स्लीपर बसच्या दुर्घटना का वाढल्या?
अमेरिका अन् ऑस्ट्रेलियाकडून शिकण्याची गरज
भारतात मागील काही दिवसांमध्ये स्लीपर बसेसमध्ये आगीच्या दोन घटनांमध्ये 41 जणांचा मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा देशभरात लाखो भारतीयांचा उदरनिर्वाह निर्भर असलेल्या परिवहनाच्या साधनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. 2013 सालापासून कमीतकमी 7 मोठ्या आग लागण्याच्या घटना घडल्या असून यात 130 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अखेरच्या घटनेंमध्ये 24 ऑक्टोबर रोजी आंध्रप्रदेशच्या कुरनूलमध्ये 20 जणांचा मृत्यू तर 14 ऑक्टोबर रोजी राजस्थानच्या थईयात गावात 26 लोकांचा मृत्यू झाला. या घटनांमुळे लोकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे.
ज्वलनशील अंतर्गत भाग, बंद किंवा अरुंद प्रवेशमार्ग, जवळपास वापर होत नसलेले इमर्जन्सी डोअर, सुरक्षा उपकरणांचा अभाव, प्रवाशांकडे बचावासाठी अत्यंत कमी वेळ आणि कमी प्रशिक्षित कर्मचारी हे सर्व घटक बसला आग लागल्यावर जीवितहानी वाढण्यासाठी कारणीभूत असतात. अधिकृत सुरक्षा मापदंडांना प्रगत करण्यात आल्यावरही बस ऑपरेटर्सकडून अंमलबजावणीचा अभाव आणि नियामक अधिकाऱ्यांकडून बसमालकांना नियमांचे पालन करण्यास भाग पाडण्यात येत नसल्याने बहुतांश प्रवासी अशा वाहनांमध्ये प्रवास करण्यासाठी साइन अप करत आहेत, जे मृत्यूचा सापळा ठरू शकतात.
अन्य पर्याय नसल्याने प्रवास
उच्च जोखिमीनंतरही बहुतांश प्रवासी खासगी बसचा पर्याय निवडतात, कारण दुसरा सक्षम पर्याय नाही. सरकारी इंटरसिटी बसेसची संख्या 2022 मध्ये 1,01,908 वरुन कमी होत 2025 मध्ये 97,165 वर आली आहे. जुन्या बसेस ताफ्यातून बाहेर पडल्याने आणि इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा विलंबाने होत असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. सेवांमधील हे अंतर बऱ्याचअंशी खासगी बसेसद्वारे भरून काढण्यात आले आहे. जवळपास 78 टक्के बस ऑपरेटर्स 5 पेक्षा कमी बसेसच्या ताफ्यांचे संचालन करतात. अत्यंत तीव्र प्रतिस्पर्धेत नफा केवळ कपातीनेच प्राप्त होतो. चालक आणि सहाय्यकांना कमी वेतन दिले जाते आणि त्यांच्याकडून अत्यंत अधिक काम करवून घेतले जाते. सुरक्षा उपाय अतिरिक्त खर्च असल्याने तो टाळण्यावरच भर असतो.
बसला आग लागण्याची प्रमुख कारणे
1 रस्ते दुर्घटना : टक्कर (छोटी-मोठी टक्कर देखील) मोठ्या आगीचे कारण ठरू शकते, कारण बसेसची देखभाल योग्यप्रकारे केली जात नाही आणि त्यांचे सुटेभाग नुकसानग्रस्त असू शकतात.
2 अवैध वायरिंग : कुरनूल बस अग्निकांडानंतर अखिल भारतीय ऑटोमोबाइल वर्कशॉप असोसिएशनचे अध्यक्ष विक्रांत मोहन यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. बसेसमध्ये फॅक्टरी वायरिंग एक अचूक भारक्षमतेसह डिझाइन करण्यात येते, ज्यात फेरफार केले जाऊ नयेत. एकूण विद्युतभाराची गणना न करताच सबवूफर्स, सजावटीचे लायटिंग, चार्जिंग पॉइंट आणि इनव्हर्टर लावण्यात येतात. यामुळे ओव्हरहीटिंग होते आणि हळूहळू इन्सुलेशनला नुकसान पोहोचवत असल्याचे त्यांनी सांगितले.
3 अंतर्गत सामग्री अन् लेआउट : बहुतांश स्लीपर लेआउटमध्ये बर्थ, पडदे आणि कम्पोझिट पॅनल अरुंद कॉरिडॉरमध्ये लावलेले असतात, एकदा पडदा किंवा गादीला आग लागल्यास धूर, उष्णता आणि विषारी वायूंनी अरुंद केबिन्स वेगाने भरून जातात, यामुळे प्रवाशांना बाहेर पडणे अवघड ठरते.
