गोकुळमध्ये 25 संचालक का नको?
कोल्हापूर :
गोकुळसारख्याच इतर दूध संघात 25 संचालक आहेत. लोकसंख्येच्या मानाने संचालकही वाढले पाहिजेत म्हणून 21 पैकी 20 संचालकांनी संचालक वाढीच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. गतवर्षीच्या तुलनेत 30 हजार लिटरपेक्षा अधिक दूध वाढले आहे. संचालक वाढल्यास कार्यकत्यांना संधी मिळणार याबरोबर दुध उत्पादनही वाढेल असा विश्वास संचालकांनी दाखवला आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ कोल्हापूरच्या बैठकीत संचालक वाढीच्या प्रस्तावावरून जिह्याच्या राजकारणात जोरात चर्चा झाली. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी या प्रस्तावाला होकार दिला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव सर्व संचालकांनी मंजूर केला. गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी याबाबत गडबड नको असल्याचे सांगितले आहे.
‘आमदार नको पण गोकुळचे संचालक पद द्या’, असे जिह्यातील सहकारातील लोक सातत्याने म्हणत असतात. कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघाशी ग्रामीण भागातील दुध उत्पादकांचे एक नाते निर्माण झाले आहे. दहा दिवसाला दुधाचे बील हातात घेत संसाराच्या गाढा जिह्यातील 4 लाखांच्यावर दुध उत्पादकांचा चालतो. दुध संस्थातील पदाधिकारीच पुढे मोठ मोठ्या पदावर जातात. त्यामुळे या संस्थाची शिखर संस्था असलेल्या गोकुळ दुध संघाचे संचालक होण्यासाठी भल्या भल्यांची नेत्यांची धडपड सुऊ असते.
वर्षभराने गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. संघात मतदार असणाऱ्या दूध संस्थेच्या ठरावाची संख्या 5 हजार 470 इतकी आहे. हे ठराव गोळा करताना संचालकांच्यासह इच्छूक शेकडो कार्यकर्ते आहेत. ते सुध्दा नेत्यांच्याकडे ठराव देत उमेदवारी मिळवण्यासाठी जोर लावू लागले आहेत. याची माहिती संघाच्या सर्व संचालकांना आहे. सर्वांनाच संधी देता येत नाही, तरीही अजून चार संचालक वाढले तर काही फरक पडणार नसल्याचे संचालकांचे मत आहे. उलट नवीन संचालकांच्यामुळे अजून दुधाचे उत्पादन वाढीसाठी मदत होईल असा दावाही काही संचालकांनी केला.
- नेत्यांना विचारून निर्णय घ्यावा
निवडणूक एक वर्षावर असताना हा निर्णय अचानक घेऊ नये, याबाबत सविस्तर चर्चा करावी, सर्व पक्षांची सत्ता असेल तर त्या पक्षातील नेत्यांना विचारून हा निर्णय घ्यावा. आताचे संचालक कुठे कमी पडत आहेत, नवीन संचालक कसे दूध वाढवणार आहेत हे स्पष्ट करावे, या निर्णयाचा येणाऱ्या निवडणुकीवर काय परिणाम होणार आहे, याबाबत सविस्तर चर्चा करूनच निर्णय घ्यावा, पुढच्या मिटींगला चर्चेसाठी विषय ठेवावा अशा सुचना केल्या आहेत.
- शौमिका महाडिक, संचालिका, गोकुळ
- कार्यकर्त्यांना संधी मिळणार
संचालक वाढीच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. दुध उत्पादन कमी असणाऱ्या भागात संचालक अधिक दिल्यास त्या ठिकाणचे दुध उत्पादनही वाढेल.संघाची दूध उत्पादनात फायदा होईल आणि कार्यकर्त्यांनाही यामुळे संचालक पदाची संधी मिळणार आहे.
- युवराज पाटील. तज्ञ संचालक
- 25 वर संख्या गेल्यास कुठे वाढणार संचालक
सवार्धिक करवीर तालुक्यात 868, राधानगरी 703, कागल 622, भुदरगड 598, पन्हाळा 519, शाहूवाडी 451, चंदगड 426, गडहिग्लज 402, आजरा 308, शिरोळ 274, हातकणंगले 167, गगनबावडा 132 असे ठराव आहेत. त्यामुळे ठराव अधिक असणाऱ्या तालुक्यांना की दुर्गम भागात दूध उत्पादन वाढीसाठी त्या ठिकाणचा उमेदवार ठरवणार हे ज्या त्या वेळेची परिस्थिती ठरवणार आहे.
- गोकुळ दुध संघाची प्रगती
म्हैस दूध संकलनात अंदाजे 10,000 लिटर तर गाय दूध संकलनात 20,000 लिटर इतकी वाढ झाल्याचे गोकुळकडून सांगण्यात आले.
ही वाढ परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदी योजना, वासरू संगोपनासाठी मिळणारे नियमित अनुदान, मुक्त गोठा प्रोत्साहन योजना, दर्जेदार वैरण, वेळेवर सेवा आणि गोकुळकडून मिळण्राया स्पर्धात्मक दूध दरांमुळे घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
संघाच्या आंतरविभागीय विश्लेषणानुसार, करवीर तालुका सध्या सर्वाधिक संकलन करणारा तालुका असून येथे दररोज 2 ते 2.5 लाख लिटर दूध संकलन होते. म्हैस दूध संकलनातही करवीरच आघाडीवर असून येथे 70 हजार ते 1 लाख लिटर पर्यंत म्हैस दूध संकलन नोंदवले गेले आहे. करवीर तालुका गायीच्या दूध संकलनात आघाडीवर असून तेथे सरासरी 1.5 लाख लिटर संकलन होते.
राधानगरी, कागल, पन्हाळा, शिरोळ, चंदगड भुदरगड या तालुक्यांतही प्रतिदिन दूध संकलन सुमारे 1 ते 1.50 लाख लिटरच्या जवळपास आहे.