कोण मोठं...
फार फार प्राचीन काळी देवांनी एक ते नऊ अंक बनवले होते. त्याच्या पुढे जायचं कसं तेच कुणाला कळत नव्हते. अशावेळी एक ते नऊ अंक बनवणारे देव उरलेल्या मातीच्या गोळ्याचा एक पोकळ गोल तयार करून त्याला फिरायला पाठवून निघून गेले. त्याला नाव दिले होते शून्य. पण त्याचे करायचे काय हेच माहित नसल्याने कोणीच त्यांच्याकडे पाहायला तयार नाही. साऱ्या जगात त्याला तशीच वागणूक मिळाली. पण त्याच्या आधी काय गंमत झाली माहितीए? एक ते नऊ अंक तयार झाल्यानंतर दिमाखात फिरत होते पण या शून्याला मात्र कोणी खेळायला घ्यायला तयार नव्हते. सगळे त्याला हाकलून द्यायचे. आपल्याजवळ सुद्धा उभं करायचे नाहीत. खाऊ खायला बोलवायचे नाहीत. बिचारा अगदी रडकुंडीला आला. कोपऱ्यात बसून रडू लागला. सरस्वतीला त्याची दया आली. ती वेश पालटून त्याच्याजवळ येऊन बसली. पाठीवर हात फिरवत त्याला म्हणाली, मी सगळं बघितले बरं! आता मी आलेय तुझ्या मदतीला. तुला मी आज एक जादू देणार आहे! कुणाला सांगायचं नाही. मी सांगेन तिथे जाऊन तू गुपचूप उभं राहायचं. मग तुला कळेल गंमत. छान.... शून्याला आनंद झाला. तो उड्या मारू लागला. सगळे अंक बघायलाच लागले. हळूहळू उड्या मारता मारता शून्य हळूच एकाच्या बाजूला येऊन उभा राहिला आणि सगळे एकदम आश्चर्याने थक्क झाले. एकावर एक शून्य, सरस्वतीने सांगितलं 10 आता ह्या एकाची किंमत 10 पट मोठी झाली आहे. एकाला कळेच ना आपली एवढी किंमत कशी काय वाढली. एक आकडा आनंदाने शून्याचा हात हातात घेऊन सगळीकडे फिरू लागला. आपली वाढलेली किंमत लोकांना सांगू लागला. बाकीच्या लोकांना आता खूप राग आला हा कसा काय आपल्यापेक्षा मोठा झाला. आता याच्याकडे बघितलंच पाहिजे. त्यांनी शून्याला मस्का लावायला सुरुवात केली. कोणी त्याला खाऊ देऊ लागले, तर कोणी खेळणी देऊ लागले आणि आपल्याकडे थोडा वेळ बोलावू लागले, जसा शून्य त्यांच्याकडे जाईल तसे ते शून्याला बाजुला घेऊन उभे राहायचे आणि स्वत:ची दहा पटीने वाढलेली किंमत सांगायचे. सहाचा झाला 60, प्रत्येकाची तिथे किंमत वाढू लागली. सगळ्यांना शून्य हवाहवासा वाटू लागला आणि मग जगाला त्याची किंमत कळली. एका शाळेमध्ये एका मुलीला असंच अंक निवडायला सांगितल्यानंतर तिने शून्य निवडला. घरी आल्यानंतर मात्र तिच्या आई-वडिलांनी तिला खूप रागावलं. तुला काही व्यवहारज्ञानच नाही. मग तिने शून्याची कथा आई बाबांना सांगितली आणि मला शून्यासारखं बनायचंय. मी ज्यांच्या जवळ जाईन त्यांच्या आयुष्याला मोठा अर्थ मला द्यायचा आहे. त्यांची किंमत वाढवायची आहे. हा तिचा विचार ऐकल्यानंतर मात्र आता आई-बाबा खूश झाले कारण आजकाल मोठ्या आकड्यांच्या, पैशाच्या मागे धावणारी मंडळी पाहिली तर हा विचार वरवर मुर्खपणाचा वाटला तरी आयुष्यात खूप काही देऊन जाणारा आहे.