For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मडगाव आमदारांचे मौन का ?

12:52 PM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
मडगाव आमदारांचे मौन का
Advertisement

आमदार विजय सरदेसाई यांचा सवाल, भाजप सरकारवरही टीका 

Advertisement

मडगाव : मडगाव नगरपालिकेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी या पालिकेवर ज्याचे मंडळ सत्तेत आहे ते आमदार मौन धारण करून का बसले आहेत, असा सवाल करत फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी आमदार दिगंबर कामत यांच्यावर निशाणा साधला आहेत. आपला नगराध्यक्ष कारभार सांभाळत असता, तर आपण  सरळ घोटाळाबाज कारकुनाला कामावरून बडतर्फ करायला लावले असते, अशी सडेतोड प्रतिक्रिया सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे.

फेस्ताच्या फेरीत गोळा करण्यात आलेले पैसे हा कर्मचारी पालिकेच्या तिजोरीत जमा न करता घरी घेऊन जातो. कित्येक दिवस अधिकाऱ्यांना त्याचा थांगपत्ता नसतो. पैशांची ही अफरातफर कळून चुकल्यानंतरही पोलीस तक्रार करण्यात विलंब लावला जातो. आता तक्रारीनंतर तपासही धिम्या गतीने चालतो. हे सर्व काय चालले आहे. भाजप सरकारात आर्थिक व्यवस्थापन योग्य प्रकारे होत नसल्याचे त्यातून स्पष्ट होते, अशी टीका सरदेसाई यांनी केली.

Advertisement

घाऊक मासळी मार्केटमधील सोपो गोळा करण्यासाठी गुंड वापरले जात आहेत. 200 ऊपये पीडीएला वसूल केल्याचे दाखवून 1 हजार ऊपये मासेवाहू वाहने घेऊन येणाऱ्याकडून आकारले जात आहेत. ते न दिल्यास वाहन फोडण्याची धमकी दिली जाते, असा दावा आमदार सरदेसाई यांनी केला. सर्व अंदाधुंदी कारभार या राज्यात सुरू असून कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचे ते म्हणाले. किती वेळा मुख्यमंत्र्यांना या प्रकारावर डोळे उघडून पाहा म्हणून सांगावे, असा सवाल करत सरदेसाई म्हणाले की, कायदा बदलून नगराध्यक्षांना खुर्चीवर बसविण्यात आले पालिका कायद्याच्या चौकटीत राहून कारभार चालविता येत नसल्यास नगराध्यक्ष निवडीसाठी हात उंचावून मतदान करण्याचा आणलेला कापदा बदला. मग आम्ही आमचा नगराध्यक्ष बसवून पालिकेचा कारभार योग्यरीत्या चालवून दाखवितो, असे सरदेसाई यांनी सांगितले.

पालिकेकडून काळोख करून लुटण्याचे सत्र

कायदा बदलून पालिका हडपली. आता पालिकेचे पैसे आणि मालमत्ता  हडपण्याचे प्रकार सुरू आहेत. पालिकेला 18 जून रोजी क्रांतिदिनी तसेच ईद सणाच्या वेळी पालिका इमारत आणि सभोवतील परिसरात रोषणाई करण्याचा विसर पडला. कारण पालिकेत काळोख पडला आहे वा काळोख करून लुटायचे सत्र पालिकेने चालविले आहे, असा आरोप आमदार सरदेसाई यांनी केला.

Advertisement
Tags :

.