‘आयसीसी’ चॅम्पियन कोण ? आज होणार फैसला
भारताला फिरकी चौकडी पुन्हा वर्चस्व गाजविण्याची अपेक्षा, रोहितने क्रीजवर अधिक टिकण्याची गरज
वृत्तसंस्था/ दुबई
आतापर्यंत प्रतिस्पर्ध्यांना नमविण्यात सातत्याने यशस्वी झालेल्या भारताला आज रविवारी 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी न्यूझीलंडचा अडथळा दूर सारावा लागेल आणि दिग्गज खेळाडू विराट कोहली व रोहित शर्मा यांच्याबद्दलच्या भावनांचा गोंधळही बाजूला करावा लागेल. न्यूझीलंडचा सामना करताना भारताला सतर्क राहावे लागेल. कारण भारताची किवीविरुद्धची कामगिरी ही दिलासादायक नाही. आयसीसीच्या सर्व स्पर्धांचा विचार करता न्यूझीलंडकडे भारतावर 10-6 अशी आघाडी आहे.
जर आयसीसीच्या बाद फेरीच्या सामन्यांचा विचार केला, तर न्यूझीलंडने भारतावर 3-1 अशी आघाडी घेतलेली आहे. भारतासाठी ही एक त्रासदायक बाब आहे. क्रिकेट जगतातील एक वर्ग गेल्या पंधरा दिवसांपासून दुबईमधील दीर्घ वास्तव्याचा फायदा झाल्याचा दावा करून भारतावर सतत टीका करत आला आहे. पण आता या युक्तिवादाला फारसे महत्त्व राहणार नाही. कारण किवींनी आधीच येथील परिस्थितीचा अनुभव घेतला आहे.
फिरकी चौकडीने दुबईतील खेळपट्टीचा व्यवस्थित फायदा उठविलेला असल्याने जेतेपदाच्या सामन्यापूर्वी भारत अधिक आरामदायी वाटेल. भारत अंतिम सामन्यासाठी चार फिरकी गोलंदाज आणि दोन वेगवान गोलंदाज हे समीकरण कायम ठेवण्याची शक्यता आहे. वऊण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव या उजव्या आणि डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांच्या समीकरणाने प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणले आहे. त्याचबरोबर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हेही भारतीय गोलंदाजीचे मुख्य स्तंभ आहे. त्यांनी फलंदाजांना आपल्या अचूकतेने बांधून ठेवून चुका करण्यास भाग पाडलेले आहे.
जर अंतिम सामना खरोखरच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी वापरल्या गेलेल्या खेळपट्टीवर खेळवला जाणार असेल, तर हे चार गोलंदाज न्यूझीलंडला अडचणीत आणू शकतात. त्यांचा सामना करण्याच्या बाबतीत न्यूझीलंडच्या सर्वांत जास्त आशा केन विल्यमसन आणि रचिन रवींद्रवर असतील. ते त्यांच्या संघातील फिरकी गोलंदाजांविऊद्धचे सर्वांत सक्षम फलंदाज आहेत. तथापि किवींनाही त्यांचे स्वत:चे फिरकी गोलंदाज कर्णधार मिशेल सँटनर, मायकेल ब्रेसवेल, रवींद्र आणि ग्लेन फिलिप्स हेही असाच प्रभाव पाडण्याचा विश्वास असेल.
किवी फिरकीपटूंनी गेल्या वर्षी कसोटी मालिकेत भारताला जबर तडाखा दिला होता आणि 2000 नंतरचे आपले पहिल्या आयसीसी एकदिवसीय जेतेपद मिळवू पाहणाऱ्या न्यूझीलंडला यावेळीही त्यांच्याकडून भरपूर आशा असतील. योगायोगाने त्यांनी 25 वर्षांपूर्वी केनियामध्ये झालेल्या नॉकआउट्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतालाच चार गड्यांनी हरवले होते. पण भारताला यावेळी असे घडू द्यायचे नाही आणि गेल्या वर्षीचा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांच्या खात्यात आणखी एक आयसीसी ट्रॉफी जोडायची आहे.
टी-20 विश्वचषक जिंकण्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचीही मोठी भूमिका होती. आता त्यांच्यासाठी शेवटचा टप्पा झपाट्याने जवळ येत चालला आहे. तरीही दीड दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेटची सेवा केल्यानंतर कोहली आणि रोहितसाठी ही शेवटची एकदिवसीय स्पर्धा आहे की नाही हे निश्चितपणे सांगता येणारे नाही. जर खरोखरच तसे असेल, तर ते गौरवास्पद कामगिरी नोंदवून बाहेर पडण्यास उत्सुक असतील.
