दिल्लीची लढाई कोण जिंकणार?
अतिशी यांना दिल्लीचा नवा मुख्यमंत्री बनवून अरविंद केजरीवाल यांनी एकनवा डाव खेळला आहे. एकाच घावात त्यांनी बरेच पक्षी मारले आहेत.मुख्यमंत्रीपदाचा स्वत: राजीनामा देऊन बिगुल वाजण्याच्या अगोदरच येत्या निवडणुकीची चढाई त्यांनी सुरु केली आहे. आपल्या राजीनाम्याने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जणू जाहीर आव्हानच दिलेले आहे. केजरीवाल हे भ्रष्ट आहेत या भाजपच्या मोहिमेला पंक्चर करण्याकरिता त्यांनी येती निवडणूक म्हणजे स्वत:च्या नेतृत्वावरील सार्वमतात बदलवली आहे. ‘मी तुम्हाला भ्रष्ट वाटत असेल तर येत्या निवडणूकीत मला मतदान अजिबात करू नका’ अशी जोरदार प्रतिमोहीम सुरु करून त्यांनी ही लढाई भाजपच्याच अंगणात
नेलेली आहे. महाराष्ट्र आणि झारखंड बरोबर दिल्लीच्या देखील निवडणुका घ्याव्यात अशी मागणी करून मोदींशी दोन हात करायला आपले हात शिवशिवत आहेत असाच संदेश त्यांनी दिलेला आहे. केंद्राच्या पाशवी बळाद्वारे आपल्याला मातीत मिळवण्याचा डाव भाजप खेळतेय आणि म्हणूनच काहीही कारण नसताना आपल्याला पाच महिने तुरुंगात डांबण्यात आले, असा केजरीवाल यांचा आरोप आहे. कोण किती बदमाश आणि कोण किती साधं हे काळ ठरवेल. पण तिसऱ्यांदा परत मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेने ते झपाटलेले आहेत. पंडित नेहरूंप्रमाणे तिसऱ्यावेळी पंतप्रधान होण्याकरता मोदी जेव्हढे आसुसलेले होते तद्वतच शीला दीक्षित यांच्याप्रमाणे तिसऱ्यांदा केजरीवाल यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. अतिशी यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्ष जरी जिंकला तरी ही लढाई केजरीवाल यांना मुख्यमंत्री करण्यासाठीच आहे असे त्या ठासून सांगत आहेत. भरताने जसे प्रभू श्रीरामाचे सिंहासन अयोध्येचा राजा बनूनदेखील जसे मोकळे ठेवले होते तद्वतच अतीशी भासवत आहेत. ‘राम आयेंगे’ तसेच ‘केजरीवाल आयेंगे’ असा आम आदमी पक्षाचा प्रचार सुरु झाला आहे. तो पक्षच ज्याप्रकारे बांधला गेला आहे त्याने तो म्हणजे ‘सब कुछ केजरीवाल’ आहे. त्या पक्षातील इतर नेते हे केजरीवाल यांचे जणू घरगडीच आहेत असा त्यांच्या विरोधकांचा आरोप फारसा गैरलागू नाही. केजरीवाल यांनी त्यांना आव्हान देऊ शकतील अशा एकाही नेत्याला पक्षात ठेवलेलेच नाही. त्यांनी योगेंद्र यादव, कुमार विश्वास आणि प्रशांत भूषण अशा नेत्यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करून इतर बऱ्याच संस्थापकांना पक्षाबाहेर जाणे भाग पाडले.
2013च्या दिल्लीतील भ्रष्ट्राचार विरोधी लढाईत अण्णा हजारे यांना गुरुस्थानी भासवून केजरीवाल यांनी अचानक स्वत:चे राजकीय बस्तान राजधानीत ज्या प्रकारे बसवले त्याने काँग्रेसला पुरते उखडूनच काढले. राजधानीत काँग्रेसचे पूर्णपणे पुनरुज्जीवन झाल्याशिवाय केजरीवाल यांना सत्तेतून हटवणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील कठीण काम आहे अशी कबुली काही भाजपाई खाजगीत देताना दिसतात. याला कारण विविध कल्याणकारी योजना मग ते मोहल्ला क्लिनिक असो अथवा स्वस्त वीज पुरवठा, पिण्याच्या पाण्याची टँकरद्वारे विविध कॉलनीमध्ये उपलबद्धता, गरिबांच्या मुलांना खासगी शाळातून देखील मोफत शिक्षण अशा बऱ्याच योजना राबवून केजरीवाल यांनी तळागाळात आपला बराच चाहता वर्ग निर्माण केलेला आहे. ज्याचे वीजबिल पूर्वी हजार रुपये येत असे अशा छोट्या घरांना वीज एकप्रकारे मोफतच झालेली आहे.
