कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रिक्षाचालकांच्या मुजोरीला आवर घालणार कोण?

06:55 AM Nov 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दोन ते तीन किलोमीटरसाठी दीडशे रुपये भाड्याची मागणी

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

मुंबई, बेंगळूरप्रमाणेच आता बेळगावमध्येही रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे शक्ती योजनेमुळे व्यवसायाला फटका बसला आहे, असे सांगण्यात येत असले तरी दुसरीकडे इतके पैसे दिले तरच भाडे स्वीकारू, असे सांगितले जात आहे. मीटरप्रमाणे पैसे आकारण्यास विरोध करत नागरिकांची लुबाडणूक करण्याचे प्रकार सुरू आहेत. कोल्हापूर ते बेळगाव या प्रवासासाठी बसचे भाडे दीडशे रुपये आकारले जाते. तर टिळकवाडी ते शहरात येण्यास रिक्षाचालक दीडशे ते दोनशे रुपये आकारत आहेत. त्यामुळे दोन ते तीन किलोमीटरच्या प्रवासासाठी 120 किलोमीटरच्या प्रवासाइतके भाडे मोजावे लागत असल्याची भावना प्रवाशांतून व्यक्त होत आहे.

बेळगाव शहरामध्ये दहा हजारापेक्षा जास्त ऑटोरिक्षा आहेत. वर्षभरापूर्वी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ऑटोरिक्षाचे मीटर सुरू करण्याची सूचना केली होती. परंतु, रिक्षाचालक संघटनांनी याला विरोध करत बेळगाव शहर हे दहा ते बारा किलोमीटरमध्ये मर्यादित असल्याचे सांगितले. परंतु, इतर शहरांमध्ये मीटरद्वारेच पैसे घेतले जात असताना मग बेळगावमध्येच सूट का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. काही रिक्षाचालक योग्य दराप्रमाणे भाडे आकारत असले तरी काहींच्या मुजोरीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

दोन दिवसांपूर्वी एक प्रवासी टिळकवाडीतून कडोलकर गल्ली येथे जाणार होता.  रिक्षाचालकाने यासाठी दीडशे रुपये भाडे सांगितले. यावेळी तो प्रवासी म्हणाला, कोल्हापूर ते बेळगाव मी दीडशे रुपयात बसने पोहोचलो. मग या दोन ते तीन किलोमीटरसाठी तुला दीडशे रुपये द्यायचे का? यावेळी रिक्षाचालक म्हणाला, बसमधून तुम्ही सर्वांसोबत प्रवास करता.

मात्र रिक्षामधून तुम्ही एकटेच जाणार असल्याचे उद्धट उत्तर देण्यात आले. टिळकवाडी ते समादेवी गल्ली, नार्वेकर गल्ली हे अंतर व बेळगाव ते कोल्हापूर अंतर किती आहे? याचा विचारही रिक्षाचालकांनी करायला हवा. अवघ्या दोन ते तीन किलोमीटरसाठी इतके भाडे आकारले जात असेल तर आता जिल्हा प्रशासन, तसेच आरटीओ विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे.

ओला-उबेरलाही विरोध

मुंबई, पुणे, बेंगळूर अशा मोठ्या महानगरांमध्ये ओला-उबेर या कंपन्यांच्या रिक्षा, टॅक्सी सेवा उपलब्ध आहेत. किलोमीटरप्रमाणे प्रवाशांकडून थेट कंपनीकडून भाडे ठरविले जाते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत नाही. अशा सुविधा बेळगावमध्ये सुरू करण्यासाठी प्रयत्न झाला. परंतु, रिक्षा संघटनांनी याला कडाडून विरोध केला. काही रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे रिक्षा व्यवसायावरच परिणाम होऊ लागला आहे. काही रिक्षाचालक खरोखरच प्रामाणिकपणे सेवा बजावत योग्य ते भाडे आकारतात. पण त्यांची संख्या अत्यल्प आहे. बसस्थानकावरून शहरात यायचे झाल्यास अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाते.

रिक्षाचालक कायम खड्डेयुक्त रस्ते, शक्ती योजनेमुळे झालेला परिणाम, पेट्रोलचे वाढते दर याची कारणे देतात. परंतु, सामान्य ग्राहकांचा याच्याशी थेट संबंध नसतो. रिक्षाचालकांचा उदरनिर्वाह चालला पाहिजे. परंतु, ग्राहकांना त्यांनी निष्कारण वेठीस धरणेही बंद होणे गरजेचे आहे. रिक्षाचालकांच्या संघटनांनी एकत्रित येऊन प्रशासनाशी चर्चा करून किंवा परस्पर समन्वयाने ठराविक दर ठरवून दिल्यास रिक्षाचालक व ग्राहक यांचीही सोय होईल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article