For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

BJP News Nagpur : नागपूरमध्ये भाजपात नाराजीचा सूर का उमटतोय?

11:56 AM Aug 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
bjp news nagpur   नागपूरमध्ये भाजपात नाराजीचा सूर का उमटतोय
Advertisement

आता सावनेर तालुक्यातूनही तेच सूर ऐकायला मिळू लागले आहेत

Advertisement

नागपूर : एखाद्या गोष्टींचा अतिरेक झाला तर त्याचे काय परिणाम होतात याचे उत्तम उदाहरण सध्या नागपूर जिह्यात भारतीय जनता पक्षात पहायला मिळते. विरोधी पक्ष कमकुवत व्हावा म्हणून त्या पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देताना पक्षातील जुन्या नेत्यांना काय वाटेल याची तमाच न बाळगल्याने पक्षातील निष्ठावंतांचा असंतोष आता उफाळून बाहेर येऊ लागला आहे.

याची सुरुवात माजी आमदार सुधीर पारवे यांनी केली. आता सावनेर तालुक्यातूनही तेच सूर ऐकायला मिळू लागले आहेत. पार्टी विथ डिफरन्स, निष्ठा, संस्कृती या शब्दांना गुंडाळून ठेवत आता नवा भारतीय जनता पक्ष उदयास आला असून या पक्षात सध्या स्वपक्षातील कर्तृत्ववान नेत्यांपेक्षा इतर पक्षातून आयात केलेल्या नेत्यांवर अधिक विश्वास दाखवला जात आहे.

Advertisement

यामुळे स्वाभाविकपणे पक्षासोबत अनेक वर्षे घालवणारे व स्वत:ला निष्ठावंत म्हणून घेणारे नेते सध्या पक्षावर, तो चालवणाऱ्या नेतृत्वावर उघड नाराजी व्यक्त करीत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या तीन प्रमुख नेत्यांच्या नागपूर जिह्यात सध्या निष्ठावंत-विरूध्द आयात नेते असा वाद पेटला आहे.

वादाची सुरूवात झाली ती जिल्हा भाजपच्या कार्यकारिणीवरून. पहिली ठिणगी उमरेड विधानसभा मतदारसंघात तेथील माजी आमदार सुधीर पारवे यांनी पालकमंत्री बावनकुळे यांना पाठवलेल्या नाराजीच्या पत्राच्या रुपात पडली. उमरेडचे सलग दोन वेळा आमदार राहिलेले सुधीर पारवे 2019 2024 अशा दोन विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले.

पक्षाने त्यांचा पर्याय भाजपमध्ये आलेल्या राजू पारवे यांच्या रूपात शोधला. त्यामुळे संतापून सुधीर पारवे यांनी पक्षासाठी घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांच्या छातीवर बाहेरच्यांना बसवणार का? असा सवाल केला. कॉंग्रेस नेते सुनील केदार यांचे कट्टर समर्थक मनोहर कुंभारे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन सहा महिने झाले नाही तर लगेच त्यांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष केले. त्यामुळे सावनेर भाजपमध्ये नाराजी आहे. विशेष म्हणजे कुंभारे यांनी पक्षाची सूत्रे स्वीकारताच कार्यकर्त्यांवरच कारवाई सुरू केली.

पारवे विरुद्ध पारवे 2019 मध्ये राजू पारवे कॉंग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. पण त्यांची जवळीक कायम फडणवीस यांच्या सोबतच होती. त्यामुळे ते भाजपमध्ये जातील व रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील अशीच चर्चा होती. पण शिवसेनेने रामटेकची जागा भाजपला सोडली नाही.

त्यामुळे भाजपच्या सांगण्यावरून राजू पारवे शिवसेनेत गेले व 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली, परंतु पराभूत झाले. विधानसभा निवडणुकीत भाजपनेत्यांना पक्षात घेतले. त्याना महत्त्व देणे सुरू केले. त्याची परिणती निष्ठावंतांमध्ये असंतोष निर्माण होण्यात झाली.

Advertisement
Tags :

.