महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रामावर शरसंधान कशासाठी ?

06:30 AM Jan 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अयोध्यानगरीतील रामजन्मभूमीच्या स्थानी साकारत असलेल्या भव्य राममंदिरात भगवान रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्याची तारीख जवळ येत चालली आहे. प्रभू रामचंद्र हे सर्व भारतीयांसाठी आदर आणि श्रद्धेचे अढळ स्थान आहे. अयोध्येचे राममंदिर हेही भारतासह जगभरातील सर्व रामभक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होत आहे. आज ज्याच्या त्याच्या तोंडी हाच विषय असून सर्वसामान्यांना या मंदिरासंबंधी, त्यात होणाऱ्या भगवान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेविषयी आणि एकंदरच त्यामुळे निर्माण झालेल्या वातावरणाची अपार उत्सुकता आहे. अशा या संवेदनशील स्थितीत प्रत्येकाचे, विशेषत: राजकीय नेत्यांचे आणि राजकारणाशी संबंधितांचे एक विशेष उत्तरदायित्व आहे. त्यांनी हे मंगलमय वातावरण दूषित करण्याचे प्रयत्न करु नयेत. तसे केल्याने त्यांचा कोणताही राजकीय लाभ तर होणार नाहीच. शिवाय ते जनतेच्या मनातून आणखी उतरतील.  त्यामुळे हानीच अधिक संभवते. नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्या होण्यापूर्वी काही नेत्यांनी ‘सनातन’ धर्मावर अत्यंत घृणास्पद भाषेत तोंडसुख घेतले. या धर्माला अनेक रोगांच्या जंतूंची उपमा दिली. अशा अश्लाघ्य प्रयत्नांचा परिणाम काय झाला, हे सर्व जाणतातच. त्याच कालावधीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक विश्वचषकासाठीचा अंतिम सामना झाला होता. भारताचा संघ त्यात दुर्दैवाने पराभूत झाला. पण त्या पराभवाचे खापर ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींची पनवती लागली’ अशा हास्यास्पद शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर फोडण्यात आले. कोणीतरी क्षणिक भावनेच्या भरात असे काही बोलले तर ते खपून जाईल. ते कोणी गांभीर्याने घेणार नाहीत. पण जेव्हा काही थोर नेते अशी भाषा जाहीररित्या करतात, त्यावेळी आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. स्वत:ला बुद्धीवादी आणि पुरोगामी म्हणवून घेणारे पत्रकारही जेव्हा अशा भाषेचे समर्थन करतात, तेव्हा तर कपाळावर हात मारुन घेण्याचीच वेळ सर्वसामान्यांवर येते. आता, या सध्याच्या रामभक्तीमय वातावरणातही असाच काही अनुभव येत आहे. काही नेत्यांनी या निमित्ताने प्रभू रामचंद्रांच्या आहाराविषयी आपले तोंड उघडले आहे. प्रभू रामचंद्र शाकाहारी होते की मांसाहारी, यावर प्रथम काही वादग्रस्त विधान करुन नंतर ‘कोणाच्या तरी भावना दुखावल्या असतील, तर मला खेद आहे’ अशी सारवासारवी चाललेली आहे. प्रभू रामचंद्र कोणताही आहार घेत असले, तरी आज तो मुद्दा संदर्भहीन आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्येत मद्य आणि मांस यांच्या विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. असे आपल्याकडे प्रत्येक सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी केले जाते. तेव्हा या प्रतिबंधांचा बाऊ करुन आणि प्रभू रामचंद्रांच्या आहाराशी त्याचा संबंध जोडण्यातून संकुचित वृत्ती तेव्हढी दिसून येते. बाकी काय साध्य होणार? आपल्याकडे कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्याचे किंवा सोहळ्याचे ‘राजकारण’ त्वरित केले जाते. विरोधी पक्षांचे विविध नेते अलीकडच्या काळात केंद्रात सत्ताधारी असणाऱ्यांना ‘राममंदिराचे राजकारण करु नका’ असा सल्ला देत आहेत. तसेच काही राजकीय नेत्यांच्या मते भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी हेच खरे राममंदिराचे शिल्पकार आहेत. कारण त्यांनी 1986 मध्ये राममंदिराचे दरवाजे उघडून दिले नसते, तर आज हे मंदीर दिसले नसते, असा काहीसा सूर ते लावतात. आम्ही विनम्रपणे त्यांच्या लक्षात हे आणून देत आहोत, की त्यावेळच्या बाबरीचे दरवाजे उघण्याचा आदेश माननीय राजीव गांधींचा नव्हता. तर तो फैझाबादच्या जिल्हा न्यायालयाचा होता. त्या आदेशाचे पालन राजीव गांधी आणि त्यावेळी उत्तर प्रदेशात सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस सरकारने केले होते. आजही, जे भव्य राममंदिर साकारत आहे, ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच होत आहे. तसेच, हे मंदीर व्हावे ही प्रत्येक हिंदूची मनोमनी इच्छा होती. यासाठी गेल्या पाच शतकांपासून आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेल्या सात दशकांपासून अविरत आणि अविश्रांत संघर्ष समाजाने केला आहे. या दोन्ही बाबी या मंदिराच्या निर्माणकार्यात निर्णायक सिद्ध झाल्या आहेत. अशा स्थितीत त्याच्या श्रेयासाठी हमरीतुमरीवर येणे योग्य नव्हे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की, या भव्य राममंदिराचे निर्माणकार्य कोणताही राजकीय पक्ष किंवा सरकार करीत नसून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने स्थापन केलेल्या ‘न्यासा’कडून होत आहे. तसेच प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आमंत्रणपत्रिकाही या न्यासानेच पाठविल्या आहेत. त्याचा केंद्र सरकार किंवा कोणता राजकीय पक्ष यांच्याशी अर्थाअर्थी संबंध नाही. एक बाब निश्चित आहे, की रामजन्मभूमी आंदोलनात संघ परिवार, विश्व हिंदू परिषद, अन्य हिंदू संघटना आणि संस्था तसेच भारतीय जनता पक्षाचा सक्रीय सहभाग होता. त्यामुळे या संघटनांना, त्यांनी मिळविलेल्या यशाचा आनंद होणे आणि त्यांनी तो आनंद जाहीररित्या व्यक्त करणे, किंवा लोकांना त्यात सहभागी करुन घेणे, हे स्वाभाविक मानले पाहिजे. याचा कोणाला राग आला असेल तर त्याने तो प्रभू रामचंद्रांवर काढू नये, अशी सूचना करावीशी वाटते. राममंदिरासंबंधात राजकारण विरोधी पक्षांकडूनही काही कमी प्रमाणात झालेले नाही. तेव्हा उगाचच एकमेकांची उणीदुणी काढण्याचे कारण नाही. प्रत्येकाने या सोहळ्यात यथाशक्ती सहभाग घ्यावा. ज्यांना त्यांच्या विचारसरणीनुसार त्यात भाग घ्यावयाचा नाही, त्यांनी घेऊ नये. पण विनाकारण वादग्रस्तता निर्माण करु नये. त्यातून काहीही साध्य होण्याची शक्यता नाही. तेव्हा, सर्वांनीच आपल्या भावनांना आवर घालून संयमित विधाने करावीत आणि जनतेच्या आनंदात मोकळ्या मनाने सहभागी व्हावे, एवढीच नम्र सूचना.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article