For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘राम’ बाण कोणाला तारणार? कोणाला मारणार?

06:12 AM Jan 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘राम’ बाण कोणाला तारणार  कोणाला मारणार
Advertisement

पुढील आठवड्यात अयोध्येत रामाच्या भव्य मंदिराची प्रतिष्ठापना होणार आहे. बाबराच्या काळापासून हिंदूंवर होत असलेला अन्याय आपण धुवून काढत आहोत असे सत्ताधारी दाखवत असून अयोध्येच्या राजाचे पेटंट केवळ आपल्याकडेच आहे असे दाखवणे सुरु आहे. ते कितपत खरे अथवा कसे ते ज्याचे त्याने ठरवायचे आहे. इकडे भगवान राम यांचे भव्य मंदिर लोकांना खुले झाले की तिकडे सत्तेतील आपली तिसरी पारी सुरु होणार असा आत्मविश्वास भाजपमध्ये दिसत आहे. तो कितपत बरोबर अथवा चूक ते येणारा काळ दाखवणार आहे.

Advertisement

रामाला पुढे करून जे राजकारण सुरु झाले आहे ते भाजपला जिंकण्यासाठी/जिंकवण्यासाठी, हा जो समज झालेला आहे तो फारसा चुकीचा नाही. ‘बाप दाखवा नाहीतर श्राद्ध करा’ या न्यायाप्रमाणे अयोध्येच्या समारंभाला या आणि तुम्ही हिंदू तसेच हिंदूहित्तेशी आहात असे दाखवा असे विरोधी पक्षांना सांगितले जात आहे. बाबरी मशिदीच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक राहिलेल्या विश्व हिंदू परिषदेने आणि संघ परिवारातील तमाम संघटनांनी प्रचार-प्रसार करण्यासाठी आकाश पाताळ एक केलेले आहे. या समारंभाची अक्षता गावोगावी आणि पाड्यावरदेखील पोहोचली आहे. हिंदू जन जागरणाच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘हिंदू हृदय सम्राट’ ही छबी बळकट केली जात आहे.

बदललेल्या परिस्थितीत मोदी हेच हिंदुत्वाचे सर्वेसर्वा झालेले आहेत आणि बाकीच्यांना गौण स्थान आहे मग ते भाजपमधील असोत वा इतरत्र संघटनेतील. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे मार्गदर्शक मंडळात केव्हाच घातले गेलेले आहेत. अयोध्येच्या या समारंभाचा राजकीय लाभ जितका पंतप्रधानांना मिळणार आहे तितकाच तो उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मिळणार आहे. जहाल हिंदुत्ववादी योगी यांना मोदींचा नैसर्गिक उत्तराधिकारी मानत असल्याने योगी यांचे डोळे हे 2029च्या लोकसभेकडे आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत मोदींचे घोडे एकदाचे न्हाले की पुढे आपलेच राज्य असा योगींचा समज आहे. साऱ्या देशभर राम लहर ही इतक्या वेगाने पसरवण्याचे काम सुरु आहे की त्यात विरोधक वाहून जातील अशी काहीशी भावना आणि विश्वास सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे. सरकार धार्जिण्या मीडियाने याबाबत प्रचार शिगेला पोहोचवून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. त्याने गैरभाजप पक्षात साहजिकच चिंता निर्माण झालेली आहे.

Advertisement

या प्राणप्रतिष्ठा महोत्सवात देशातील चार शंकराचार्यांनी गैरहजेरी लावण्याचे घोषित करून राज्यकर्त्यांची बरीच पंचाईत करून ठेवलेली आहे. मंदिराचे बांधकामच अजून पूर्ण झालेले नाही अशावेळी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे हिंदू धर्मशास्त्राला संमत नाही असा निर्वाळा देऊन या समारंभाद्वारे केवळ राजकीय पोळी शेकली जात आहे असेच त्यांच्याकडून सुचवले जात आहे. जर स्वत: पंतप्रधानच प्राण प्रतिष्ठा करणार असतील तर तिथे शंकराचार्यांनी टाळ्या वाजवण्याचे काम करावयाचे आहे काय? असेही सांगितले जात आहे. भाजपची हिंदुत्वावरील मत्तेदारी तोडल्याशिवाय देशातील राजकारण पुढे जाणार नाही. त्याचे डबके बनेल अशी रास्त भीती विरोधकांना वाटत आहे. आपण भगवान रामाचे तेव्हढेच निस्सीम उपासक आहोत जेव्हढे सत्ताधारी दाखवतात. आपण हिंदू विरोधी असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमचे नेते वेळोवेळी मंदिर, गुरुद्वारा, चर्चमध्ये जात असतात’, असे प्रतिपादन करण्यासाठी काँग्रेसला आपल्या मुख्यालयात एक खास पत्रकार परिषद घेणे भाग पडावे यातच परिस्थितीचा किती दणका आहे तो दिसून येतो.

