3 कफ सिरप विरोधात डब्ल्यूएचओचा इशारा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारतात 3 भेसळयुक्त कफ सिरपवरून इशारा जारी केला आहे. यात श्रीसन फार्मास्युटिकल्सचा कोल्ड्रिफ, रेडनेक्स फार्मास्युटिकल्सचा रेस्पिफ्रेश टीआर आणि शेप फार्माचा रीलाइफ कफ सिरप सामील आहे.
हे तिन्ही सिरप गंभीर जोखिम निर्माण करू शकतात. तसेच हे जीवासाठी धोका निर्माण करणाऱ्या आजाराचे कारण ठरू शकतात. जर ही औषधे मिळत असतील तर याची माहिती आम्हाला द्या, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने धोकादायक ठरविलेल्या सिरपमध्ये कोल्ड्रिफ सामील असून यामुळे मध्यप्रदेशात आतापर्यंत 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 25 मुलांचा मृत्यू झाला आहे. सिरपमध्ये डायएथिलीन ग्लायकॉल (डीईजी)चे प्रमाण निश्चित मर्यादेपेक्षा जवळपास 500 पट अधिक होते, यामुळे या मुलांना जीव गमवावा लागला होता.
जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वी कोल्ड्रिफ कफ सिरप विदेशातही निर्यात करण्यात आले आहे का, अशी विचारणा भारत सरकारकडे केली होती. कुठलेच भेसळयुक्त औषध विदेशात पाठविण्यात आलेले नाही, तसेच अवैध निर्यातीचा कुठलाच पुरावा मिळाला नसल्याचे भारतात औषधांवर देखरेख ठेवणारे प्राधिकरण सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशनने सांगितले होते.