For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इमारत चांगली असतानाही स्थलांतरणाचा घाट कशासाठी ?

06:55 AM Nov 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
इमारत चांगली असतानाही स्थलांतरणाचा घाट कशासाठी
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

गणपत गल्ली येथील कोंबडी बाजार परिसरातील सरकारी मराठी मुला-मुलींची शाळा बंद करण्याचा घाट गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून घातला होता.  इमारत धोकादायक असल्याचे कारण देत शाळेचे स्थलांतरण करण्यात येणार होते. परंतु प्रत्यक्षात पाहता शाळेची इमारत अतिशय भक्कम असून, केवळ छतावर पत्रे घालण्यासाठी निधी मंजूर करून देण्याची मागणी माजी विद्यार्थी तसेच पालकांमधून केली जात आहे.

कोंबडी बाजार येथील मनपाच्या इमारतीत अनेक वर्षांपासून शाळा भरविली जाते. नजीकच्या भातकांडे गल्ली, पांगुळ गल्ली, कडोलकर गल्ली या भागातील विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. सर्वत्र इंग्रजी माध्यमाचे पेव फोफावले असताना येथील मराठी शाळा तग धरून आहे. परंतु गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून शाळा बंदचा घाट घातला होता.

Advertisement

इमारतीवर पत्रे नसल्यामुळे शाळेतील वरच्या मजल्यावर गळती लागली आहे. या दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष करत शाळाच गणपत गल्ली कॉर्नर कंबळी खूट येथील मराठी शाळा क्र. 1 मध्ये स्थलांतरीत करण्यात आली. इमारत धोकादायक असल्याचे वरवरचे कारण देण्यात येत असले तरी शाळा स्थलांतरणामागचे मुख्य कारण अद्याप समोर आलेले नाही. याच इमारतीत दुकानगाळे आहेत. बालवाडी भरविली जाते मग मराठी शाळाच स्थलांतरण करण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न माजी विद्यार्थ्यांमधून व्यक्त केला.

सध्या पाऊस थांबला असल्याने दुरूस्ती करणे शक्य आहे. अनेक सरकारी शाळांवर शिक्षण विभागाने पत्रे घातले आहेत. त्याचप्रकारे या शाळेवरही पत्रे घालण्याची मागणी केली आहे. काहीही झाले तरी याच इमारतीत शाळा भरविली जाणार, अशी भूमिका पालकांनी घेतल्यामुळे शिक्षण विभागाला नमते घ्यावे लागणार आहे.

Advertisement
Tags :

.