रिक्षाला चाके तीनच का ?
रिक्षा हा वाहनप्रकार आपल्याला चांगलाच परिचित आहे. आपण अनेकदा या वाहनाने प्रवास केलेला असतो. प्रत्येक रिक्षाला तीन चाके असतात. मोटारीप्रमाणे चार चाकी रिक्षा कधीही आपल्या दृष्टीस पडत नाही. त्यामुळे अनेकांना प्रश्न असा पडतो, की रिक्षाला तीनच चाके का असतात. रिक्षा हे एक लहान आकाराचे पण वेगाने धावणारे वाहन आहे. त्यामुळे माणसांच्या आणि मालाच्या वाहतुकीचे एक अत्यंत सुलभ साधन म्हणून ते लोकप्रिय आहे. शिवाय खर्चाच्या दृष्टीने ते छोट्या कारपेक्षाही किफायतशीर असते. त्यामुळे रिक्षासेवा पुरविणे हा अनेकांचा व्यवसाय आहे. भारतात किमान 20 लाख रिक्षा असण्याची शक्यता आहे.
तर अशा बहुउपयोगी रिक्षाला तीनच चाके का, याचे उत्तर आयआयटी रुरकी येथील एका अभियंत्याने दिले आहे. तीन चाकांचे वाहन समपातळीत राखणे चार किंवा अधिक चाकांच्या वाहनापेक्षा सोपे असते. त्यामुळे तोल चांगला सांभाळला जातो. तीनच चाके असल्याने रिक्षाचा निर्मिती खर्च कमी असतो. त्यामुळे व्यापारी वाहन म्हणून रिक्षा अधिक सोयीची आहे. ती चालविणेही चार किंवा अधिक चाकांच्या वाहनांपेक्षा सोपे आहे. तिचे वजनही याच कारणामुळे अन्य व्यापारी वाहनांपेक्षा कमी ठेवणे शक्य होते. कमी रुंदीच्या मार्गांवरही ती धावू शकते. तसेच ती पार्क करणेही तुलनेने सोपे आहे. कमी जागेत ती पार्क केली जाऊ शकते. तिचा मेंटनन्स करणे कमी खर्चाचे असून तिला इंधनही कमी लागते. हे सर्व लाभ रिक्षा तीनचाकी असल्यानेच प्राप्त होतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे.