चेन्नई येथील सरव्यवस्थापकांकडून विमानतळ बांधकामाची पाहणी
प्रतिनिधी/ बेळगाव
सांबरा येथील बेळगाव विमानतळावर नवे टर्मिनल बिल्डिंग बांधले जात आहे. 19,600 चौरस मीटर टर्मिनलचे बांधकाम सुरू आहे. शनिवारी चेन्नई येथील इंजिनिअरिंग विभागाच्या सरव्यवस्थापकांनी या कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.
बेळगाव विमानतळाहून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील गरज ओळखून विमानतळ प्राधिकरणाने नवीन टर्मिनल बिल्डिंग बांधण्याचा निर्णय घेतला. 322 कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक असे टर्मिनल बिल्डिंग बेळगावला मिळणार आहे. मार्च 2024 पासून नवीन टर्मिनल बिल्डिंगच्या कामाला सुरुवात झाली. काम योग्यरित्या होत आहे की नाही, याचा आढावा घेण्यासाठी शनिवारी चेन्नई येथील अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
बेळगाव विमानतळाचे संचालक त्यागराजन यांनी सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर प्रत्यक्ष बांधकाम सुरू असलेल्या जागेवर जाऊन पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या जागेचीही पाहणी करण्यात आली.