रोहित मागील काही कालावधीपासून 20-30 धावा काढण्यावर समाधानी असल्याचे दिसते आणि त्याला त्वरित सुधारणा करून क्रीजवर जास्त काळ राहण्याचा प्रयत्न करावा लागेल. यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांवरील भार कमी होईल. मधली फळी आतापर्यंत भरपूर भार उचलत आली आहे. मॅट हेन्री दुखापतग्रस्त झालेला असल्यामुळे त्याला काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो कारण न्यूझीलंडच्या या वेगवान गोलंदाजाने भूतकाळात अगदी पाटा खेळपट्ट्यांवरही त्याला भरपूर त्रास दिलेला आहे.
कोहलीने गेल्या पाच डावांमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतके केली आहेत, या खेळी त्याच्या भूतकाळातील वर्चस्वाची आठवण करून देतात. जरी कोहली आणि रोहितकडून प्रभावी खेळी अपेक्षित असली, तरी भारताला अनुभवी खेळाडूंवरच सारा भार टाकून राहायला आवडणार नाही. त्यांना उपकर्णधार शुभमन गिल, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल आणि हार्दिक पंड्या यांच्याकडूनही उत्तम कामगिरीची अपेक्षा असेल. गिल आणि श्रेयसने आपापल्या परीने प्रसंगी योगदान दिलेले आहे, तर राहुल आणि पंड्याने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविऊद्ध प्रभाव पाडला. आता भारताने पुन्हा एकदा या सर्व घटकांना एकत्र करून एक प्रभावी मोहीम जिंकण्याची वेळ आली आहे.
संघ: भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वऊण चक्रवर्ती.
न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नाथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग, जेकब डफी.
सामन्याची वेळ : दुपारी 2.30 वा.
त्या पराभवातून शिकण्यासारखे बरेच काही : यंग
न्यूझीलंडच्या गट फेरीतील भारताविरुद्धच्या पराभवामुळे निराश न होता सलामीवीर विल यंग आज रोहित शर्माच्या संघाच्या कमकुवत दुव्यांचा फायदा घेण्यावर लक्ष केंद्रीत करून आहे. यंगने डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांच्यासोबत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या संघाला चांगली सुऊवात करून दिली आहे आणि ज्यांच्यावर न्यूझीलंडचा भार राहील त्या प्रमुख फलंदाजांपैकी तो एक आहे. भारताविऊद्धच्या गट सामन्यातील त्या पराभवापासून आम्ही, विशेषत: माझ्या मते एक फलंदाज म्हणून, बरेच काही शिकू शकतो. परंतु मला खात्री आहे की, आमच्या गोलंदाजांनीही भारताच्या फलंदाजांचे आणि ते परिस्थिती कशी हाताळतात त्याचे चांगल्या प्रकारे निरीक्षण केलेले असेल, असे यंगने म्हटले आहे.
भारत-न्यूझीलंड वनडे हेड टू हेड रेकॉर्ड
दुबईत आज भारत व न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल रंगणार आहे. यादरम्यान, उभय संघातील वनडे फॉरमॅटमधील हेड टू हेड रेकॉर्ड. वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत भारत व न्यूझीलंड 119 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाने किवीज संघाला 61 वेळा पराभूत केले आहे तर न्यूझीलंडने भारतीय संघाला 50 वेळा हरवले आहे. याशिवाय, दोन्ही संघातील सात सामने अनिर्णीत राहिले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीतील इतिहास पाहता 2000 साली न्यूझीलंड संघाने भारताला पराभूत केले होते. यानंतर यंदाच्या स्पर्धेत रोहितच्या नेतृत्वाखालील भारताने किवी संघाला पराभूत करत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. यानंतर आज उभय संघात चॅम्पियन्स ट्रॉफीची निर्णायक फायनल रंगणार असून या लढतीत कोणता संघ बाजी मारतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
फायनलपूर्वी विराटला दुखापत
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलला 24 तासही उरले नसताना भारतीय संघासाठी आता एक वाईट बातमी आली आहे. रविवारी सराव करत असताना विराट कोहलीला दुखापत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विराट हा फायनलसाठी सराव करत होता. मैदानात सराव करण्यात दंग असताना त्याच्या गुडघ्याला जोरात चेंडू लागला. हा चेंडू एवढ्या जोरात कोहलीला लागला की तो काही काळ खाली बसला. त्यानंतर लगेच भारतीय संघाच्या डॉक्टरांनी विराट कोहलीकडे धाव घेतली. दुखापत झाल्यानंतर विराट कोहलीने सराव केलाच नाही. त्यामुळे त्याची दुखापत गंभीर असल्याचे आता समोर आले आहे.