टीम इंडियाने बांगलादेशचा अवघ्या 71 चेंडूत उडवला धुव्वा
सामनावीर अर्शदीप सिंग : 14 धावांत 3 बळी
मयांक यादव : पदार्पणातील पहिलेच षटक निर्धाव
वृत्तसंस्था/ ग्वाल्हेर
सामनावीर अर्शदीप सिंग, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने ग्वाल्हेर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात बांगलादेशचा सात विकेट्स राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 127 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने अवघ्या 11.5 षटकांत म्हणजेच केवळ 71 चेंडूत 3 गडी गमावून सामना जिंकला. आता, उभय संघातील दुसरा सामना दि. 9 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे होईल.
रविवारी ग्वाल्हेर येथील माधवराव सिंधिया मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर बांगलादेश संघाला 128 धावांचेच लक्ष्य देता आले. प्रत्युत्तरात बांगलादेशने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला तो अभिषेक शर्माच्या रुपात. अभिषेक शर्माने यावेळी फक्त 7 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 16 धावा फटकावल्या. अभिषेक बाद झाल्यावर कर्णधार सूर्यकुमार फलंदाजीला आला आणि भारताच्या धावगतीला चांगलाच वेग मिळाला. सूर्याने 14 चेंडूंत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या जोरावर 29 धावांची खेळी साकारली. सूर्या बाद झाल्यावर संजू सॅमसनने काही आक्रमक फटके खेळले. संजूने यावेळी 19 चेंडूंत सहा चौकारांच्या जोरावर 29 धावांचे योगदान दिले.
हार्दिकची फटकेबाजी
संजू बाद झाला आणि त्यानंतर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्याने नितीश कुमार रे•ाrच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला. हार्दिकने बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना 16 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारासह नाबाद 39 धावा फटकावल्या. तर नितीशकुमारने नाबाद 16 धावा करत त्याला चांगली साथ दिली. टीम इंडियाने विजयासाठीचे लक्ष्य 11.5 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. बांगलादेशसाठी एकही गोलंदाज छाप सोडू शकला नाही. मुस्तफिजुर रहमान आणि मेहदी हसन मिराजला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
अर्शदीप-वरुणचा भेदक मारा, बांगलादेशला 127 धावांत रोखले
प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशला अर्शदीप सिंगने सुरुवातीलाच्या तीन षटकातच दोन धक्के दिले. त्याने लिटन दास आणि नंतर परवेझ हुसेनला बाद करून बांगलादेशला अडचणीत आणले. यानंतर ठराविक अंतराने बांगलादेशचे फलंदाज बाद होत गेले. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने सर्वाधिक नाबाद 35 धावा केल्या. कर्णधार शांतोने 27 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज मात्र भारतीय गोलंदाजासमोर फेल ठरले. अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती यांच्या भेदक माऱ्यासमोर त्यांचा डाव 127 धावांवर आटोपला. अर्शदीप सिंग व फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. मयांक यादवने आपल्या टी-20 कारकिर्दीतील पहिले षटक टाकले आणि एक विकेट घेण्यातही तो यशस्वी ठरला.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश 19.5 षटकांत सर्वबाद 127 (नजमूल शांतो 27, मेहदी हसन मिराज नाबाद 35, तस्कीन अहमद 12, अर्शदीप सिंग व वरुण चक्रवर्ती प्रत्येकी तीन बळी, हार्दिक पंड्या, मयांक यादव व वॉशिंग्टन सुंदर प्रत्येकी 1 बळी).
भारत 11.5 षटकांत 3 बाद 132 (संजू सॅमसन 29, अभिषेक शर्मा 16, सूर्यकुमार यादव 29, नितीश रे•ाr नाबाद 16, हार्दिक पंड्या नाबाद 39, मुस्तफिजूर रेहमान व मेहदी हसन मिराज प्रत्येकी एक बळी).
मयांक यादवचे अनोखे रेकार्ड
भारत व बांगलादेश संघातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेला रविवारी (6 ऑक्टोबर) पासून सुरूवात झाली. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवने पदार्पण केले. मयांकने पदार्पणातच आश्चर्यकारक कामगिरी करून अजित आगरकरच्या खास यादीत स्थान मिळवले आहे. वास्तविक मयांक यादवने पदार्पणाच्या पहिल्याच षटकात एकही धाव दिली नाही आणि त्याने हे षटक मेडन टाकले. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. पॉवरप्लेचे शेवटचे षटक टाकण्यासाठी मयांकला पाचारण करण्यात आले होते. यादवने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्याच षटकात आपल्या वेगवान गोलंदाजीचा कहर केला आणि इतिहास रचला.
पदार्पणाच्या सामन्यात निर्धाव षटक टाकणारे भारतीय गोलंदाज
अजित आगरकर वि दक्षिण आफ्रिका (2006)
अर्शदीप सिंग वि इंग्लंड (2022)
मयांक यादव वि बांगलादेश (2024).