For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विषयत्यागाचा निश्चय का टिकत नाही?

06:02 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
विषयत्यागाचा निश्चय का टिकत नाही
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

स्थिरबुद्धि मनुष्याला सुख काय किंवा दु:ख काय दोन्हीही तात्पुरती आहेत हे लक्षात आलेलं असल्याने तो दोन्हीबाबत उदासीन असतो. त्याच्या ताब्यात इंद्रिये आलेली असतात आणि विवेकाने तो त्यांच्यावर नियंत्रण करत असतो. सतत चुळबुळत असलेल्या मनाला त्यानं ईश्वराच्या अनुसंधानात गुंतवून टाकलेले असते. त्यामुळे मनात इतर विचार येण्याचे हळूहळू बंद होते. निरपेक्षता संपूर्ण साध्य झाली की ब्रह्मप्राप्ती होते. ह्यामध्ये येणारा अडथळा असा की, निरपेक्षतेतून काही काळ मनुष्य विषयत्याग करण्यात यशस्वी होतो पण विषयांचे विचार त्याच्या मनातून जाता जात नसल्याने हळूहळू त्याचा निश्चय डळमळीत होतो आणि तो इंद्रियांच्या हट्टाला बळी पडल्याने विषयाचे सेवन केल्याशिवाय गप्प बसत नाही. नववर्षाच्या सुरवातीला केलेले निश्चय फारफार तर एखादा आठवडा किंवा दोन आठवडे टिकतात व पुढं त्यांची वासलात लागते कारण त्या विषयांचे मनातील विचार न गेल्यामुळे ते निश्चय टिकू शकत नाहीत.

यावर उपाय काय हा प्रश्न आपोआपच पुढे येतो. कारण विषयत्याग ही थोडे दिवस केले की, झाले अशी बाब नसते. यासाठी एकनाथी भागवतात भगवंत उद्धवाला असा सल्ला देतात की, मन कधी बळजबरीने वश होत नाही. त्याला समजुतीने सांगावं लागतं. अर्थात हा प्राथमिक उपाय झाला. काही काळ हा काम करतो. नंतर मनाला ईश्वरभक्तीत गुंतवावे म्हणजे त्याला हळूहळू विषयोपभोगांचे आकर्षण वाटेनासे होते. कारण त्याला कर्मयोगातून सेवेचा रस मिळू लागतो. तसेच ज्ञानयोगातून तत्वानुबोधाचा रस व भक्तियोगातून प्रेमाचा रस मिळू लागतो. विशेष म्हणजे हा रस कधीही न संपणारा असल्याने तो विषयांपासून मिळणाऱ्या तात्पुरत्या रसावर सहजी मात करतो. त्यामुळे माणसाच्या इच्छेनुसार त्यानं सोडलेल्या विषयांचे विचारही त्याच्या मनात यायचे बंद होऊ लागतात आणि हे ज्याप्रमाणात बंद होऊ लागतात त्याप्रमाणात माणसाला अत्यंत प्रिय असलेल्या विषयांचे आकर्षण हळूहळू कमी होत जाऊन एका क्षणी इंद्रिये त्याच्या स्वाधीन झालेली असतात. ज्याला इंद्रियजय साधायचा आहे त्यानं स्वत:ला अध्यात्माच्या अभ्यासात, ब्रह्मप्राप्तीच्या प्रयत्नात गुंतवून घ्यावं. ब्रह्मप्राप्तीनेच इंद्रियजय पूर्णत: साधला जातो. इतर कोणत्याही उपायाने साधलेला इंद्रियजय फार काळ टिकत नाही.

Advertisement

बाप्पाना हेही माहीत आहे की, माणसाच्या इंद्रियांचा विषयांशी येणारा संबंध हा जन्मोजन्मीचा असल्याने त्याला सांगितलेले कितीही पटले तरी सहजासहजी इंद्रियजय साधणे त्याला जमणारे नाही. अनेक जन्म इंद्रिये दाखवत असलेली प्रलोभनांना तो बळी पडत असतो. त्यामुळे ती अगदी ज्ञानी म्हणजे शिकल्या सवरलेल्या माणसालासुद्धा विषयांच्या उपभोगाकडे वळण्यासाठी वेगाने खेचून नेतात. म्हणून माणसाने जरी ठरवले तरी इंद्रिये त्याला सहजी दाद देत नाहीत. इंद्रियांचे प्राबल्य किती असते ते बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

विपश्चिद्यतते भूप स्थितिमास्थाय योगिन: ।

मन्थयित्वेन्द्रियाण्यस्य हरन्ति बलतो मन ।। 57 ।।

अर्थ- हे राजा, शहाणा मनुष्य योगाच्या मार्गाचा अवलंब करून वैराग्यप्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतो परंतु त्याची इंद्रिये खळखळ करून त्याचे मन विषयांकडे ओढतात.

विवरण-बाप्पा म्हणतात, विद्वान मनुष्य योगीजनांच्या पावलावर पाऊल टाकून इंद्रियजय साधण्याचा प्रयत्न करत असतो पण या इंद्रियांचे सामर्थ्य असे आहे की, ती खळखळ करून जबरदस्तीने त्याचे मन विषयांकडे ओढतात. माणसाने कितीही ठरवले आणि स्वत:ला निरनिराळ्या उपायांनी विषयोपभोगांपासून लांब ठेवायचा प्रयत्न केला तरी इंद्रिये तो सहजी हाणून पाडतात व त्याच्यावर बळजबरी करून त्याला विषयांकडे ओढतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.