For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अर्थसंकल्प हा केवळ सत्ताधारी गटाचाच का?

10:37 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
अर्थसंकल्प हा केवळ सत्ताधारी गटाचाच का
Advertisement

विरोधी गट नेते मुज्जम्मील डोणी यांचा जोरदार आक्षेप : विश्वासात न घेताच अर्थसंकल्प सादर केल्याचा आरोप

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेतील अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधी गटातील नगरसेवकांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला. विरोधी गटनेते मुज्जम्मील डोणी यांनी जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे तो केवळ सत्ताधारी गटातील नगरसेवकांसाठीच आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. आम्हाला विश्वासात घेतला नाही. अर्थसंकल्पाबाबतची कोणतीही प्रत दिली नाही. मनमानीपणे अर्थसंकल्प सादर केला, असा आरोप त्यांनी केला. त्यावर महापौर सविता कांबळे म्हणाल्या, आम्ही तुम्हाला बैठकीसाठी बोलविले. मात्र तुमच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, असे सांगितले. याबाबत महापौरांनी अधिकाऱ्यांना उत्तर देण्यास सांगितले. अधिकाऱ्यांनी पूर्व बैठक घेतली होती. त्यावेळी तुम्हाला फोन केला होता. मात्र तुमच्याकडून उत्तर मिळाले नाही, असे सांगितले. सदर बैठक नगरसेवकांसाठी होती की शहरातील संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी होती? याचे उत्तर द्या, असे मुज्जम्मील डोणी यांनी सांगितले. त्यावर अधिकाऱ्यांना काहीच बोलता आले नाही. अर्थसंकल्प केवळ सत्ताधारी गटाचा आहे का? एकूण 58 नगरसेवकांचा आणि संपूर्ण शहराचा हा अर्थसंकल्प आहे. त्यासाठी सर्व नगरसेवकांची बैठक घेणे गरजेचे होते, असे त्यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्प मांडला तरी त्याला आमचा विरोध आहे. अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी आठ दिवस अभ्यास करावा लागणार आहे. त्यासाठी मुदत द्या, त्यावर चर्चा करून हा अर्थसंकल्प मंजूर करूया, असे विरोधी गटाच्या नगरसेवकांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे नगरसेविका रेश्मा बैरकदार म्हणाल्या, मी स्थायी समितीची सदस्या असूनही मला त्याची माहिती दिली गेली नाही. इतका गुप्तपणा कशासाठी ठेवण्यात आला? असा प्रश्न त्यांनी केला. एकूणच हा अर्थसंकल्प कोणालाही विश्वासात न घेता मांडण्यात आला आहे, असे सांगितले.

पाणीटंचाईसाठी केवळ 25 लाख!

Advertisement

यावर्षी पाण्याची भीषण टंचाई निर्माण होणार हे निश्चित आहे. मात्र त्यासाठी केवळ 25 लाख रुपयांची तरतूद केली आहे. जनतेला पाणी प्रथम देणे हे कर्तव्य आहे. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये नव्याने त्यासाठी तरतूद करा, अशी मागणी नगरसेवक शाहीदखान पठाण यांनी करत अर्थसंकल्पाला तीव्र विरोध केला. म. ए. समितीच्या नगरसेवकांनीही यावेळी जोरदार विरोध केला. या अर्थसंकल्पावेळी विधान परिषद सदस्य साबन्ना तळवार हजर होते. त्यांनी विरोधी गटाला तुमचा आक्षेप असेल तो नोंदवा. मात्र अर्थसंकल्पच मंजूर करू नये, अशी मागणी करणे चुकीचे असल्याचे सांगितले. एकूणच विरोधी गटाने जोरदार विरोध केला तरी हा अर्थसंकल्प सत्ताधारी गटाने मंजूर केला आहे. यावेळी उपमहापौर आनंद चव्हाण, आयुक्त पी. एन. लोकेश व अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.