For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हरियाणा, काश्मीरमध्ये कोण सरकार स्थापणार?

06:29 AM Oct 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
हरियाणा  काश्मीरमध्ये कोण सरकार स्थापणार
Advertisement

दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुकांचे आज निकाल

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जम्मू काश्मीर आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकांच्या निकालाची सर्वांना प्रतीक्षा आहे. दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवार, 8 ऑक्टोबरला लागणार आहेत. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुऊवात होणार आहे. पोस्टल मतपत्रिका प्रथम मोजल्या जातील. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्समध्ये (ईव्हीएम) नोंदवलेल्या मतांची मोजणी केली जाईल. दुपारपर्यंत झालेल्या मतमोजणीनंतर कोणता पक्ष सरकार स्थापन करू शकेल याचा अंदाज येणार असला तरी अंतिम निकाल सायंकाळीच स्पष्ट होणार आहेत.

Advertisement

हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन राज्यांमधील मतदानाची प्रक्रिया दोन दिवसांपूर्वीच पार पडली. मतदान झाल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये बहुतांश संस्था किंवा वाहिन्यांनी काँग्रेसला अधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. हरियाणात सध्या सत्तेत असलेल्या भाजपला सत्ता गमवावी लागेल, अशी आकडेवारी बऱ्याच एक्झिट पोलमध्ये दिसून आली. तसेच जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्या आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील, असा होरा व्यक्त करण्यात आला आहे. तर काही वाहिन्यांना त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची भाकित वर्तवल्यामुळे काश्मीरच्या निकालाबाबत संपूर्ण देशवासियांना प्रचंड औत्सुक्य आहे. अनुच्छेद 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका पार पडल्यामुळे त्यांना विशेष महत्त्व आहे. तथापि, आता कोणता पक्ष सत्ता स्थापन करणार याचा उलगडा मंगळवारी मतमोजणीअंती होणार आहे.

हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. तर जम्मू काश्मीर विधानसभेच्या 90 जागांसाठी 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी तीन टप्प्यात मतदान झाले. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली, तर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी आणि भारतीय जनता पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. हरियाणात मुख्य लढत भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी (आप) यांच्यात होत आहे. तसेच इंडियन नॅशनल लोकदल-बहुजन समाज पार्टी आणि जननायक जनता पार्टी-आझाद समाज पक्ष यांची भूमिकाही निर्णायक ठरू शकते.

जम्मू काश्मीरमध्ये पाच नामनिर्देशित आमदार

8 ऑक्टोबर रोजी जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच पाच आमदारांचे नामांकन केले जाईल. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा विधानसभेसाठी 5 जणांना नामनिर्देशित करतील. अशा स्थितीत एकूण आमदारांची संख्या 95 झाल्यामुळे बहुमताचा आकडा 48 वर पोहोचणार आहे. 370 हटवल्यानंतर उपराज्यपाल ‘जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा 2019’ अंतर्गत विधानसभेत 5 आमदारांना नामनिर्देशित करू शकते. हा नियम महिला, काश्मिरी पंडित आणि पीओके यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणण्यात आला होता. जुलै 2023 मध्ये यात सुधारणा करण्यात आली होती. या नामनिर्देशित आमदारांना विधानसभेतील मतदानाच्या अधिकारासोबतच विधानसभेचे सर्व अधिकार आणि विशेषाधिकार मिळतील.

Advertisement
Tags :

.