न्यूझीलंड-विंडीज दुसरी कसोटी आजपासून
किविज संघात अष्टपैलू ग्लेन फिलीप्सचे पुनरागमन
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
यजमान न्यूझीलंड आणि विंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटीला येथे बुधवारपासून प्रारंभ होत आहे. या कसोटीसाठी घोषित करण्यात आलेल्या न्यूझीलंड संघामध्ये अष्टपैलू ग्लेन फिलीप्सचे पुनरागमन झाले आहे.
उभय संघात ही तीन सामन्याची कसोटी मालिका विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळविली जात आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत जस्टीन ग्रिव्ह्सच्या नाबाद द्विशतकाने तसेच शाय होपच्या शतकामुळे विंडीजने न्यूझीलंडला विजयापासून रोखत सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळविले. चालु वर्षाच्या प्रारंभी झालेल्या आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेनंतर स्नायु दुखापतीमुळे फिलीप्सला संघात स्थान मिळू शकले नाही. नोव्हेंबर अखेरीस 29 वर्षीय फिलीप्सने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये दुखापतीनंतर पुनरागमन केले आहे. त्याची ही स्नायु दुखापत आता पूर्णपणे बरी झाली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये फिलीप्सने हॅमिल्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत आपला सहभाग दर्शविला होता. त्यानंतर त्याचीही पहिली कसोटी आहे.
न्यूझीलंड संघामध्ये मॅट हेन्री, नाथन स्मिथ, टॉम ब्लंडेल आणि मिचेल सँटेनर यांना दुखापतीमुळे या कसोटीत खेळता येणार नाही. त्यामुळे या दुसऱ्या कसोटीसाठी न्यूझीलंड संघात दोन नवे चेहरे कसोटी पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. वेगवान गोलंदाज क्रिस्टन क्लार्क, मिचेल रेई यांना अंतिम 11 खेळाडूत स्थान मिळण्याची शक्यता आहे. आता डफीला गोलंदाजीमध्ये क्लार्क आणि रेई यांची साथ मिळू शकेल.
न्यूझीलंड संघ: टॉम लॅथम (कर्णधार), ब्रेसवेल, क्रिस्टन क्लार्क, देवॉन कॉन्वे, जेकॉब डफी, फोकेस, मिचेल हे, डॅरियल मिचेल, फिलीप्स, मिचेल रेई, रचिन रविंद्र, टिकनेर, केन विलियमसन, व्हिल यंग
विंडीज संघ: रॉस्टन चेस (कर्णधार), वारीकेन, अॅथनेझ, कॅम्पबेल, चंद्रपॉल, ग्रिव्हेस, हॉज, शाय होप, इमालेच, ब्रेन्डॉन किंग, जोहान लेन, अॅन्डर्सन फिलीप, केमर रॉच, जेडेन सील्स, शिल्ड्स.