For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसभाध्यक्षपदासाठी निवडणूक अटळ

06:58 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोकसभाध्यक्षपदासाठी निवडणूक अटळ
Advertisement

रालोआ आणि विरोधी आघाडीकडून अर्ज सादर. आज सकाळी 11 वाजता मतदान

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी यावेळी निवडणूक होणार आहे. केंद्रात सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीने सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार ओम बिर्ला यांनी उमेदवारी आवेदनपत्र सादर केले आहे. तर विरोधी आघाडीकडून काँग्रेसचे केरळमधील खासदार के. सुरेश यांनीही अर्ज सादर केला आहे. त्यामुळे आज बुधवारी सकाळी 11 वाजता लोकसभेत या पदासाठी गुप्त मतदान होणार आहे.

Advertisement

लोकसभेच्या अध्यक्षांची निवड एकमताने व्हावी, यासाठी केंद्र सरकारच्या वतीने प्रयत्न करण्यात आला होता. तथापि, विरोधी पक्षांकडून अट ठेवण्यात आली होती.  अध्यक्षांची निवड सर्वसहमतीने करायची असल्यास उपाध्यक्षपद विरोधी पक्षांपैकी कोणत्यापरी पक्षाच्या खासदाराला देण्यात यावे, अशी ही अट होती. तथापि, ती मान्य करण्यात आली नाही. कारण उपाध्यक्षपद भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षाला मिळण्याची शक्यता आहे. परिणामी, विरोधी पक्षांनी आपला उमेदवार अध्यक्षपदासाठी उतरविला आहे. उपाध्यक्षपदासाठीही विरोधी पक्ष उमेदवार उभा करेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

शपथविधी पूर्ण 

अठराव्या लोकसभेच्या प्रथम अधिवेशनाला 24 जून या दिवसापासून प्रारंभ करण्यात आला आहे. 24 जून तसेच 25 जून या दोन दिवसांमध्ये सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना शपथ देण्यात आली. शपथ देवविण्यासाठी अस्थायी अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे ओडीशातील खासदार भार्तृहरी मेहताब यांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली होती. मेहताब यांच्याच अध्यक्षतेत नव्या लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. मंगळवारी शपथविधी कार्यक्रम पूर्ण झाला. अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्यासाठी मंगळवारी दुपारी बारा वाजेपर्यंत कालावधी होता. या अवधीत दोन अर्ज सादर करण्यात आले आहेत.

रालोआत सहमती

लोकसभेच्या अध्यक्षपदासंबंधी निर्णय घेण्यासाठी मंगळवारी सकाळी दहा वाजता सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटकपक्षांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला या आघाडीतील सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी उमेदवाराची निवड करण्याचा अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. तसेच भारतीय जनता पक्ष जो उमेदवार निर्धारित करेल, त्याला पूर्ण समर्थन देण्याचा निर्णय आघाडीतील सर्व पक्षांनी घोषित केला. त्यानंतर मागच्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत या विषयावर पूर्ण एकसंधत्व असल्याचे दिसून येत आहे.

राजनाथसिंगांचा विरोधकांशी संपर्क

लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांचे नाव राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून निश्चित करण्यात आले असून विरोधी पक्षांनीही त्यांना पाठिंबा द्यावा आणि आतापर्यंतची सर्वसहमतीची परंपरा पुढे न्यावी, असे आवाहन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना केले. यासाठी त्यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क करण्यात आला. विरोधकांनी सर्वसहमतीसाठी तयारी दर्शविली. तथापि, उपाध्यक्षपदाची मागणी केली. ती सत्ताधाऱ्यांनी अमान्य केली.

रालोआचे पारडे जड

लोकसभेतील सध्याच्या बलाबलानुसार सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे 294 खासदार आहेत. तर विरोधी आघाडीचे 234 खासदार आहेत. या दोन्ही आघाड्यांमध्ये समाविष्ट नसलेल्या पक्षांच्या, तसेच अपक्ष खासदारांची संख्या 14 आहे. एक पद रिक्त होणार आहे. प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर कोणाचे संख्याबळ किती हे लोकसभेतच स्पष्ट होणार आहे. लोकसभा अध्यक्षपद निवडणुकीचा परिणाम बुधवारी संध्याकाळपर्यंत घोषित होण्याची शक्यता आहे.

दोन्ही उमेदवारांचा अल्पपरिचय

  1. ओम बिर्ला

ओम बिर्ला हे राजस्थानातील कोटा-बुंदी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून 2014 पासून सलग तीनदा निवडून आले आहेत. त्यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1962 या दिवशी झाला असून ते सध्या 62 वर्षांचे आहेत. त्यांचे शिक्षण एम. कॉम. पर्यंत झाले आहे. त्यांनी तरुण वयातच सामाजिक क्षेत्रात कार्याला प्रारंभ केला होता. अमिता बिर्ला या त्यांच्या पत्नी असून त्यांना दोन कन्या आहेत. 2003 मध्ये त्यांनी कोटा दक्षिण मतदारसंघात विजय मिळवून राजस्थान विधानसभेत प्रवेश केला. 2008 आणि 2013 च्या विधानसभा निवडणुकांमध्येही ते याच मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर 2014 पासून ते लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून येत आहेत. प्रभावी राजकीय नेता तसेच सामाजिक कार्यकर्ता आणि शेतकरी असा त्यांचा लौकिक आहे.

  1. कोडीकुन्नील सुरेश

कोडीकुन्नील सुरेश हे काँग्रेसचे केरळच्या मवेलीकारा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांचा जन्म 4 जून 1962 या दिवशी झाला. ते 62 वर्षांचे असून त्यांचे शिक्षण एल. एल. बी. पर्यंत झाले आहे. 1989 मध्ये ते प्रथम लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर पुढच्या तीन निवडणुका त्यांनी सलग आदूर मतदारसंघातून जिंकल्या. मात्र, 1998 आणि 2004 मध्ये त्यांचा पराभव झाला होता. 2009 पासून पुढच्या निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळविला. 2009 मधील त्यांचा विजय केरळ उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरुन रद्द ठरविला होता. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय फिरविल्याने ते पुन्हा खासदार झाले होते.

लोकसभेत दिवसभरात...

ड अठराव्या लोकसभेच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पूर्ण

ड लोकसभा अध्यक्षपदासाठी सत्ताधारी आणि विरोधी आज रणमैदानात

ड आज बुधवारी सकाळी 11 वाजता या पदासाठी मतदान सुरु होणार

ड संध्याकाळपर्यंत नव्या लोकसभा अध्यक्षांचे नाव घोषित केले जाणार

Advertisement
Tags :

.