विंडीज हरता हरता जिंकले
दुबळ्या पापुआ न्यू गिनीने दिली तगडी टक्कर : विंडीज 5 गड्यांनी विजयी, रोस्टन चेस सामनावीर, सेसे बॉचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/ जॉर्जटाऊन
टी-20 विश्वचषक स्पर्धेतील रविवारच्या क गटातील दुसऱ्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजला विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. पापुआ न्यू गिनी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 136 धावा केल्या. यानंतर दुबळ्या पापुआ संघाने वेस्ट इंडिजला चांगली झुंज दिली आणि सहज सामना जिंकू दिला नाही. विंडीजने विजयी लक्ष्य 19 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. रोस्टन चेसने 27 चेंडूत नाबाद 42 धावा करत विंडीजच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
पापुआ संघाने विजयासाठी दिलेल्या 137 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जॉन्सन चार्ल्सला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर ब्रेंडॉन किंग व निकोल्स पूरन यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला सावरले. पूरनने 27 चेंडूत 27 धावा केल्या तर किंगने 29 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले. नवव्या षटकांत पूरनला कारिकोने बाद करत ही जोडी फोडली. पाठोपाठ किंगही बाद झाला. यानंतर कर्णधार रोव्हमन पॉवेल (15) व रुदरफोर्ड (2) हे दोघेही स्वस्तात बाद झाले. लागोपाठ विकेट गेल्याने 16 व्या षटकांत विंडीजची 5 बाद 97 अशी स्थिती होती. यावेळी रोस्टन चेस आणि आंद्रे रसेल यांनी 18 चेंडूत नाबाद 37 धावा जोडून संघाला विजय मिळवून दिला. रोस्टन चेसने 27 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 42 धावा केल्या. तर रसेलने 9 चेंडूत 1 षटकाराच्या मदतीने 15 धावा केल्या.
या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून पीएनजीला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजच्या अचुक गोलंदाजीसमोर पीएनजीचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. पीएनजी संघातील सेसे बॉच्या समयोचित अर्धशतकामुळे पीएनजीने 20 षटकात 8 बाद 136 धावा जमविल्या. बॉने 43 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 50 तर कर्णधार आसद वालाने 22 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 21, चार्ल्स अमिनीने 12, तसेच डोरीगाने 18 चेंडूत नाबाद 27 धावा आणि सोपेरने 10 धावा जमविल्या. अमिनी आणि बॉ यांनी पाचव्या गड्यासाठी 44 धावांची भागीदारी केली. पीएनजीने पॉवरप्लेच्या 6 षटकात 34 धावा जमविताना 3 गडी गमविले. बॉने 42 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह अर्धशतक झळकविले.
आंद्रे रसेलने 19 धावांत 2 बळी टिपत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बळींचे अर्धशतक पूर्ण केले. त्याचे आता 51 बळी झाले असून असा बहुमान मिळविणारा विंडीजचा तो सहावा गोलंदाज आहे.
संक्षिप्त धावफलक : पीएनजी 20 षटकात 8 बाद 136 (बॉ 50, असद वाला 21, अमिनी 12, डोरीगा नाबाद 27, सोपेर 10, अवांतर 9, आंद्रे रसेल व जोसेफ प्रत्येकी 2 बळी, अकिल हुसेन, शेफर्ड, मोती प्रत्येकी 1 बळी)
वेस्ट इंडिज 19 षटकांत 5 बाद 137 (ब्रेंडॉन किंग 34, निकोलस पूरन 27, रोस्टन चेस नाबाद 42, रोव्हमन पॉवेल 15, आंद्रे रसेल नाबाद 15, असद वाला दोन बळी, कारिको, सोपेर, नाओ प्रत्येकी एक बळी)