कौन बनेगा मुख्यमंत्री...
विधानसभा निवडणुकीची कधीही घोषणा होऊ शकते. मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाची चर्चा पूर्ण झालेली नसताना, सध्या मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे. कार्यकर्ते आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी आतापासूनच बॅनरबाजी करत आहेत. महायुतीत मुख्यमंत्रिपदाचे तीन दावेदार आहे. त्यात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा समावेश आहे. या तिघांचीही मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा कधीही लपून राहिलेली नाही. त्यातच गणेशोत्सवादरम्यान अजित पवार यांचे बारामतीत तर नांदेड येथे देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेल्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा आहे तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी रविवारी शिर्डीत बोलताना माझं मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न तेंव्हाही नव्हते आणि आताही नसल्याचे सांगताना आपली सत्ता जनता असून ती कधीच कोणी घेऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. एकुणच महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपाआधीच कौन बनेगा मुख्यमंत्री कार्यक्रमाची सुरूवात झाली आहे.
राज्यात एकीकडे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे पडद्यामागील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक भावी उमेदवारांनी आपल्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार)गटाचा परफॉर्मन्स सगळ्यात उजवा ठरल्याने सध्या या दोन पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाले आहे, तर दोन्ही शिवसेना ठाकरे आणि भाजप यामध्ये दोन्ही शिवसेनेलाच उमेदवारांची पसंती असल्याचे दिसत आहे. भाजपामध्ये काँग्रेस आमदार जितेश अंतापुरकर यांच्यानंतर मोठा असा पक्षप्रवेश झालेला नाही. तर दुसरीकडे भाजपला सोडचिठ्ठी देण्यासाठी अनेक नेते तयार असून गणेशोत्सव झाल्यानंतर लगेचच पितृपक्षाचा पंधरवडा सुरू होईल. हा पंधरवडा संपताच राजकीय पक्षांतराचा कालावधी सुरू होईल. महायुती आणि महाआघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावऊन सध्या जोरदार रस्सीखेच असल्याचे बघायला मिळत आहे. 2019 पासून राज्याला लाभलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना अनपेक्षितपणे मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली. या पाच वर्षाचा विचार केला तर एकमात्र नक्की की पाच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्याला मिळाला, मात्र याच पाच वर्षाच्या काळात शिवसेनेच्या दोन शाखा तयार झाल्या.
महाविकास आघाडीतील उध्दव ठाकरे यांनी नुकतेच मुख्यमंत्री पदाचे स्वप्न तेव्हाही नव्हते आणि आताही नसल्याचे सांगितले, तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यातील 11 कोटी जनतेचा एकमेव लाडका नेता उध्दव ठाकरे असल्याचे सांगताना, उध्दव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होतील असे वक्तव्य केले. 2019 ला शिवसेना-भाजप युती तुटली त्याचे कारण होते, उध्दव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात बंद दाराआड झालेली चर्चा. मुख्यमंत्री पदासह सत्तेत समान वाटा देण्याचे आश्वासन शहांनी दिल्याचे ठाकरे यांनी सांगितले तर शहा यांनी आम्ही सगळीकडे शिवसेना भाजप युतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असल्याचे जाहिरपणे सांगत होते, मग तुम्ही तेव्हाच आक्षेप का घेतला नसल्याचे प्रत्युत्तर दिले. आता कालच्या ठाकरे आणि राऊत यांच्या वक्तव्यानंतर तोच खेळ पुन्हा होताना दिसत आहे. ठाकरे स्वप्न पडत नसल्याचे सांगत आहेत तर राऊत ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील असे जाहिरपणे सांगत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आधीच महाविकास आघाडीतील नेत्यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण हे जाहीर करा मी त्याला पाठिंबा देतो असे वक्तव्य केले होते. पण त्याला काँग्रेस आणि शरद पवारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. आधी महायुतीचे सरकार हटवू मग मुख्यमंत्री कोण याचा निर्णय घेऊ अशी भूमिका काँग्रेस आणि शरद पवारांनी घेतली होती. काँग्रेसमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरातांपासून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण इतके संभाव्य चेहरे असले तरी, दिल्लीतील हायकमांड ऐनवेळी कोणाच्या पारड्यात दान टाकेल हे सांगता येत नाही.
राज्याच्या विरोधीपक्ष नेत्याकडे नेहमी भावी मुख्यमंत्री ( शॅडो सीएम) म्हणून पाहिले जाते. मात्र, वडेट्टीवार आणि पटोले वाद, त्यानंतर वडेट्टीवार यांच्या जिह्यातील वडेट्टीवार विरूध्द खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या वादामुळे त्यांना जिह्यातूनच विरोध होऊ लागला आहे. शरद पवारांच्या पक्षात पवार साहेब ठरवतील तेच धोरण आहे. राज्याला कधी नव्हे ते 2024 ला पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला तर राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान सुजाता सैनिक यांना मिळाला. आता प्रतिक्षा आहे ती पहिल्या महिला मुख्यमंत्री यांची. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेते आज जरी महायुतीला सत्तेपासून रोखणे हाच आमचा प्रमुख उद्देश असल्याचे बोलत असले, तरी मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं आता सगळ्यांना पडायला सुरूवात झाली आहे.
तिकडे महायुतीत मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं नेत्यांना कमी, कार्यकर्त्यांना जास्त पडत आहेत. गणेशोत्सवात एकीकडे अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांनी
बॅनर लावले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हेच पुढचे मुख्यमंत्री असतील असे देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी सांगितले होते. पण आता महायुतीचा मुख्यमंत्री असेल असं ते सांगत आहेत. तर एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असे त्यांचे मंत्री आणि आमदार सांगत आहेत. त्यामुळे सध्या महायुतीतले तिन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री होण्यासाठी बाशिंग लावून बसले आहेत. भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे ज्येष्ठे नेते नितीन गडकरी यांना विशेष प्रचारक म्हणून जबाबदारी देताना, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांना देखील सक्रिय केले आहे. त्यामुळे 2019 ला फडणवीसच शिवसेना भाजप युतीचे मुख्यमंत्री असतील सांगणाऱ्या भाजपने यावेळी आपले पत्ते मात्र उघड केलेले नाहीत. कोणी कितीही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले तरी जो विधानसभा निवडणुकीत हेवी ठरेल आणि पक्षातील हेवी नेत्यांचा ज्याला पाठिंबा असेल त्याचेच स्वप्न पूर्ण होईल.
प्रवीण काळे