शंकराचार्यांनी केलेल्या अशा टीकेमुळे फारसा राजकीय न बनलेला हिंदू थोडासा सावध होत आहे. दुसरीकडे खिंडीत पकडले गेलेले विरोधक देखील भाजपला प्रश्न विचारू लागले आहेत. ‘जर शंकराचार्यच या समारंभाकडे पाठ फिरवत असतील तर मग तो धार्मिक कसा? धर्मशास्त्र शंकराचार्यांना जास्त कळते की भाजपला? इतरांना निमंत्रणे देण्याचा अधिकार भाजपाला कोणी दिला? देवाचे दर्शन घेण्यासाठी कोणीही, केव्हाही जाऊ शकतो, मग त्याच्या मार्गात हे ‘बडवे’ कशासाठी? ‘रामाच्या नावाखाली सत्ता हडपवण्याचे हे राजकारण कशासाठी?’ असे एकानेक प्रश्न विरोधक विचारत आहेत. भाजपचा ‘रामबाण’ हा फक्त सत्ता लाटण्यासाठी आहे, त्याच्या भक्तीसाठी नाही, हे दाखवण्यात गैरभाजपाई जितके यशस्वी होतील तितकी ही मोहीम राजकीयदृष्ट्या फुसकी ठरेल. पण हे सोपे काम नाही कारण जे 22 तारखेला येणार नाहीत ते ‘राम द्रोही’ असा प्रचार टीपेला पोहचला आहे.

पंचवीस वर्षांपूर्वी एकेकाळी केंद्रात गृहमंत्री राहिलेल्या बुटा सिंग यांनी लोकसभेत भाषण केले होते. त्याच्या अगोदरच्या निवडणुकीत ते राजस्थानमधील जलोर या बालेकिल्ल्यात दणकून पराभूत झालेले होते. त्यांनी सांगितले की त्या निवडणूकीत त्यांचा पराभव ठरलेला होता कारण त्यांचा सामना महाबली हनुमानाशी होता. विरोधकांनी बजरंग बली घोषणा देत असा प्रचार केला की बिचाऱ्या बुटाचा  कचरा झाला. ‘बजरंग बलीशी कधी कोणी टक्कर घेऊ शकतो का?’ असा प्रश्न विचारून त्यांनी धर्माच्या नावावर केलेले राजकारण कितपत बरोबर असा सवाल केला होता. ‘सर्वनाशाची वेळ आली तर विद्वान आपली अर्धी संपत्ती त्यागतो की जेणेकरून उरलेली वाचू शकेल’, अशा अर्थाचे एक संस्कृत सुभाषित आहे.

काँग्रेसने सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि अधीर रंजन चौधरी हे आपले तिन्ही नेते 22 जानेवारीच्या समारंभाला जाणार नाहीत असे सांगून असेच काहीसे केलेले आहे. भाजपने टाकलेल्या जाळ्यात फसलो तर आपण ‘इकडचे देखील राहणार नाही आणि तिकडचे देखील’ हे ओळखून त्यांनी वेळीच आपला निर्णय जाहीर केला हे बरे झाले. काँग्रेसची भूमिका नेहमी सर्वसमावेशक राहिली आहे त्याने तिचा जसा फायदा झाला तसे नुकसानदेखील.

येत्या आठवड्यात उत्तर प्रदेश काँग्रेसमधील बरीच नेतेमंडळी वाजतगाजत अयोध्येत राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे सत्ताधाऱ्यांच्या प्रचाराला पंक्चर करण्याचे काम सुरु होणार आहे. तो कितपत यशस्वी होईल त्यावर बरंच काही अवलंबून आहे. भाजपला प्रादेशिक पक्षांचे नेते अयोध्येला येणार की नाही याविषयी फारसे सोयरसुतक नाही. त्याला माहित आहे की आपला खरा प्रतिस्पर्धी हे केवळ काँग्रेसच आहे. त्याला जायबंदी केले तर बाकींच्यांकडे दुर्लक्ष केले तरी चालेल अशी त्याची रणनीती.

दहा वर्षे पंतप्रधान राहून मोदींनी गरिबी, महागाई आणि बेरोजगारी सारख्या ज्वलंत प्रश्नांवर काहीही केलेले नाही, त्यांच्या कारकिर्दीत देशाचे कर्ज तिप्पट वाढले, श्रीमंत अजूनच गब्बर झाले तर गरीबाची अजूनच उपासमार झाली. चीनने केलेल्या घुसखोरीने मोठे संकट देशापुढे उभे राहिले तरी सरकारचे मौन असा सरकारच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचणे विरोधकांनी सुरु केले आहे. या सगळ्यावर पांघरूण घालण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराचा ढोल रात्रंदिवस पिटून निवडणूक जिंकण्याचा त्यांचा डाव आहे असे ते सांगत आहेत. 22 तारखेला देशात दिवाळी साजरी करा असे सांगणे ठीक आहे पण देशाचे जे दिवाळे वाजले आहे त्यावर देखील चर्चा झाली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.

येत्या आठवड्यात राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा देखील सुरु होत आहे तसेच विरोधकांच्या इंडिया आघाडीतील जागावाटप देखील बऱ्या प्रमाणात ठरण्याची अपेक्षा आहे. अयोध्येमुळे भाजपचा बागुलबुवा जास्तच झाला आहे. त्याला येत्या काळात विरोधक किती रामबाण उपाय करतात त्यावर अयोध्येतील ‘राम’ बाण किती प्रभावी अथवा किती फुसका ठरणार हे कळणार आहे. दिसती तितकी ही लढाई कोणालाच सोपी नाही. अयोध्येच्या कुरुक्षेत्रात कौरव कोण? पांडव कोण? हे देखील कळणार आहे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.