कन्नडसक्ती केवळ बेळगावमध्येच का?
रेल्वे खात्याकडून बेळगावला सापत्नभावाची वागणूक : केवळ कन्नड संघटनांना खूश करण्यासाठी सरकारचा प्रयत्न
बेळगाव : भारत हे निधर्मी राष्ट्र आहे, असे अभिमानाने सांगितले जाते. या देशातील केंद्र सरकारच्या कार्यकक्षेत येणाऱ्या सेवा-सुविधा या कोणत्याही भेदाच्या पलीकडे जाऊन देणे अपेक्षित आहे. सरकार तसे ब्रीदही मिरविते. यामध्ये रेल्वे आणि विमानसेवा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र अलीकडे रेल्वे खातेसुद्धा बेळगावच्या बाबतीत भाषाभेद करून स्पष्टपणे बेळगावला सापत्नभावाची वागणूक देत आहे. याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. रविवारी बेंगळूर-बेळगाव वंदे भारत सुरू झाली. हा बेळगावकरांसाठी मोठा आनंदाचा क्षण होता. बेळगावमधल्या नागरिकांनी रेल्वेस्थानकावर उपस्थिती लावून वंदे भारत रेल्वेचे जल्लोषात स्वागतही केले. परंतु कन्नडसक्ती कायम बेळगावमध्येच का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत होता. कारण बेळगाव रेल्वेस्थानकामध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर रेल्वे विभागाचा फलक हा कानडी भाषेत होता. यापूर्वी रेल्वे विभागाच्या सर्व कार्यक्रमांना इंग्रजीतून फलक असायचे. परंतु यावेळी व्यासपीठावरील फलकावर पूर्णपणे कानडीकरण झाल्याचे चित्र दिसून आले.
यावेळीच भाषावाद का आठवला?
याच वंदे भारत रेल्वेचे हुबळी, तसेच बेंगळूर रेल्वेस्थानकांवर स्वागत करण्यात आले. या दोन्ही रेल्वेस्थानकांवर झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर इंग्रजीतून फलक होते. इतकेच काय तर यापूर्वी दाखल झालेल्या पुणे-हुबळी वंदे भारत रेल्वेच्या स्वागतावेळीही कन्नडसह इंग्रजीमध्ये फलक लावण्यात आले होते. त्यामुळे केवळ कन्नड संघटनांना खूश करण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न आहे का? तसेच रेल्वेचे प्रवासी हे केवळ एका राज्यापुरते मर्यादित नसून देशभरातील प्रवासी रेल्वेने प्रवास करीत असल्याने त्यांना यावेळीच भाषावाद का आठवला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.