माणसाला पूर्वीचे जन्म का आठवत नाहीत?
अध्याय तिसरा
जन्ममरणाच्या चक्रातून सुटण्याची गुरुकिल्ली असलेला कर्मयोग बाप्पांनी प्रथम विष्णूला सांगितला. त्याचं महत्त्व लक्षात घेऊन तो सूर्याला सांगितला, सूर्याने आपला पुत्र मनु याला सांगितला, नंतर परंपरेने हा योग महर्षींनी जाणला. विष्णू, सूर्य, मनु, महर्षी हे सर्व जाणकार असल्याने त्यांना त्याचे महत्त्व समजले आणि म्हणूनच त्यांनी तो जतन करून ठेवला. पुढे खूप काळ लोटल्यानंतर तो नष्ट झाला कारण त्यावर कोणाची श्रद्धा राहिली नाही, त्यामुळे त्यांची सर्वत्र निंदा होऊ लागली. निरपेक्ष कर्म करून स्वत:चे भले करून घ्यायला महत्त्व न देता आज, आत्ता ताबडतोब जे हवे ते मिळवण्यासाठी सकाम अनुष्ठाने करायला लोक एका पायावर तयार होऊ लागले. साहजिकच बाप्पांच्या योगाचे महत्त्व हळूहळू कमी होत गेल्याने सध्याच्या कलियुगात तो नष्ट होताना दिसत आहे.
बाप्पांनी हे सर्व राजाला सविस्तर सांगितलं. राजानेही ते सर्व ऐकून घेतलं पण गंमत कशी असते बघा, समोर स्वत: बाप्पा उभे आहेत आणि ते त्याला पुरातन योग सांगत आहेत. त्याची सुरुवात त्यांनी केव्हा केली पुढे त्यांनी सांगितलेला योग इतरांना कसा सांगितला गेला, इत्यादि सर्व त्यांनी सांगितलं पण माणसाच्या मनावर असलेला मायेचा पगडा लगेच सगळं खरं मानायला तयार होत नाही कारण त्याला स्वत:ला जे वाटतंय तेच आणि तेवढंच बरोबर अशी खात्री वाटत असते. समोरचा अत्यंत कळकळीने आपल्या हिताचं सांगतोय, त्याप्रमाणे वागलं तर आपलं भलं होणार आहे हे सर्व विसरून हिताची गोष्ट सांगणाऱ्याला कोंडीत कसे पकडता येईल ह्या उद्देशाने तो प्रश्न विचारू लागतो. मग भले समोर प्रत्यक्ष बाप्पा का उभे असेनात! पुढील श्लोकात राजाने बाप्पाना काय प्रश्न केलाय पहा. अर्थात अर्जुनानेही भगवंतांना असा प्रश्न विचारला होताच.
सांप्रतं चावतीर्णो सि गर्भतस्त्वं गजानन ।
प्रोक्तवान्कथमेतं त्वं विष्णवे योगमुत्तमम् ।। 5 ।।
अर्थ- वरेण्याने विचारले, हे गजानना, तू तर सांप्रत गर्भापासून उत्पन्न झाला आहेस मग हा उत्तम योग पूर्वी तू विष्णूला कसा सांगितलास? राजाचे उत्तर पुढील श्लोकात बाप्पा देत आहेत.
अनेकानि च ते जन्मान्यतीतानि ममापि च ।
संस्मरे तानि सर्वाणि न स्मृतिस्तव वर्तते ।।6 ।।
अर्थ-गणेश म्हणाले, तुझे आणि माझे देखील अनेक जन्म होऊन गेले आहेत. ते सर्व मी स्मरतो, तुला मात्र त्यांचे स्मरण नाही. मायेच्या आधीन न होता तिलाच वश करून अवतार घेणारा परमात्मा आणि मायेच्या भोवऱ्यात सापडून ती लोटून देईल तेथे जन्मास येणारा जीवात्मा, यांच्यात मुख्य फरक हाच आहे. परमात्मा सृष्टीनिर्मितीचे कार्य करत असला तरी त्याला त्यातून काहीही मिळवायचे नसते. त्यामुळे तो त्या कार्यात गुंतलेला नसतो. मनुष्य मात्र फळाच्या अपेक्षेने केलेल्या कर्मानुसार जन्ममरणाच्या चक्रात अडकून अनेक जन्म घेत असतो. प्रत्येक जन्मात त्याला पूर्वजन्माची आठवण होत नसते पण ईश्वरी अवतार केवळ ईश्वराच्या इच्छेनुसार व लोकोद्धारासाठी होत असतात. त्यामुळे स्वतंत्र, सर्वसाक्षी अशा ईश्वराला मागे होऊन गेलेल्या व पुढे होणाऱ्या सर्व अवतारांचे स्मरण असते. सामान्य लोकांच्या बाबतीत हे शक्य नाही कारण त्यांची देह म्हणजेच मी ही ठाम समजूत असते. ते सदैव स्थूल देहाशी निगडित असतात. जे लोक वासनक्षय होऊन कर्मबंधनातून मुक्त झालेले आहेत ते सूक्ष्म देहात कार्य करत असतात. यापुढे गेलेले कारण देहात कार्य करत असतात. त्यांना मात्र भूतभविष्याचे उत्तम ज्ञान असते. ते सदैव आत्मरूपाने कार्य करत असतात. वरेण्य राजा अजून देहालाच मी मानणारा असल्याने त्याला पूर्वीचे जन्म आठवत नव्हते.
क्रमश: