महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळवट्टी, इनाम बडस-बाकनूर रस्त्याला वाली कोण?

11:22 AM Aug 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

19 वर्षापासून रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष : रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य : वाहतूक धोकादायक : नागरिकांतून तीव्र संताप

Advertisement

वार्ताहर/किणये 

Advertisement

बेळवट्टी, इनाम बडस व बाकनूर या तीन गावातील रस्त्यांची अक्षरश: दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे गेल्या 19 वर्षांपासून प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी इथल्या नागरिकांतून होत आहेत. लोकप्रतिनिधींना अनेकवेळा सांगूनही या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. मग आम्ही दाद मागायची कुणाकडे? असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत. सध्याची रस्त्याची परिस्थिती पाहता या रस्त्याला वाली कोण? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक व वाहनधारक करू लागले आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागातील आणि सीमेवरील भागात शेवटच्या टोकावर असणाऱ्या या तिन्ही गावातील नागरिकांना अक्षरश: खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाट काढताना जीव धोक्यात घेऊन वाहतूक करावी लागत आहे. कारण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. रात्रीच्या वेळी तर या गावांना ये-जा करणे अवघड बनलेले आहे. या तिन्ही गावांना बेळवट्टीपासून इनाम बडस या गावापर्यंत रस्ता गेलेला आहे. सदर रस्ता दीड किलोमीटर अंतराचा आहे. तसेच बेळवट्टीपासून बाकनूरपर्यंत रस्ता गेलेला आहे. हा रस्ता साडेपाच किलोमीटर अंतराचा आहे. तसेच इनाम बडस गावाहून मोरब क्रॉस रस्त्याला संपर्क रस्ता मिळालेला आहे. असे हे या तिन्ही गावातील महत्त्वाचे संपर्क रस्ते आहेत. या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या खड्ड्यांतून वाहतूक करायची कशी, असा प्रश्न इथल्या वाहनधारकांना पडलेला आहे

खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वार पडून जखमी

खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वार पडून किरकोळ जखमी झालेले आहेत. मोठी दुर्घटना झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. बेळवट्टीजवळच्या नाल्याच्या पुलावर गेल्या पंधरा-वीस दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात पाणी आले होते. त्यामुळे पुलाच्या बाजूजवळील रस्ता वाहून गेलेला आहे. या ठिकाणी चार दिवसापूर्वी माती टाकण्यात आलेली आहे. मात्र या पुलाजवळील रस्ताही सद्यस्थितीत धोकादायक आहे, अशी माहिती वाहनधारकांनी दिली. तसेच बाकनूर क्रॉस नाल्याजवळील पुलाच्या दोन्ही बाजूनी रस्ता पावसामुळे वाहून गेलेला आहे. या ठिकाणीसुद्धा पावसाचे पाणी आले होते. या तीन गावांसह पश्चिम भागातील अनेक वाहनधारकांची या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या भागातील गावांसाठी जोडणारे हे संपर्क रस्ते आहेत.

या रस्त्याच्या संदर्भात माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली बाकनूर गावातील नागरिकांनी खासदार जगदीश शेट्टर यांची गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी बेळगाव येथे भेट घेऊन त्यांना रस्त्याच्या डांबरीकरण संदर्भात निवेदन देण्यात आले. बाकनूर गावाला भेट देऊन आपण याबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी खासदारांनी दिले असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. यावेळी म्हाळु मजुकर, नारायण गोडसे, विठ्ठल मजुकर, विठ्ठल गोडसे, रवळू गोडसे, नाना मजुकर आदींसह नागरिक उपस्थित होते.

रस्ता पूर्ण डांबरीकरण करण्यात यावा

बेळवट्टी-बाकनूर रस्त्याच्या दुऊस्तीकडे गेल्या 19 वर्षांपासून दुर्लक्ष झाले आहे. ग्रामीणच्या आमदारांना आम्ही यापूर्वी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ग्रामस्थांच्या वतीने  निवेदन दिलेले आहे. काही अंतरावरील अंदाजे दोन किलोमीटर अंतरापर्यंतचा रस्ता मंजूर झाला असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे. मात्र आम्हाला बेळवट्टीr ते बाकनूर हा पूर्ण रस्ता व इनाम बडस रस्ता पूर्ण डांबरीकरण करावा. खड्डेमय रस्त्यामुळे इथल्या नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. याचा विचार करून लोकप्रतिनिधींनी या रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी निधी मंजूर करून कामकाज त्वरित सुरू करावे.

- म्हाळू मजुकर, ग्रा. पं. सदस्य.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article