For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘तो’ आमदार कोण?

06:01 AM Dec 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘तो’ आमदार कोण
Advertisement

राज्यभरात लोकांची उत्सुकता शिगेला : विरोधकांमध्ये चिंता, भाजप गोटात उकळ्या

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

एका आमदाराचा कथित मॉर्फ केलेला आक्षेपार्ह व्हिडिओ आणि तो व्हायरल करण्याची धमकी मिळाल्यानंतर संशयिताला खंडणीरुपी पाच लाख रुपये अदा करण्याच्या प्रकारावरून राज्यात खळबळ माजलेली असली तरी तमाम गोमंतकीयांमध्ये मात्र ‘तो आमदार कोण’? हे जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असल्याचे दिसून आले आहे.

Advertisement

दुसऱ्या बाजूने विरोधकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे तर भाजपवाल्यांना उकळ्या फुटल्या आहेत. आतापर्यंत जवळजवळ अज्ञातवासात असलेले माजी आमदार ग्लेन टिकलो यांनीही प्रसारमाध्यमांसमोर येत या ‘वाहत्या गंगेत’ हात धुवून घेतले, त्यावरून भाजप गोटात किती उमेदी वातावरण आहे त्याचा अंदाज आला आहे.

राज्यात गेल्या चार दिवसांपासून एका आमदाराचे कथित अश्लील व्हिडिओ प्रकरण गाजत आहे. ओडिशा राज्यातील कोणा एका कुकेश नामक युवकाला चक्क गोव्यातील एका आमदाराचा महिलेसोबतचा अश्लील व्हिडिओ हाती लागला होता. त्याच्या आधारे रात्रीत श्रीमंत होण्याची स्वप्ने रंगवत त्या युवकाने सदर आमदाराशी संपर्क साधला व तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 5 कोटींची खंडणी मागितली.

खरे तर आपण ‘तसे’ काही केलेच नसते तर आमदाराला घाबरण्याची गरजच नव्हती. परंतु उच्चविद्याविभूषित असलेल्या ‘त्या’ आमदाराने धमकी देणाऱ्याला घाबरून चक्क 5 लाख रुपये त्याच्या हवाली केले. तेथेच आमदार गोत्यात आला व राज्यात तोच एक मोठा चर्चेचा विषय ठरला.

अशाप्रकारे केवळ धमकी देताच पाच लाख हाती पडल्याने शेफारलेल्या सदर संशयिताने लगेचच दुसरी धमकी देताना चक्क पाच कोटींची मागणी केली. तेव्हा मात्र आमदाराच्या पायाखालची वाळू सरकली व तो पोलिसात पोहोचला. गुन्हा शाखेत दाखल झालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अहमदाबाद येथून संशयिताला ताब्यातही घेतले.

एवढ्यावर प्रकरण शमते न शमते तोच भलत्याच इसमाने तो वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे त्याच विषयावरून पुन्हा एकदा खळबळ उडाली. सदर संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याचा मोबाईलही त्यांनी जप्त केलेला आहे. तरीही व्हिडिओ व्हायरल कसा झाला?, हा नवा सूत्रधार कोण?, यासारखे सवाल उपस्थित करण्यात येऊ लागले आहेत.

दुसऱ्या बाजूने अटकेत असलेल्या संशयिताने प्रथम श्रेणी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र नाट्यामयरित्या त्याने स्वत:च तो अर्ज मागेही घेतला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

... तर पैसे का दिले? : टिकलो

दरम्यान, हे प्रकरण गाजत असतानाच हळदोणेचे माजी आमदार ग्लेन टिकलो यांनी शनिवारी सायंकाळी पणजीत पत्रकार परिषद घेऊन ‘त्या’ आमदाराने  राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. आमदाराच्या दाव्यानुसार व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओशी त्याचा कोणताही संबंध नव्हता तर खंडणी मागणाऱ्याला त्याने पैसे का आणि कोणत्या आधारावर दिले? असा सवाल टिकलो यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी व सत्य उजेडात आणावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.