केएल राहुल, ध्रुव जुरेलचा भारत अ संघात समावेश
दुसऱ्या अनधिकृत कसोटीत खेळणार : तातडीने ऑस्ट्रेलियाला रवाना
वृत्तसंस्था/ मुंबई
मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत सुपडासाफ झाल्यानंतर टीम इंडिया आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे स्वप्न साकार करण्यासाठी बॉर्डर-गावसकर मालिकेत दिमाखदार व ऐतिहासिक कामगिरी करावी लागणार आहे. बीसीसीआय व निवड समितीने आगामी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून आगामी कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर केएल राहुल व ध्रुव जुरेल या दोन खेळाडूंना तातडीने ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोघांचाही भारत अ संघात समावेश झाला असून, बॉर्डर-गावसकर मालिकेआधी यांच्याकडे सरावाची चांगली संधी असेल.
केएल राहुल मागील काही काळापासून खराब फॉर्ममधून जात आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत तो फ्लॉप ठरला होता, त्यानंतर त्याला शेवटच्या 2 कसोटीतून वगळण्यात आले. आता बीसीसीआयने राहुलबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केएल राहुलसह यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला भारत अ संघात सामील केले आहे. हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना होतील आणि ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या चार दिवसीय अनधिकृत कसोटीत खेळतील. हा सामना 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान खेळला जाईल.
केएलला आणखी एक संधी
सरफराज खानच्या अपयशामुळे पुन्हा एकदा भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये राहुलचा समावेश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देते. अशा परिस्थितीत बीसीसीआयसह टीम इंडिया व्यवस्थापनाने राहुलला भारतीय संघात सामील करून घेण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून तो तिथे खेळून फॉर्ममध्ये येण्याचा प्रयत्न करू शकेल आणि तिथल्या खेळपट्टीनुसार स्वत: ला जुळवून घेऊ शकेल. याचा फायदा राहुल आणि टीम इंडियाला बॉर्डर-गावसकर मालिकेत होऊ शकतो. ध्रुव जुरेलला फारशी संधी मिळाली नसली तरी या सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा त्याचा मानस असणार आहे.
पहिल्या कसोटीत रोहित खेळण्याची शक्यता कमी
22 नोव्हेंबरपासून टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होत आहे. कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्या जागी अभिमन्यू ईश्वरन यशस्वी जैस्वालसह डावाची सुरुवात करु शकतो. रोहितच्या अनुपस्थितीत बुमराह संघाचे नेतृत्व करु शकतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी करणारा हा सलामीवीर ऑस्ट्रेलियातही आपला फॉर्म कायम ठेवेल, अशी आशा संघाला आहे. शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. पण त्याचा ऑस्ट्रेलियातील रेकॉर्ड चांगला आहे. कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल आणि आपला फॉर्म पुन्हा मिळवण्यात यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे.
टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-0 ने जिंकू शकत नाही, सुनील गावसकरांचे भाकीत
मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 0-3 ने गमावल्यानंतर भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. बांग्लादेशविरुद्धची कसोटी मालिका जिंकून भारतीय संघाने आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा वाढवल्या होत्या. मात्र न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर समीकरण पूर्णपणे बदलले. भारताने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली असती तर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर दोन विजय पुरेसे ठरले असते. मात्र या पराभवाने भारतीय संघाची अंतिम फेरी गाठण्याचे सारे गणितच बिघडले. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी घसरली असून अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामने जिंकावे लागतील. अशा स्थितीत भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळणार आहे. या दोघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका जिंकून भारत इतिहास रचू शकतो. कारण ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सलग दोनदा जिंकण्यात भारताला यश आले आहे. पण या दौऱ्यापूर्वी भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी एक भविष्यवाणी केली आहे. भारतीय संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलऐवजी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिका जिंकण्यावर भर द्यावा, असे मत गावसकर यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले, मला वाटत नाही की भारत ऑस्ट्रेलियाला 4-0 ने पराभूत करू शकेल. जर तसे झाले तर ती एक मोठी उपलब्धी असेल, परंतु सध्या अपेक्षा ठेवणे योग्य नाही. सध्याच्या घडीला संघाने फक्त जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मालिका 1-0, 2-0 किंवा 3-1 अशी फरकाने जिंका. जा आणि जिंका हेच भारतीय चाहत्यांना सध्या तुमच्याकडून अपेक्षित आहे, असेही ते पुढे म्हणाले.
झोपलेला भारतीय संघ क्लीन स्वीपने जागा झाला : जोस हेजलवूड
22 नोव्हेंबरपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळणार आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने भारताबद्दल मोठे वक्तव्य केलं आहे. या मालिकेपूर्वी हेजलवूडने सिडनी मॉर्निंग हेराल्डला सांगितले की, या क्लीन स्वीपने कदाचित झोपी गेलेला संघ जागा होईल. आता जेव्हा ही टीम आमच्या समोर येईल, तेव्हा आम्ही तयार असू. या पराभवामुळे नक्कीच भारतीय संघाच्या आत्मविश्वासाला थोडा धक्का बसला असेल. त्यांच्या संघाचे अनेक फलंदाज येथे खेळले आहेत, पण काही फलंदाज असे आहेत जे खेळले नाहीत. पण तरीही आम्ही कमी भारतीय संघाला कमी लेखणार नाही.