For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेअरबाजार हालचालींची चिंता कोणाला

06:33 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेअरबाजार हालचालींची चिंता कोणाला
Advertisement

अठराव्या लोकसभेसाठीच्या सार्वत्रिक निवडणुकीची पूर्तता आता लवकरच होणार आहे. 1 जूनला मतदानाचा सातवा आणि अंतिम टप्पा आहे. तर 4 जूनला मतगणना होऊन, कोणाचे सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे. अशा स्थितीत या राजकीय घडामोडींचे प्रतिबिंब शेअरबाजारात कसे पडले आहे, हा औत्सुक्याचा विषय बनला आहे. निवडणुकीच्या अनुरोधाने शेअरबाजाराच्या हालचाली ज्याप्रकारे होत आहेत, तसे वेगवेगळे अर्थही काढले जात आहेत. आता यंदाची लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत असताना शेअरबाजाराचा कल कसा आहे, तसेच त्यावरुन निवडणुकीत कोण विजयी होणार, याचा काही थांगपत्ता लागू शकतो का, हे पाहणे रोचक ठरणार आहे. अर्थातच, प्रत्येक अनुमानाप्रमाणे शेअरबाजाराच्या हालचालींवरुन काढण्यात येणाऱ्या अनुमानांनाही त्यांच्या मर्यादा आहेतच. पण या हालचाली कलदर्शक असू शकतात. गेल्या तीन लोकसभा निवडणुकांचा संदर्भ घेऊन यासंबंधीचा तुलनात्मक आढावा घेण्याचा हा प्रयत्न...

Advertisement

    लोकसभा निवडणूक आणि गुंतवणूकदार

?गुंतवणूकदारांचे कोणत्याही लोकसभा निवडणुकीकडे अत्यंत दक्षतेने लक्ष असते. कारण कोणते सरकार येणार, यावरुन देशाचे आर्थिक धोरण काय असणार हे ठरत असते. आर्थिक सुधारणांच्या आणि आर्थिक उदारीकरणाला प्राधान्य देणारे सरकार येत असेल, तर गुंतवणूकदारांचा उत्साह वाढतो आणि शेअरबाजाराचा निर्देशांक वरच्या दिशेने सरकत जातो. निवडणुकीसाठी जेव्हा मतदान होत असते, तेव्हा निवडणुकीच्या परिणामांविषयी निश्चितता नसते. म्हणून या काळात गुंतवणूकदार ‘थांबा आणि वाट पहा’ या भूमिकेत असतात. गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये असेच चित्र सर्वसाधारणत: प्रत्येकवेळी पहावयास मिळाले आहे.

Advertisement

?गुंतवणूकदारांमध्ये दोन प्रकार असतात. एक, विदेशी गुंतवणूकदार आणि दोन, देशातील गुंतवणूकदार. हे दोन्ही प्रकारचे गुंतवणूकदार त्यांच्या त्यांच्या आकलनानुसार आणि अपेक्षांच्या अनुसार लोकसभा निवडणुकीकडे पहात असतात. गेल्या तीन दशकांमध्ये भारत जागतिक अर्थव्यवस्थेशी मोठ्या प्रमाणावर जोडला गेल्याने शेअरबाजारातील विदेशी गुंतवणुकीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांच्या कलाकडेही लक्षपूर्वक पाहिले जाते. देशी गुंतवणूकदारही त्यांच्या पद्धतीने निवडणुकीच्या परिणामांसंबंधी अनुमाने काढत असतात. या अनुमानांच्या अनुसार ते समभागांच्या खरेदीचे आणि विक्रीचे व्यवहार करतात.

2009 ची निवडणूक आणि शेअरबाजार

?2009 मध्ये लोकसभा निवडणूक 16 एपिल ते 13 मे या कालावधीत झाली होती. या कालावधीत मुंबई शेअरबाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजारांमध्ये नेहमीपेक्षा अधिक चढ-उतार पहावयास मिळाले होते. 16 एप्रिल 2019 या दिवशी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक जवळपास 11,730 असा होता. तेव्हापासून 13 मे पर्यंत निदेशांकात अनेक चढउतार झाले. ते साधारण 11,000 ते 12,000 या रेंजमधील होते. 13 मे या दिवशी मतदान पूर्ण झाले तेव्हा निर्देशांक 12,170 पर्यंत पोहचला होता. आर्थिक सुधारणा करणारे सरकार येणार असा कल शेअरबाजारात होता.

?2009 च्या निवडणुकीच्या मतदानाचे टप्पे पार होऊ लागले, तसा निर्देशांकही एक पाऊल मागे, दीड पाऊल पुढे अशा गतीने वाढत राहिला. 16 मे या दिवशी त्या निवडणुकीची मतगणना झाली. त्यानंतर एकदम निर्देशांक वधारला तो थेट 15,000 च्या मर्यादेपर्यंत पोहचला. 2010 मध्ये त्याने 16,000 चा टप्पा गाठला. नंतर 17,800 पर्यंत त्याने प्रगती केली. मात्र, निवडणुकीच्या वर्षाचा प्रारंभ होण्यापूर्वी शेअरबाजारात काहीसे मंदीचे वातावरण परसल्याचे दिसले. तो आर्थिक संकटाचा परिणाम होता. निवडणूक वर्षात तो पुसला गेला होता.

