शहापुरातील ‘त्या’ सेवा रस्त्याला वाली कोण?
गेल्या वर्षभरापासून अर्धवट स्थितीतील कामांचा स्थानिकांना फटका
बेळगाव : हुतात्मा काकेरु चौकाच्या पाठीमागील सर्व्हिस रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून येथील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून अर्धवट कामामुळे वर्षभरात दोघांचा बळी गेला आहे. तर अनेकजण पडून जखमी झाले आहेत. याबाबत लोकप्रतिनिधी, महापौर, नगरसेवक, जिल्हाधिकारी व मनपाकडे पाठपुरावा करूनदेखील कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद दिला जात नाही. यामुळे स्थानिक रहिवासी संतप्त बनले आहेत.
नवीन ड्रेनेज लाईन घालण्यासाठी हुतात्मा काकेरु चौकाच्या पाठीमागे सेवा रस्त्याचे वर्षभरापूर्वी खोदकाम करून ड्रेनेज लाईन घालण्यात आली आहे. पण सदर काम अर्धवट स्थितीत आहे. त्याचबरोबर गटारी व रस्त्याचे कामही तसेच सोडून देण्यात आले आहे. गटारी करताना नळ जोडण्या तोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून स्थानिक रहिवाशांना नरकयातना सहन करण्याची वेळ आली आहे.
नागरिकांतून तीव्र संताप
चांगल्या स्थितीत असलेला रस्ता खोदण्यास स्थानिकांनी विरोध केला होता. पण ड्रेनेजलाईन घालण्याचे सांगून काम हाती घेण्यात आले. पण येथील विकासकामे पूर्ण करण्याऐवजी अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आले आहे. धोकादायक गटारीमध्ये पडून वर्षभरात दोघांचा बळी गेला आहे. तर अनेकजण जखमीही झाले आहेत. येथील समस्या सोडविण्यात याव्यात, यासाठी लोकप्रतिनिधी, महापौर, नगरसेवक त्याचबरोबर मनपा कार्यालयाकडे पाठपुरावा करूनदेखील कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महापौरांकडून पाहणी करण्याचे केवळ आश्वासन
येथील नगरसेवक रवी साळुंखे, जयंत जाधव आणि रवी धोत्रे यांच्या प्रभागामध्ये यांच्याकडे समस्या मांडूनदेखील काहीच उपयोग होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. इतकेच नव्हे तर महापौर मंगेश पवार यांची भेट घेऊन तक्रारीचा पाढा अनेकवेळा वाचण्यात आला आहे. याबाबत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करू, असे आश्वासन महापौरांनी दिले होते. पण अद्यापही ते या परिसरात फिरकलेच नाहीत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.