चहा घेता का चहा...
हवामान बदलामुळे चहाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून आगामी काळात सर्वसामान्यांचा चहा मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चहा पावडरचे दर येत्या काही दिवसांमध्ये वाढण्याचे संकेत आहेत.
सर्वसामान्यांना रोज सकाळी लागतो तो एक कप चहा. सकाळी चहा प्यायल्यानंतर अंगामध्ये तरतरी येण्यामध्ये मदत होत असते. आज चहा उत्पादनामध्ये टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट, हिंदुस्थान युनिलिव्हरसह विविध कंपन्या कार्यरत असून यांची उलाढाल मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. यासारख्या मोठ्या कंपन्यांनी चहाच्या किमतीमध्ये वाढीचे संकेत दिले आहेत. यंदाच्या चहा उत्पादनाला म्हणावा तसा बहर आला नाही. याचे कारण होते खराब हवामान. या स्थितीचा फटका चहा उत्पादनावर थेटपणे पाहायला मिळाला. परिणामी उत्पादकांच्या अंतर्गत खर्चात वाढ पाहायला मिळाली. चहा उत्पादकांना सध्या 25 टक्के इतक्या महागाईचा सामना करावा लागतो आहे, असे तज्ञांकडून सांगितले जात आहे. यातूनच त्यांना आगामी काळामध्ये चहाच्या दरामध्ये वाढ करणे अपरिहार्य ठरणार आहे. ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीत चहाच्या किमती वाढतील असेही काही उत्पादकांनी स्पष्ट केले आहे. सुरुवातीच्या काळात आलेल्या नुकसानीची भरपाई मात्र अद्यापपर्यंत कंपन्यांना करता आलेली नाही. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे 76.73 दशलक्ष किलोग्रॅम इतक्या चहाचे उत्पादनाच्या बाबतीमध्ये नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. सप्टेंबर 2024 पर्यंतच्या कालावधीत हे नुकसान दिसून आले आहे. चहा बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तर भारतामध्ये सप्टेंबर 2024-25 मध्ये 247 रुपये प्रति किलोग्रॅम इतका इतकी सरासरी लिलावासाठीची किंमत दिसून आली, जी मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये जवळपास 23 टक्के अधिक आहे. दक्षिण भारतामध्ये पाहता चहाची सरासरी किंमत 126 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी असून ती 16 टक्के वाढलेली आहे. एकंदर भारतातील सरासरी चहाची किंमत पाहता 215 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी सध्याला पाहायला मिळते आहे, जी 22 टक्के अधिक असल्याचे जाणकार सांगतात.
सध्याला चहा पावडर जी भारतामध्ये विकली जाते ती पॅकेज स्वरूपात शहरी आणि ग्रामीण भागात वितरित केली जाते. चहाचे उत्पादन आसाममध्ये सकारात्मक असले तरी उत्तर बंगालमध्ये मात्र चहाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता सांगितली जात आहे. अगदी उत्पादनाच्या महिन्यांमध्येच चहाच्या रोपांना नुकसानीचा सामना करावा लागला आहे. खराब हवामानाचा फटका चहाच्या उत्पादनावर स्पष्टपणे दिसून आला आहे. रसायनांवर काही प्रमाणात घालण्यात आलेली बंदी यामुळे चहाच्या पुरवठ्यावरही काहीसा परिणाम जाणवला आहे. उत्तर भारतामध्ये पाहता चहा मळ्यांमधून होणारे उत्पादन यावर्षी लवकरच थांबणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यंदा चहाची पाने काढण्याचा हंगाम मात्र 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे, असे म्हटले जात आहे. एरवी डिसेंबरच्या मध्यापर्यंत चहाची पाने काढली जात असतात. उत्तर भारतामध्ये आसाम आणि पश्चिम बंगाल या दोन महत्त्वाच्या राज्यांचा चहा उत्पादनामध्ये सर्वाधिक म्हणजेच 82 टक्के वाटा पाहायला मिळतो. सप्टेंबरपर्यंत 76 दशलक्ष किलोग्रॅम इतक्या उत्पादनाची कमतरता यामुळे येणाऱ्या काळामध्ये चहाच्या किमती वाढवल्या जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारत हा जागतिक स्तरावर उत्पादनात दुसरा मोठा देश असून येथील भौगोलिक क्षेत्रातील उत्तम वातावरणातला चहा जगात नावाजलेला आहे. हे पाहुनच अनेक दिग्गजांनी या उद्योगात उतरत मोठी गुंतवणूक केली आहे. चहा प्रक्रिया युनिट, कल्पकतेच्या योजना, मिश्र उत्पादनांची निर्मिती व जास्तीत बाजारांपर्यंत पोहचण्याची योजना यामध्ये गुंतवणूक होताना दिसते.
2022 च्या आकडेवारीनुसार 6.19 लाख हेक्टर क्षेत्रफळात चहाचे उत्पादन घेतले जाते. 2023-24 वर्षात भारताची चहा उत्पादन क्षमता 1382 दशलक्ष किलोग्रॅम होती. दक्षिणेत तामिळनाडू, कर्नाटक, केरळ या राज्यात चहाचे उत्पादन अधिक घेतले जाते. एकूण चहाच्या जागतिक निर्यातीतला भारताचा वाटा 10 टक्के इतक आहे. 25 देशांना आपला चहा निर्यात केला जातो, त्यात रशिया, इराण, युएई, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी आणि चीन या महत्त्वाच्या देशांचा समावेश आहे.
मागच्या तीन वर्षातील उत्पादन
2021-22 1344.40 दशलक्ष किलोग्रॅम
2022-23 1374.97 दशलक्ष किलोग्रॅम
2023-24 1382.03 दशलक्ष किलोग्रॅम