4 गरजेप्रसंगीही इमर्जन्सी एक्झिट बंद : टक्कर किंवा शॉर्ट सर्किटनंतर बसेसचे दरवाजे जाम होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. छताचे दरवाजे एक्झिटसाठी सहाय्यभूत ठरू शकतात, मात्र ते एकतर गायब असतात किंवा सीलबंद. प्रत्येक खिडकीवर आपत्कालीन स्थितीत काच तोडण्यासाठी एक हातोडा असावा असा निर्देश आहे, परंतु याकडे डोळेझाक केली जाते.
5 अग्निशमन उपकरणांचा अभाव : नियमांनुसार बससेमध्ये अग्निशमन यंत्रांची आवश्यकता असते, परंतु अनेक प्रकरणांमध्ये हे केवळ खाली डबे असतात, बस चालविणाऱ्या कर्मचाऱ्यांना या उपकरणांच्या वापराचे व्यवहारिक प्रशिक्षण दिले जात नाही. अलिकडेच अनेक दुर्घटनांमध्ये केबिनमध्ये वेगाने फैलावणाऱ्या आगीनंतर अग्निशमन यंत्र जवळ नव्हते किंवा अप्रभावी होते.
6 वेग अन् थकवा : रात्रभर चालणाऱ्या आंतरराज्य बसेस बहुतांशवेळा एकच चालक चालवितो, राज्य बससेवांमध्ये मात्र दोन चालक असतात. तसेच बहुतांश बसेसमध्ये स्पीड गव्हर्नर नसतो.
अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील सुरक्षा
युरोपीय महासंघ : दीर्घ पल्ल्याच्या बसप्रवासामध्ये अनेक इमर्जन्सी एक्झिट (दरवाजे, हातोडायुक्त तुटण्यायोग्य खिडक्या, छताचे हॅच) आणि पोर्टेबल अग्निशमन यंत्र असणे आवश्यक आहे. अनेक क्षेत्रांमध्ये इंजिन-कम्पार्टमेंट अग्निशमन प्रणाली आणि बसेसमधील सामग्री अग्निरोधक आणि धूर विषयक मापदंडांची पूर्तता करते.
अमेरिका : इमर्जन्सी एक्झिटची संख्या आकार आणि एक्झिट व्यवस्था पूर्णपणे सुरक्षित आहे. बसेसमध्ये त्वरित एक्झिट खिडक्या आणि छताच्या हॅचचे मापदंड आहेत, ज्यावर स्पष्ट लेबलिंग आणि वेळोवेळी निरीक्षण केले जाते.
ऑस्ट्रेलिया : इमर्जन्सी एक्झिटची संख्या पुरेशी आहे. राज्य नियामक सेवारत बसेसमध्ये इंजिन-बे अग्निशमन प्रणाली लागू करत असतात.
दुर्घटनांमागे चुकीचे डिझाइन
नोएडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरु विक्रम सिंह यांनी बसला लागून होणाऱ्या दुर्घटनांकरता चुकीचे डिझाइन कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. मोठ्या कारणांमध्ये त्रुटीपूर्ण डिझाइन, बसच्या इंटीरियरमध्ये ज्वलनशील सिल्क, फोम आणि रेक्सीनचा वापर, वाहतूक नियमांची जाण नसणे सामील आहे.
प्रवासी बसेसमध्ये मालवाहतूक
बस दुर्घटनांकरता मोठे कारण प्रवासी बसमध्ये होणारी मालवाहतूकही आहे. याची कुणीच तपासणी करत नाही. ट्रकमधून मालवाहतूक होत असताना पूर्ण कागदपत्रे पडताळली जातात. सामग्रीत ज्वलनशील पदार्थ आहे की नाही हे पाहिले जाते. जैसलमेरमध्ये दुर्घटनाग्रस्त बसमध्ये फटाके होते, तर आंध्रप्रदेशमध्ये दुर्घटनाग्रस्त बसमध्ये मोबाइल फोन आणि गॅस सिलिंडर होता. सरकारला आता याप्रकरणी लवकरात लवकर कठोर भूमिका घ्यावी लागेल असे ऑल इंडिया मोटर अँड गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कपूर यांनी सांगितले आहे.
डिझाइन मॉडिफायमुळे वाढतो धोका
बसचे पासिंग करण्यापूर्वीच स्वतंत्रपणे बसला डिझाइन केले जाते. पासिंग झाल्यावर आसनक्षमता वाढवत इमर्जन्सी एक्झिट गेटपर्यंत सीट्स लावण्यात येतात. अशा स्थितीत दुर्घटनेच्या वेळी इमर्जन्सी गेट नसते. वाहनांमध्ये ऑटोमॅटिक सिस्टीम अनेकदा आग लागल्यावर काम करणे बंद करत असल्याची माहिती निवृत्त मोटर लायसेंसिंग ऑफिसर नंद गोपाल यांनी दिली.
बीएस-6 बसेसमध्ये शॉर्टसर्टिकमुळे दुर्घटना अधिक
बहुतांश बसेस बीएस-6 आहेत, यात शॉर्ट सर्किटची समस्या सर्वाधिक येत आहे. जेव्हा सर्वकाही नियमानुसार असताना बसमालकाची चूक कशी? नियमांच्या विरोधात कार्य केले जात असेल तर बसचे पासिंग कसे झाले? यावर सरकारने लक्ष द्यायला हवे असे दिल्ली इंटरस्टेट बस ऑपरेटर्स संघाचे सरचिटणीस श्यामलाल गोला यांनी म्हटले आहे.
त्वरित उचलावीत आवश्यक पावले
- प्रवासी बसमधून मालवाहतूक त्वरित बंद करावी.
- दर 6 महिन्यांनी बस आणि त्याच्या डिझाइनची तपासणी व्हावी
- बसच्या मध्यभागी अन् मागे कमीतकमी दोन इमर्जन्सी एक्झिट असावेत.
- प्रत्येक खिडकीकडे आपत्कालीन स्थितीत काच तोडण्यासाठी हातोडा असावा.
- अग्निशमन सिलिंडरमध्ये गॅस पूर्ण भरलेला असावा.
- बसमध्ये ज्वलनशील सामग्रीचा वापर कमीतकमी व्हावा.
- वाहतूक विभाग आणि पोलिसांनी कठोर पावले उचलावीत.
स्लीपर बसेसवर बंदी घालण्याची मागणी का आहे?
1930 च्या दशकात अमेरिकेत म्युझिक बँडसाठी स्लीपर बसेस सुरू झाल्या. बँडमधील सदस्यांना दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात झोप घेता यावी हा यामागील उद्देश होता. परंतु हळूहळू स्लीपर बसेस नियमित प्रवाशांसाठी वापरण्यात येऊ लागल्या. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक देशांनी स्लीपर बसवर बंदी घातली आहे.
इंग्लंड : 2000 साली सामान्य स्लीपर बसेसवर बंदी (विशेष पर्यटक बसेसना परवानगी)
जर्मनी : 2006 साली बंदी, बहुतेक युरोपीय देशांनी याचे अनुकरण केले.
चीन : 2012 साली अपघातात 36 जणांचा मृत्यू झाल्यावर नवीन नोंदणीवर बंदी, 6 वर्षात जुन्या बसेस टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आल्या.
अमेरिका, जपान आणि कॅनडासह सुमारे 40 देश स्लीपर बसेसना परवानगी देतात, परंतु भारतापेक्षा ही संख्या खूपच कमी आहे. भारतात अंदाजे 23 लाख बसेस आहेत, यातील 20 लाख खासगी असून त्यापैकी 2 लाख स्लीपर बसेस आहेत. भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात असुरक्षित स्लीपर बसेस असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
स्लीपर बस अपघातांचा पॅटर्न
मागील 3 वर्षांमध्ये 8 मोठ्या स्लीपर बस अपघातांमध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 7 अपघात रात्रीच्या वेळी झाले आहेत. सुमारे 60 अपघात रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान झाले आहेत. बहुतेक मृत्यू प्रवाशांना वेळेवर बाहेर पडता न आल्याने झाले आहेत.
3 जून 2022 : कर्नाटकातील कलबुर्गी येथे 7 जण जळून मृत्युमुखी पडले
7 ऑक्टोबर 2022 : नाशिकमध्ये मुंबईच्या दिशेने जाणारी खासगी बस ट्रकला धडकली, 12 जणांचा मृत्यू
1 जुलै 2023 : मुंबई-नागपूर द्रुतगती मार्गावर टायर फुटल्याने बस खांबाला धडकली, डिझेल टँकला आग लागून 26 जणांचा मृत्यू
नोव्हेंबर 2023 : जयपूर ते दिल्ली मार्गावर गुरुग्रामजवळ बसला आग लागली, 2 जणांचा मृत्यू, 12 जण जखमी.
19 ऑक्टोबर 2024 : राजस्थानच्या धोलपूर येथे स्लीपर बस अन् टेम्पोची धडक. 12 जणांचा मृत्यू
15 मे 2025 : बिहारमध्ये महामार्गावर बसला आग, 5 जणांचा मृत्यू
14 ऑक्टोबर 2025 : जैसलमेर ते जोधपूर मार्गावर स्लीपर बसला आग, 20 जणांचा मृत्यू
24 ऑक्टोबर 2025 : आंध्रच्या कुरनूलनजीक बसला आग, 20 जणांचा मृत्यू.
संकलन : उमाकांत कुलकर्णी