2014 च्या निवडणुकीत आणखी प्रगती

?2014 मध्ये देशाच्या राजकारणात अनेक ‘न भूतो न भविष्यती’ अशी परिवर्तने झाली होती. जानेवारी 2014 मध्ये मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक 21,150 च्या पातळीवर राहिला. याहीवेळी निदेशांकामध्ये काही लहानसहान चढउतार पहावयास मिळाले. मात्र अपेक्षेकृत स्थिरताही दिसून आली. गुंतवणूकदार सावध भूमिकेत होते असे त्यावेळी दिसून आले होते. 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीत या निवडणुकीचे मतदान पार पडले. 7 एप्रिलला निर्देशांक 22,340 पर्यंत होता. तर मतदानाच्या अंतिम दिनी निर्देशांक 23,550 पर्यंत पोहचला होता. या निवडणुकीची मतगणना 16 मे या दिवशी झाली. भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले. निर्देशांकानेही 24,125 पर्यंतची उसळी घेतल्याचे दिसले.

?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील पूर्ण बहुमताचे केंद्र सरकार आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम वेगाने लागू करणार हे दिसून येताच 26 मे 2014 या दिवशी निर्देशांकाने इतिहासात प्रथमच 25,000 ची पातळी पार केली. नंतरच्या एक वर्षाच्या काळात निर्देशांकाने आपलेच विक्रम मागे टाकत नवे विक्रम प्रस्थापित केले. 2019 हे वर्ष उजाडेपर्यंत निर्देशांक 36,670 ची पातळी पार करुन गेला होता. त्यानंतरही लोकसभा निवडणुकीपर्यंत ही प्रगती अशीच पुढे होत गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूर्ण बहुमताच्या सरकारच्या काळात शेअरबाजाराच्या निर्देशांकाने 17,000 ते 36,000 अशी दुपटीपेक्षाही अधिक पातळी गाठली.

यावेळी काय होत आहे...

? यंदा लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा प्रारंभ 19 एप्रिल 2024 या दिवशी झाला आहे. त्या दिवशी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक 73,088 च्या पातळीवर होता. मतदानाचा सहावा टप्पा 25 मे 2024 या दिवशी पार पडला आहे. त्या दिवशी मुंबईतही मतदान असल्याने शेअरबाजाराला सुटी होती. तथापि, 24 मे या दिवशी निर्देशांक 75,418 च्या पातळीवर होता. याचाच अर्थ असा की मतदानाला प्रारंभ झाल्यापासून मतदानाच्या सहाव्या टप्प्यापर्यंत शेअरबाजाराने 2,300 अंकांची प्रगती केली आहे. ही वाढ गेल्या तीन लोकसभा निवडणुकांच्या मतदान कालावधीत झालेल्या वाढीपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेअरबाजाराची भावना देशात ‘स्थिर सरकार’ येईल, अशी आहे, हे त्यावरुन स्पष्ट होते. अर्थात, हे ‘स्थिर सरकार’ कोणत्या पक्षाचे किंवा कोणत्या आघाडीचे, हे समजण्यासाठी आपल्याला 4 जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपण गुंतवणूकदार असाल, तर घाईगडबडीने निर्णय न घेता प्रत्यक्ष मतगणना होईपर्यंत धीर धरणे आणि वाट पाहणे हे सर्वोत्तम कार्य ठरणार आहे.

2019 च्या निवडणुकीतही विक्रमी वाढ

?2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात जानेवारी 2019 पासून शेअरबाजाराच्या निर्देशांकात लहान मोठे चढउतार पहावयास मिळाले होते. त्यावेळी जागतिक घटकांचा परिणाम भारतातील शेअरबाजारांवर अधिक प्रमाणात दिसून येत होता. विकासदराच्या प्रमाणाचे प्रतिबिंबही निर्देशांमध्ये दिसून येत होते. बालाकोट हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जे दणकट प्रत्युत्तर दिले, त्यामुळे निर्देशांक 2 हजारांनी उसळून 38,000 च्या पातळीवर पोहचला. या निवडणुकीच्या मतदानाच्या प्रथम दिनी 11 एप्रिल 2019 या दिवशी निर्देशांक 36,050 च्या आसपास होता. मतदानाच्या अंतिम दिवशी, अर्थात 17 मे 2019 या दिवशी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक 37,950 च्या पातळीवर असल्याचे दिसले होते.

?2019 च्या निवडणुकीच्या आधी अनेक मतदानपूर्व सर्वेक्षणातून भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी होतील असे निष्कर्ष काढण्यात आले होते. त्यामुळे गुंतवणूकदार अधिकच सावध होते. म्हणून शेअरबाजारांमध्येही मोठी उसळी पहावयास मिळाली नाही. मात्र, 23 मे 2019 या दिवशी मतगणना झाली आणि पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार अधिक जागा आणि अधिक मते घेऊन विजयी झाल्याने निर्देशांकाने 39,000 ची पातळी गाठली. जून 2019 मध्ये निर्देशांकाने इतिहासात प्रथम 40,000 ची विक्रमी पातळी पार केली होती. 2014 मे ते 2019 मे या पाच वर्षांच्या पूर्ण बहुमताच्या सरकारच्या काळात निर्देशांकाने 24,325 ते 39,500 अशी प्रगती केल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

.