For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्याचं त्याचं कथानक!

06:18 AM May 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
ज्याचं त्याचं कथानक
Advertisement

भारतातील कोणत्याही निवडणुका असोत, त्यांचं भवितव्य ठरतं ते जनतेला कोणाचं कथानक पटलं यावर. पूर्वी जनतेला फक्त कॉंग्रेसचे पटायचे. त्यांना यश लाभायचे. हळूहळू त्या कथानकातील रस कमी होऊ लागला आणि आघाड्यांचे म्हणणे पटवून घेत जनता काँग्रेस विरोधात गेली. आणीबाणीच्या काळात लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे कथानक लोकांना पटले. पुढे इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर प्रचंड बहुमत घेऊन आलेल्या राजीव गांधी यांच्या विरोधात व्ही. पी. सिंग यांनी रचलेले बोफोर्सचे कथानक चालले. त्याचा परिणाम म्हणून 1977 आणि 1989 मध्ये विरोधी पक्षांचे सरकार येऊन कोसळले. पुन्हा लोकांना पुढच्या निवडणुकीत काँग्रेसचे कथानक योग्य वाटू लागले. 2012 ते 2014 या काळात काँग्रेस आणि मनमोहन सिंग सरकार विरोधात एक कथानक इतके यशस्वी झाले की त्यानेही सत्तांतर घडवून दाखवले. या सगळ्या काळात जनतेत एक वर्ग असा होता, ज्याला हे कॉंग्रेसचे कथानक कितीही यश मिळाले तरी अजिबातच पटत नव्हते. त्यांना ज्या विरोधकांचे मत पटायचे त्यांच्या बाजूने ते आपली शक्ती उभी करायचे.  प्रादेशिक शक्तींच्या बरोबरीने भविष्यात आपण प्रमुख शक्ती बनावे असे वाटणारा डावा आणि उजवा गट आपापल्या पद्धतीने वाटचाल करत राहिला. 1994 साली वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात यातील काही प्रभावी डावे घटकही सामील झाले. पुढच्याच निवडणुकीत भाजपचे इंडिया शायनिंगचे कथानक अपयशी ठरले आणि डाव्यांच्या मदतीने काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. मनमोहन सिंग यांच्यासारखा उजवा चेहरा डाव्यांचे नेतृत्व करत राहिला आणि अणुकराराच्या निमित्ताने तो अमेरिकेच्या अधिक जवळ गेला. डाव्यांचे तेव्हाचे कथानक लोकांना पटले नाही आणि पुढच्या निवडणुकीपासून त्यांचा ऱ्हास सुरू झाला. पुढे महागाई आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा इतका तापला, त्यात निर्भयासारखी प्रकरणे घडली आणि लोकांना नव्या कथानकाने भुरळ घातली. अच्छे दिनचा वायदा करणारे नरेंद्र मोदी सर्वांना एकत्र घेऊन वाटचाल करण्याच्या आणि विश्वासाने वागण्याच्या शब्दावर देशात सत्तेवर आले. अर्थात हा धांडोळा घेताना प्रारंभी पंडित नेहरू ते आता नरेंद्र मोदी असा घेणे अपेक्षितच. नेहरु नावाच्या एका लोकप्रिय व्यक्तीच्या नियतीशी करार या भाषण आणि कथानकापासूनच नेहरू बोलत गेले आणि उमेदवार निवडून येत गेले. तसेच गेली दहा वर्षे मोदी बोलत गेले आणि भाजपचे उमेदवार निवडून येत गेले.

