घाऊक महागाई दरात ऑगस्टमध्ये किंचित वाढ
0.52 टक्क्यांची नोंद : अन्नपदार्थांच्या किमती वाढल्याचे स्पष्ट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अन्नपदार्थांच्या आणि काही जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने ऑगस्टमध्ये दोन महिन्यांनंतर घाऊक महागाई दर पुन्हा सकारात्मक झाला. सरकारी आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये घाऊक महागाई दर 0.52 टक्के झाला आहे. जुलै आणि जूनमध्ये घाऊक महागाई उणे पातळीवर होता. जुलैमध्ये हा दर उणे 0.58 टक्के आणि जूनमध्ये -0.19 टक्के होता. गेल्यावर्षी ऑगस्ट 2024 मध्ये घाऊक महागाई दर 1.25 टक्के होता. त्या तुलनेत चालू वर्षी हा दर अंशत: कमी नोंद झाला आहे. सध्या घाऊक महागाई दर वाढण्यामागे अन्नपदार्थ, अन्नेतर वस्तू, उत्पादित वस्तू, खनिज उत्पादने आणि वाहतूक उपकरणांच्या दरात झालेली वाढ अशी कारणे सांगितली जात आहेत.
वाढत्या घाऊक महागाईचा थेट परिणाम हळूहळू किरकोळ महागाईवर देखील दिसून येतो. अन्नधान्य आणि दैनंदिन वस्तूंच्या किमतींमुळे सामान्य माणसाच्या खिशावरचा भार वाढू शकतो. तथापि, इंधन आणि वीजेच्या किमतीत घट देखील काही प्रमाणात दिलासा देऊ शकते. डब्ल्यूपीआय डेटानुसार, ऑगस्टमध्ये अन्नपदार्थांमध्ये होणारी घसरण 3.06 टक्के होती, तर जुलैमध्ये 6.29 टक्के होती. या काळात भाज्यांच्या किमती वाढल्या. उत्पादित उत्पादनांच्या बाबतीत, ऑगस्टमध्ये महागाई 2.55 टक्के होती. ती मागील महिन्यात 2.05 टक्के होती. इंधन आणि वीज क्षेत्रात ऑगस्टमध्ये नकारात्मक चलनवाढ किंवा डिफ्लेशन 3.17 टक्के होते, तर जुलैमध्ये ते 2.43 टक्के होते.
उत्पादित वस्तू आणि इंधन
ऑगस्टमध्ये उत्पादित वस्तूंमध्ये महागाई 2.55 टक्के होती. तर जुलैमध्ये 2.05 टक्के होती. त्याचवेळी, इंधन आणि वीज श्रेणीतील महागाई दर ऑगस्टमध्ये -3.17 टक्के होता, जो जुलैमध्ये -2.43 टक्के होता. म्हणजेच, या क्षेत्रात अजूनही किमती घसरत आहेत.