गमतीची गोष्ट अशी की 2014 पासूनच्या तिन्ही लोकमसभा निवडणूकात भाजपने राजधानीतील सातच्या सात जागा जिंकून मोदींचा जलवा दाखवलेला आहे. पणस्थानिक पातळीवर केजरीवाल यांची पकड अजूनही ढिली झालेली नाही हे देखील तेव्हढेच सत्य आहे. तसे नसते तर आम आदमी पक्षाने दोन वर्षांपूर्वी दिल्लीमहानगरपालिकेतील भाजपची सत्ता जबर चढाईनंतर हस्तगत केली नसती. भाजपला बऱ्यापैकी जागा मिळाल्या असल्या तरी निर्विवाद बहुमत केजरीवाल यांनी मिळवले. राजधानीतील भाजपची ‘कमजोर कडी’ म्हणजे एका तालेवार स्थानिक नेत्याचा अभाव होय. मोदी राष्ट्रीय स्तरावर उदयाला आले तेव्हापासून बऱ्याच राज्यात होयबांना स्थानिक नेतेपद देण्यात आले. त्यातून पक्षाची ज्या राज्यातपिछेहाट सुरु झाली त्यात दिल्ली प्रमुख होय. राष्ट्रीय स्तरावर मोदींचे नेतृत्व मानणारा राजधानीतील एक बऱ्यापैकी मोठा वर्ग स्थानिक पातळीवर केजरीवाल यांना बळ देताना दिसतो. राजधानीत भाजपने नेतृत्वाबाबत केलेले बरेच प्रयोग फसले. 2013 सालच्या निवडणुकीत ज्या हर्षवर्धन यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विधानसभेतील 70 पैकी 33 जागा जिंकल्या होत्या त्यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने तिकिटदेखील नाकारले.
ज्यादिवशी भाजप हर्षवर्धन अथवा कैलासवासी मदनलाल खुराणा यांच्यासारखा तालेवार नेता स्थानिक स्तरावर उभा करेल तेव्हा केजरीवाल यांना स्पर्धा जाणवू लागेल. केजरीवाल यांच्या विरोधात कन्हैया कुमार या बिहारमधील तरुण तेजतर्रार नेत्याला दिल्ली काँग्रेसचा प्रमुख करण्याचे राहुल गांधी यांच्या मनात घाटत होते पण स्थानिक पातळीवरील विरोधामुळे त्यांनी तो नाद सोडून दिला. थोडक्यात काय तर नवी दिल्लीवरून साऱ्या देशावर राज्य करणाऱ्या मोदींसमोर दिल्लीत मात्र केजरीवाल यांच्या रूपाने एक आगळे आव्हान उभे राहिलेले आहे. त्यांना पाच महिने तुरुंगात ठेवले तरी त्यांच्या प्रभावात फारसा फरक पडलेला आहे असे दिसत नाही. या निवडणुकीत केजरीवाल यांच्याशी दोन हात करायला माजी मंत्री स्मृती इराणी यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून उतरवण्याविषयी भाजपात खल सुरु आहे. इराणी या मूळच्या दिल्लीतील आहेत. 2019च्या निवडणुकीत राहुल गांधी यांना अमेठीतून पराभूत करून स्मृतींनी वाहवाही मिळवली होती. पण नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यावर त्या अडगळीच्या खोलीत पडल्या. दहा वर्षांपूर्वी किरण बेदींना भाजपने मैदानात उतरवले होते. तो बेत फसला. केजरीवाल हे बऱ्याच प्रकारे मोदींप्रमाणेच आहेत. ते इतर कोणाच्या नेतृत्वाला फारसे मानत नाहीत. विरोधी ऐक्यावर देखील फारसा त्यांचा विश्वास नाही. सध्या ते विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीबरोबर आहेत कारणमोदी लवकरच आपल्यावर आणि आपल्या पक्षावर वरवंटा फिरवतील अशी भीती निर्माण झाल्याने ते गेल्या वर्षी भाजपविरोधकांत सहभागी झाले. विरोधी पक्षांनी त्यांच्या अटकेच्या विरोधात उभे राहण्याचे काम केले होते. गमतीची गोष्ट अशी की काँग्रेसचे केजरीवाल यांनी बरेच नुकसान केलेले असले तरी त्यांच्या लोकप्रिय योजनांमुळे राहुल गांधी देखील काही बाबतीत त्यांचे प्रशंसक
मानले जातात. आम आदमी पक्ष हा भाजपची ‘बी’ टीम बनत आहे असा समज राजधानीत बऱ्याप्रमाणात असलेल्या मुस्लिम समाजाचा होत आहे. भाजप आपल्याला हिंदुत्वविरोधक ठरवेल या भीतीने केजरीवाल सॉफ्ट हिंदुत्वाचा आधार घेत त्याच्या मुस्लिम मतदाराला वाऱ्यावर सोडत आहे. हा मतदार भाजपला मत देऊ शकत नाही असा केजरीवाल यांचा समज आहे. पण राजधानीत काँग्रेस पुनरुज्जीवित झाली तर हा मुस्लिम मतदार पहिल्यांदा पळेल हे देखील ते जाणून आहेत. केजरीवाल याना दारू घोटाळा प्रकरणात जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने ज्या अटी घातल्या आहेत. त्यामुळे त्यांना सत्वर परत मुख्यमंत्री बनता येईल की नाही याविषयी शंका आहे. दिल्लीत अतीशीना पुढे करून केजरीवाल यांनी जो डाव मांडला आहे तो पंक्चर करण्याच्या कामी भाजप लागली आहे. जर केजरीवाल यांचे केवळ आपण डमी आहोत असेच मुख्यमंत्र्यांनी सारखेच भासवले तर प्रचारात वस्ताद असलेली भाजप हा डाव उलटवू शकते अशी भीती राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
सुनील गाताडे