Advertisement

यंदाच्या निवडणुकीत कोणतेही एक कथानक पुढे नव्हते. मोदींच्याकडे सुद्धा लोकांच्या समोर काय, काय मांडावे याबाबत स्पष्टता नव्हती. विरोधकांकडे मोदी नकोत हेच कथानक होते. मात्र ते सरळ न सांगता त्याच्या अवतीभोवतीने इतर गोष्टी आणि उपकथानके मांडून प्रचाराला प्रारंभ झाला. आपल्या यात्रा आणि लोकसंवादातून प्रतिमा बदललेले राहुल गांधी स्वत:चा वेगळा एक अजेंडा अचानकच घेऊन आले. प्रथमच त्यांच्या अजेंड्यावर व्यक्त होण्याची वेळ पंतप्रधानांवर आली.  त्यानंतर पंतप्रधानांचा एरवीचा विकासाचा अजेंडा मागे पडत राहुल गांधींच्या अजेंड्यावर प्रतिक्रियात्मक वक्तव्यात त्यांना आपले स्वतचे व्यूह रचावे लागले. या निमित्ताने त्यांनी स्वत:चे एक कथानक तयार केले. काँग्रेस आणि भाजप किंवा राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यापैकी कोणाच्या कथानकावर कितपत लोक प्रभावित होतात हे चार जूनला समजणार आहेच. पण यावेळी अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक कथानकांना खूप महत्त्व आले. निवडणूक राष्ट्रीय असली तरी प्रादेशिक नेतृत्वाच्या विरोधात भाजपला खूप लढाई करावी लागली. तर काँग्रेसला ठीकठिकाणी प्रादेशिक नेतृत्वांबरोबर तडजोड करावी लागली. या निमित्ताने काही प्रादेशिक नेतृत्वांना एकत्र घेऊन दोघांनीही मांडलेले कथानक आणि प्रादेशिक नेत्यांनी मांडलेली उपकथानके सुद्धा या निवडणुकीच्या निमित्ताने लोकांच्या समोर होती. गेल्या काही दिवसांमध्ये निवडणुकीचा शेवटचा टप्पा येईल तसे गौप्यस्फोटांचे आणि खळबळजनक वक्तव्यांचीही कथानके पुढे आली. त्यांचा प्रभाव किती होतो ते पाहायचे. यामध्ये सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेत बसून केलेले संपत्तीच्या संदर्भातील वक्तव्य, त्याला पंतप्रधानांनी काँग्रेसच्या अजेंड्यासह अल्पसंख्याकांच्या लांगूलचालनाशी जोडणे असो, मणीशंकर अय्यर यांचे पाकिस्तानशी शेजार जपण्या विषयी वक्तव्य असो किंवा फारूक अब्दुल्ला यांचे पाकव्याप्त काश्मीर बाबत संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर पाकिस्तान सुद्धा अण्वस्त्र सज्ज असल्याबाबत दिलेला इशारा असो हे विषय लोकात चर्चिले गेले. मात्र तशाच पद्धतीने रा. स्व. संघ आणि भाजप वेगळा आहे. ते वैचारिक शाखा आहेत आणि आम्ही राजकीय! हे भाजप अध्यक्ष जे पी न•ा यांचे वक्तव्य मतदारांवर प्रभाव पाडणारे ठरणार आहे. मुंबईत होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली आणि उद्धव ठाकरे यांची 2019 मध्ये झालेली चर्चा काढली. शिवसैनिकांना पुन्हा युती करताना आपल्याला काही मिळाले पाहिजे असे वाटावे म्हणून उद्धव ठाकरे यांनी बळेच समसमान सत्ता वाटपाचा आग्रह केला. अमित शहा यांना मातोश्रीवर बोलावून रश्मी ठाकरे यांच्यासमोर काय बोलायचे ते आपल्याकडून वदवून घेऊन पत्रकार परिषदेत एकट्यासच बोलायला लावल्याचा खुलासा आणि त्याद्वारे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याबाबत काहीही ठरले नव्हते आणि ज्यादाचेही काही मिळणार नव्हते, केवळ शिवसैनिकांची समजूत होण्यासाठी आपल्याला असे बोलायला लावले होते, असा ऐनवेळी गौप्यस्फोट केला. या वक्तव्याच्या पाठोपाठ 2014 सालीही ठाकरेंना आपल्या सोबत घेण्याचा आपण केलेल्या प्रयत्नाचा पवारांकडून झालेला उच्चार, भाजपला आता संघाची गरज संपली आहे अशी ठाकरेंनी केलेली घणाघाती टीका आणि आपण पुन्हा भाजप सोबत युती करणार नाही आपल्याला पुन्हा दगा फटका नको आहे असे केलेले वक्तव्य हे सारे ही एका कथानकाचाच भाग आहे. जे सहानुभूती बनून ठाकरेंच्या पाठी उभे आहे, असे आजपर्यंत सांगितले जात होते, त्या कथानकाला ऐन मतदानावेळी छेद देण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला आहे. एकूणात कथानक किंवा आख्यान इतके महत्त्वाचे असते की, ज्यांचे पटते त्यांना जनता यश देते. नेत्यांचे कथानक काही असले तरी सगळ्यांचे ऐकूण सत्यअसत्याला शेवटी मनाची ग्वाही देऊन इतरांच्या बहुमतापेक्षा अंतरात्म्याचे मत योग्य माणून लोक मतदान करतात. त्यांचे सगळ्यांचे मिळून होणारे बहुमत एक सक्षम किंवा कमकुवत राज्यकर्ता देऊन जातात. यंदाच्या वेळी अशा अनेक उपकथानकांनी लोकसभेचे महाभारत गोंधळले आहे. आता त्याचा शेवट जनता काय करते हे समजणे अतर्क्यच!

Advertisement
Advertisement
Tags :

.