For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘काठावर पास’ झालेल्यांचा एवढा जल्लोष कशासाठी?

11:38 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘काठावर पास’ झालेल्यांचा एवढा जल्लोष कशासाठी
Advertisement

काँग्रेसच्या ’चारसौ पार’ च्या टीकेला भाजपचे प्रत्युत्तर : काँग्रेसचा नैतिक पराभव

Advertisement

पणजी : आम्ही गुणवत्ता श्रेणी मिळविण्याच्या प्रयत्नात होतो, परंतु टक्केवारी किंचित चुकली आणि प्रथम वर्गात झळकले. असे असताना आता ‘काठावर पास’ झालेले जल्लोष करत आहेत, अशा शब्दात भाजप प्रवक्ता गिरीराज वेर्णेकर यांनी काँग्रेसच्या ‘400 पार’ वरून होणाऱ्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. गुऊवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार संकल्प आमोणकर आणि माजी आमदार दयानंद सोपटे यांचीही उपस्थिती होती.

एकट्या भाजपला 240 जागा 

Advertisement

रालोआतील एकट्या भाजपने 240 जागा मिळविल्या आहे. ती संख्यासुद्धा ‘इंडी’ आघाडीला पार करता आली नाही. दुसऱ्या बाजूने आम आदमी पक्ष तर पार तोंडघशीच पडला आहे. या पक्षाच्या झालेल्या दैनावस्थेची फळे ‘इंडी’ला भोगावी लागली. अशा परिस्थितीत काँग्रेसला जी सत्तेची स्वप्ने पडत आहेत ती कोणाच्या बळावर? असा सवाल वेर्णेकर यांनी उपस्थित केला. भाजपला ओडिशात मिळालेल्या यशाचा काँग्रेस कुठेच उल्लेख करत नाही यावरून त्यांची मानसिकता दिसून येते, असे वेर्णेकर म्हणाले. काँग्रेसला दक्षिण गोव्यात विजय मिळालेला असला तरी प्रत्यक्षात त्यांचा नैतिक पराभवच झालेला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

युती टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करावे

सोपटे यांनीही बोलताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. 2027 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळविण्याची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेसने आधी विद्यमान युती टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करावे. ही युती पुढील तीन ते चार महिन्यातच फिसकटणार आहे, असा दावा करताना सोपटे यांनी 2027 मध्ये 30 पारचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसने ‘दुहेरी’ संख्याच पार करून दाखवावी, असे आव्हान दिले.

भाजपच्या टक्केवारीत निश्चितच वाढ

संकल्प आमोणकर यांनी बोलताना 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस, तसेच आम आदमी पक्षाला मिळलेल्या मतांची टक्केवारी तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील टक्केवारीचा आढावा घेतला. त्यावरून भाजपच्या मतांच्या टक्केवारीत निश्चितच वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. याऊलट यंदा आरजी वगळता अन्य सर्व पक्ष एकत्र येऊनसुद्धा त्यांना एवढी मते मिळविणे शक्य झाले नाही, यावरून गोमंतकीय जनतेने इंडी आघाडीतील सर्व पक्षांना नाकारले असल्याचे स्पष्ट होत आहे, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात त्यांचा झालेला विजय हा किरकोळ टक्केवारीने मिळाला असून त्यासाठी एवढा जल्लोष आणि भविष्यात सत्तेची स्वप्ने पाहण्याची गरज नाही, असे आमोणकर म्हणाले. काँग्रेसची विद्यमान इंडी आघाडी ही क्षणभंगूर असून ती जास्त काळ टिकणार नाही, त्यामुळे स्वप्नांच्या दुनियेतून काँग्रेसने बाहेर यावे, असा सल्ला त्यांनी दिला.

Advertisement
Tags :

.