महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लोकसभा निवडणुकीत कोणाची तुतारी वाजणार

06:52 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकसभा निवडणुकांची घोषणा केव्हाही होऊ शकते, या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष आणि आघाडी युती यांच्यातील जागावाटपाच्या चर्चांच्या फेऱ्या येत्या काही दिवसात पूर्ण होतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.न•ा यांनी केलेल्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर आता पुढील आठवड्यात भाजपकडून देशातील 100 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. भाजपकडून एक एक उमेदवारांची नावे जाहीर करताना खूप काळजी घेतली जाणार आहे. त्यातच शिंदे गटाच्या खासदारांबाबतही भाजपच निर्णय घेत असल्याने भाजप आणि शिंदे गटाच्या खासदारांमध्ये अस्वस्थता पहायला मिळत आहे.

Advertisement

राज्यात आतापर्यंत झालेल्या लोकसभेच्या गेल्या 25 वर्षातील निवडणुका बघता काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजप या युती आणि आघाडी यांचा अघोषित जागा वाटपाचा फॉम्युला हा ठरलेला होता. एखाद दुसऱ्या जागेवर मतभेद असायचे, मात्र फॉर्म्युला हा ठरलेला होता तो 2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम होता. मात्र यंदाची लोकसभा निवडणूक ही महाराष्ट्रासाठी वेगळी असणार आहे. कारण 2019 पर्यंत दोन महत्त्वाच्या पक्षांची असणारी युती आणि आघाडी आता तीन पक्षांची असणार आहे. आघाडी आणि युती या दोन्हीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा कायम राहणार आहे. युतीच्या जागावाटपावर भाजपचेच वर्चस्व कायम राहणार असून सोबत आलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजप किती जागा सोडणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement

भाजप लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली 100 उमेदवारांची यादी पुढील आठवड्यात जाहीर करण्याची शक्यता आहे. भाजप जी 100 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे, त्यात 2019 साली झालेल्या भाजपने गमावलेल्या लोकसभा मतदार संघाची ही यादी असणार आहे. या यादीत महाराष्ट्रातीलही काही जागांचा समावेश असणार आहे. राज्यात 45 प्लसचा दिलेला नारा पूर्ण करण्यासाठी भाजपने सर्वांना कामाला लावले आहे. गेल्याच आठवड्यात दिल्लीत भाजपच्या आमदारांचे झालेले अधिवेशन असो किंवा जे.पी.न•ा, अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यातील वाढलेले दौरे असो, महाराष्ट्रातील ज्या जागा भाजपने शिवसेना युतीसोबत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गमावल्या त्यातील काही खासदार आज जरी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपसोबत गेलेले असले तरी काही खासदार हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटासोबत असल्याने भाजपसमोरील आव्हान कायम असणार आहे. भाजपकडून अनेक खासदारांना नारळ मिळण्याची जोरदार चर्चा आहे. मुंबईतील भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियुष गोयल यांच्या नावाची चर्चा सुरू आहे तर शिंदे गटातीलही काही खासदारांच्या नावांवर फुली मारण्यात येण्याची शक्यता आहे. मुंबईतील 6 लोकसभा मतदार संघापैकी केवळ एकच राहुल शेवाळे यांची जागा ही शिंदे गटाला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. उर्वरीत 5 जागा या भाजपच लढवणार असल्याचे समजते. शिंदे गटाचे मुंबईतील दुसरे खासदार गजानन किर्तीकर यांनी आमची ही स्वत:ची व्होटबँक असल्याने आमचाही आदर करण्यात यावा असे भाजपला बोलणे म्हणजेच सारे काही आले. यात महत्त्वाचा मुद्दा असा, की एकीकडे महाविकास आघाडी म्हणून शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या नेत्यांच्या संयुक्त बैठका अधूनमधून होताना दिसतात. काही जागांवर मतभेद असल्याचेही बाहेर येते मात्र भाजप आणि शिंदे गटातील महायुतीकडून अशा काहीही चर्चा बाहेर येताना दिसत नाही. केवळ भाजपचे राष्ट्रीय नेते येतात बैठका घेतात आणि जातात.

भाजप धक्कातंत्रासाठी प्रसिध्द आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावणे तर फडणवीसांना भाजपचे नेते सरप्राईज देऊ शकतात तर इतर नेत्यांचे काय, त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील खासदारांमध्ये तिकीट मिळणार की नाही याची धास्ती आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर राज्यातील समीकरणे बदलली आहेत. राजकीय पक्ष वाढले तशी स्पर्धा वाढली या स्पर्धेमुळे वाढलेल्या राजकीय महत्त्वकांक्षेमुळे आता महाराष्ट्रात गन (बंदुक) कल्चर येऊ लागले आहे. राजकीय पक्षांची संख्या वाढल्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदार संघातही मोठे त्रांगडे झाल्याचे बघायला मिळत आहे. ज्यांना भविष्यात विधानसभेचे तिकीट हवे आहे त्यांनी आताच पक्षात यावे असा सर्वच पक्षांचा फतवा आहे कारण आमच्या उमेदवारांना लोकसभेला तुमचा फायदा झाला पाहिजे केवळ तुमचा फायदा आम्ही बघणार नाही. ज्या शिंदे गटातील खासदारांचा परफॉरमन्स चांगला आहे, मात्र भाजपचे सध्याचे धोरण म्हणजे माझे ते माझे आणि तुझे ते पण माझे, ही भूमिका बघता काही शिंदे गटातील खासदारांनी आता भाजपच्या वरीष्ठ नेत्यांना भेटून आपली उमेदवारी अंतिम केलेली असली तरी हे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढणार की शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर हे मात्र भाजपच ठरवणार. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देशातील राजकारणापेक्षा राज्यातील सत्तेत आपल्याला वाटा मिळाला पाहिजे हीच भावना कायम राहीली आहे, मात्र त्यांच्यासोबत गेलेल्या खासदारांचे काय? सध्याच्या घडीला महायुतीतील एकही खासदार स्वत: नितीन गडकरीसुध्दा आपल्यालाच पुन्हा तिकीट मिळेल अशी हमी देऊ शकत नाहीत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतही काही जागांवऊन वाद आहेत. मात्र उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात समन्वय असल्याने आत्तापर्यंत ही आघाडी टिकली आहे. राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात येईल. त्यापूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रायगडावर जाऊन तुतारी हे नवीन चिन्ह फुंकले. पुढच्याच आठवड्यात उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीचे खऱ्या अर्थाने वातावरण तयार होईल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article