिकेटमधील शेवटची स्पर्धा असेल. 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध तो आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
क्रिकेटमधील संस्मरणीय प्रवासानंतर हा रणजी हंगाम माझा शेवटचा असेल. निवृत्त होण्यापूर्वी मला बंगालचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. अशा आशयाची सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. वृद्धिमान साहाने 2010 ते 2021 पर्यंत भारतासाठी 40 कसोटी सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने टीम इंडियासाठी 9 एकदिवसीय सामने खेळले आहेत. मात्र, त्याला आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. साहाने भारतासाठी 40 कसोटी सामन्यात 1353 धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 117 होती. वनडेमध्ये त्याला काही विशेष कामगिरी करता आलेली नाही. साहाने टीम इंडियासाठी 9 वनडे सामन्यात केवळ 41 धावा केल्या.
प्रथमश्रेणी क्रिकेटचा मोठा अनुभव
साहाला प्रथम श्रेणी क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. तो 2007 पासून आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. बंगाल व्यतिरिक्त तो त्रिपुराकडून खेळला आहे. त्याने 138 सामन्यांच्या 203 डावांमध्ये 35 वेळा नाबाद राहून एकूण 7013 धावा केल्या. याशिवाय त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 14 शतके आणि 43 अर्धशतके झळकावली आहेत.