For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘नदी की पाठशाला’तून ‘धडे’ नक्की कोण घेणार?

06:23 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘नदी की पाठशाला’तून ‘धडे’ नक्की कोण घेणार
Advertisement

भूस्खलन, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीतून कोकण वाचवायचे असेल तर सह्याद्रीच्या रांगांमध्ये होणारी बेसुमार जंगलतोड थांबायली हवी. ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांच्यापासून विविध तज्ञ, शासनाचे नियुक्त अभ्यासगट जे सांगत आले तेच आज जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांनी चिपळुणातील दोन दिवसांपूर्वीच्या कोकणस्तरीय नदी की पाठशाला निवासी शिबिरात सांगितलं. या विषयावर पाठशालेत मंथन, निष्कर्ष, ठराव झाले असले तरी आतापर्यंतच्या राजकीय अनास्थेमुळे यातून नक्की धडे कोण घेणार, यावरच या पाठशालेचे फलित अवलंबून आहे.

Advertisement

नद्यांना समजून घेणे, त्यांचा तट, प्रवाह, जैवविविधता, नद्या आणि समाजाचे नाते याविषयी कृतीशील कौशल्ये व ज्ञान देण्यासाठी चिपळुणातील डिबीजे महाविद्यालयात कोकणस्तरीय नदी की पाठशाला हे अनोखे निवासी शिबीर पार पडले. तीन दिवस चाललेल्या या शिबिरात जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांच्यासह अनेक तज्ञांनी आपली अभ्यासपूर्ण मते मांडली. जंगल हे कोकणला लाभलेले मोठे वरदान आहे. ते पाहण्यासाठी जग येथे येते. हेच जंगल आमचा मूळ आधार आहे. असे असाताना त्याच जंगलावर कुऱ्हाड चालवली जात आहे. यामुळे माती, दगड वाहून थेट नद्यांमध्ये जात असल्याने नद्यांचा तळ वर येतो आणि कमी पाऊस पडला तरी पूर येतो. त्यामुळे कोकणातील जंगलतोड हे पुराचे मुख्य कारण आहे. त्यामुळे बेसुमार जंगलतोड थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन या पाठशालेतून करण्यात आले. पूरमुक्ततेसाठी सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वृक्षतोड थांबवून गर्द झाडी निर्माण करण्यासह कोकणच्या दृष्टीने चार ठरावही पारित केले गेले.

कोकणावर निसर्गाचा कोप

Advertisement

कोकण खर तर वैशिष्ट्यापूर्ण भौगोलिक रचनेमुळे निसर्गसंपन्न आहे. एका बाजूला सह्याद्रीचे उंचच उंच कडे आणि दुसरीकडे अरबी समुद्र आणि त्याच्या मधल्या चिंचोळी पट्टीत वसलेले कोकण पिढ्यान्पिढ्या निसर्गाशी एकरुप होऊन जगण्याचे धडे गिरवत आले आहे. मात्र येथे निसर्गाला दगाफटका करण्याचे प्रयत्न झाल्यानंतर त्याचा कोपही दिसू लागला आहे. सह्याद्रीचे कडे दरडीच्या रुपाने वस्तीकडे सरकण्याचे संकेत मिळू लागल्यानंतर ही धोक्याची छाया किती गडद आहे, याची कल्पना येऊ लागली आहे. डोंगर कोसळला तर काय होऊ शकते, याचा सगळ्यात जास्त गंभीर नमुना माळीण, तळीये, पोसरे, इर्शाळवाडी यासारख्या असंख्या दुर्घटनांमधून दिसून येतो आहे.

वृक्षतोड बंदीची घोषणा बारगळली

कोकणात 2005, 2021 आणि 2023 मध्ये असंख्य भूस्खलनच्या दुर्घटना घडून शेकडो बळी गेले आहेत. ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखालील समितीने 13 वर्षापूर्वी पश्चिम घाटासंदर्भात केलेल्या महत्वपूर्ण शिफारशी वेळीच अंमलात आणल्या गेल्या असत्या तर कदाचित रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीसारख्या दुर्घटना घडल्या नसत्या. यापूर्वी तत्कालीन वनमंत्री कै. पतंगराव कदम यांनीही विधानसभेत कोकणातील वृक्षतोड बंदीची घोषणा केली होती.

मात्र राजकीय रेट्यानंतर ती पुढे बारगळली. जुलै 2021 च्या महापुरानंतर वृक्षतोड बंदीवर चारही बाजूने आवाज उठवला गेला असतानाही राजकीयदृष्ट्या या कळीच्या मुद्यावर सारेच लोकप्रतिनिधी गप्प राहिले. त्यामुळे मूळ प्रश्न तसाच कायम राहिला.

कोकणात नद्या गाळाने भरलेल्या

मुळातच सर्वाधिक पाऊस कोसळणाऱ्या कोकणातील नद्या गाळाने भरलेल्या आहेत. वारंवारच्या अतिवृष्टीमुळे त्यांचे प्रवाहही बदलले गेले आहेत. त्यामुळे गाळाने भरलेल्या या नद्या पावसाळ्यात पाण्याला वाट मिळेल, तशा पध्दतीने त्या वाहत जातात. परिणामी काठावरील नागरी वस्त्या, शहरे आणि बाजारपेठ यांना त्याचा तडाखा बसतो. परिसरातील शेतीचीही वाताहत होते. 22 जुलै 2021 च्या महापुरात चिपळूण, महाड, खेड, संगमेश्वर, राजापूर शहरांना मोठा फटक बसला, मोठी आर्थिक तसेच जीवितहानी झाल्यानंतर कोकणातील बहुतांशी नद्यांचा गाळाचा गंभीर प्रश्न हा प्रामुख्याने पुढे आल्यानंतर सर्वत्र गाळ उपसा मोहीम हाती घेण्यात आली.

दुर्घटनेनंतर निसर्गाला दोष

गाळ उपसा मोहीम सुरू ठेवली जाईल. मात्र मुख्य प्रश्न म्हणजे हा गाळ नेमका कुठून येतो, याचाही शोध घेऊन त्या दृष्टीनेही उपाययोजनेची गरज आहे. चिपळूणचेच उदाहरण द्यायचे झाले तर 2005 मध्ये महापूर आल्यानंतर काही प्रमाणात नदीतील गाळ उपसा केला गेला. नद्या मोकळ्या झाल्याने परिणामी नंतरची दहा वर्षे पुराची झळ कमी बसली. मात्र नद्या पुन्हा भरल्यानंतर पुराची तीव्रता नंतरच्या पाच वर्षात वाढत गेली. मात्र त्याची कारणे वृक्षतोड, नदीपात्रातील बांधकामांसह अनेक आहेत. प्रत्येकवेळी दुर्घटना घडली की, निसर्गाला दोष देऊन आपल्या चुकांवर पांघरुण टाकले जाते. 22 जुलैच्या पूरस्थितीतही पाटबंधारे खाते, जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या आपल्या अहवालात पावसाला दोष देण्यात आला आहे. मुळातच पाऊस हा दरवर्षीच कोसळणार, पूर येणार आणि दरडी कोसळून हकनाक बळीही जाणार. मग प्रत्येकवेळी पावसाला दोष देऊन मोकळे होण्यापेक्षा त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे.

डॉ. राजेंद्रसिंहकडून कानउघडणी

अतिसंवेदनशील पश्चिम घाटात ज्या पद्धतीने मानवी हस्तक्षेप सुरू आहेत, ते थांबवले पाहिजे. दगड खाणी, रस्ते यांचे काम केले जाते आहे. लोकांना काय हवं आहे? हे त्यांना विचारून पुढे जायला हवं. आज जो विकास होतो आहे, तो निसर्ग आणि लोकांना डावलून केला जातो आहे. विकास या गोंडस नावाखाली हे सगळे चालले आहे. यात धनिकांचे हितसंबंध राजकीय नेते सांभाळत आहेत. अशा घटना म्हणजे केवळ निसर्गाची आपत्ती मुळीच नाही. सह्याद्रीवर आपण जे मानवी आघात करतो आहोत, त्या आघातांचा हा दुष्परिणाम असल्याचे ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. गाडगीळ परखडपणे मांडले आहे. त्या पाठोपाठ ा†चपळूण पा†रसरात आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या कोळकेवाडी अवजल अभ्यास गटाने आपल्या अहवालात विविध उपाययोजनांसह सह्याद्रीच्या खोऱ्यात कायमस्वरुपी वृक्षतोड बंदीची शिफारस केली आहे. आता 2 दिवसांपूर्वी चिपळुणात शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून झालेल्या नदी की पाठशाला शिबिरात भारताचे जलपुऊष या नावाने ओळखले जाणारे डॉ. राजेंद्र सिंह राणा यांनीही नेमके यावर बोट ठेवत प्रशासनाची आणि सरकारचीही कानउघाडणी केली, हे बरे झाले. त्यामुळे आता तरी शासनाने आणि कोकणातील राज्यकर्त्यांनी ही बाब गंभीरपणे घेण्याची गरज आहे.

राजेंद्र शिंदे

Advertisement
Tags :

.